ठळक मुद्देप्रकट मुलाखत ;  विभागीय साहित्य संमेलन

नवनाथ खराडे

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : आजच्या बेगडी राजकारणाचा काय त्रास सहनही होत नाही अन सांगताही येत नाही. राजकारणातील बेगडीपणा मी जवळून अनुभवला आहे. या त्रासामुळे रात्र रात्र झोप येत नाही. एखाद्या नेत्यावर विश्वास ठेवून प्रामाणिकपण आपण काम करतो. पक्षासाठी सातत्याने संगठन करतो तरीही ही माणसे, नेते संकुचित का होतात याचे उत्तर मिळत नाही. राजकारणात प्रामाणिकपणाचा त्रास होता मात्र हे सहन करुन पुढे जाण्य़ाशिवाय पर्याय नसल्याची उद्विग्नता महाराष्ट्र साहित्य परिषद विश्वस्त खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने सावेडी शाखा आयोजित विभागीय साहित्य संमेलनात खासदार यशवंतराव गडाख प्रकट मुलाखत पार पडली. यावेळी सुधीर गाळगीळ यांनी गडाख यांची मुलाखत घेतली. यावेळी स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया उपस्थित होते. गाडगीळ यांनी विविधांगी प्रश्नांच्या माध्यमातून गडाख यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

राजकारणातील बेगडी स्वरुपाबाबत गडाख यांनी स्पष्ट मत मांडले, ते म्हणाले, साहित्यिक माणसांचे मने जोडतात. मात्र राजकारणी जातीमध्ये तेढ निर्माण करतात. गेल्या २५ ते ३० वर्षात हे मी अनुभवले आहे. राजकारणाची प्रतिमा तर बिघडलेली आहे. राजकारण्याच्या माध्यमातून आज चांगली कामे होत नाहीत. समाजाचे नेतृत्व करणारी कार्यकर्त्यांची फळी स्वतशी केंद्रीत झाली आहे. वाढदिवसांच्या पाट्या लावणे ही कामे केली जात आहे. मुलांचे वाढदिवस साजरे करणारे पुढारी अन कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. धनशक्ती ज्याच्याजवळ आहे तो राजकारणात मोठा होत आहे. सामान्य माणूस राजकारणापासून दूर चालला आहे. यासाठी राजकारण्यांनी विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन पायंडा राजकारण्यांनी घालून देण्याची गरज आहे. पक्षातील नेत्यांशी बोलत असताना मी माझे मत स्पष्टपणाने मांडले. अनेक वेळा पक्ष फुटण्याची वेळ आली त्यावेळेही स्पष्ट बोललो. मनाला खरे वाटेल ते बोलले पाहिजे. फायदे तोट्याची विचार न करता बोलत राहिलो. या स्पष्ट बोलण्याचा त्रास झाला. राजकारणात काम करत असताना विरोधकाला शत्रू म्हणून पाहायचे नाही. त्याच्या मताप्रमाणे तो वागेल. जुन्या पिढीतील राजकारणी, कम्युनिस्ट ही विचाराने वेगवेगळ्या पक्षामध्ये होती. मात्र त्यांनी वैयक्तिक मतभेद नव्हते. राजकारणी मला शिवी वाटते. मात्र त्यांना नावे ठेवण्याची गरज नाही. विकास त्यांनीच केला. राजकारण्यांकडे सातत्याने वाईट म्हणून पाहण्याची फँशन झाली आहे.

एकीकडे कुटुंबाचे आणि समाजाच्या कठीण प्रश्नावर कसे हाताळले यावर ते म्हणाले, प्रत्येक क्षणी मी ठाम राहिलो. मुलाचे लग्न रजिस्टर पध्दतीने केले. त्यावेळी मोठा विरोध झाला. पुढा-याचे लग्न म्हणजे थाटमाट असतो. खेडेगावातील माणूस मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होतो. आपण नुसते भाषणे करण्यापेक्षा कृतीतून दाखवावे असे वाटले. रजिस्टर लग्न ही भानगड घरातील लोकांना पटवून द्यावे लागले. घरातील लग्न सामूदायिक आणि सर्वजातीधर्मांना एकत्र घेऊन केले. राजकारणात खचले नाही. खचला तो गेला. धैर्याने तोंडच द्यावे लागते असेही गडाख म्हणाले.

सरकारी कामासाठी स्वतच्या नावाची पाटी लावणारे राजकारणी

खासदार, आमदारांना निधी देण्यासाठी आमचा कायमत विरोध होता. या निधीतून आजचे पुढारी काय करतात हा प्रश्न आहे. नवनिर्मिती काहीच करत नाहीत. सरकारचा म्हणजे जनतेचा निधी खर्च करतात अन स्वतच्या नावाची पाटी लावतात. स्वतसाठी पैसा वापरतात. समाज बदल्यासाठी मूलभुत स्वरुपाच कम करण्याची गरज आहे. स्वतच्या नावाची पाटी लावून केली जाणारी धूळफेक थांबवावी, असेही गडाख म्हणाले.  

यशवंतराव चव्हाणांवेळी राजकारण्यांचा सुवर्णकाळ

यशवंतराव चव्हाण यांचा राजकारण्यांचा सुवर्णकाळ होता. त्याकाळी राजकारण्यांमध्ये निष्ठा होती. त्याच बळावर महाराष्ट्र उभा कऱण्याचे काम त्यावेळी झाले. चव्हाणांनी अनेकांना दिशा दाखवली. विचारांवरती निष्ठा ठेवणारी पिढी तयार झाली. त्यानंतर काळात हे घडलेच नाही. आज निष्ठा राहिलीच नाही, असे गडाख म्हणाले.

कारखाना उभारणीसाठी वसंतदादांनी मदत केली

मी पंचायत समितीचा सभापती होतो. आज साखर कारखाना सोपी बाब आहे. त्यावेळी हे काम अवघड होते. घरात उद्योजक नव्हते. दोन एक उस कष्ट करुन घरच्यांनी पिकविला. मात्र तो कारखान्याला गेला नाही. तेव्हा मनात विचार आला. अण्णासाहेब शिंदे यांनी मदत केली. वसंतदादांनी सर्वात जास्त मदत केली. ओळखही नव्हती तरी पण मोठा कारखाना काढण्याचा सल्ला दिला. कारखाना उभारणीबाबत गडाख म्हणाले, संघर्ष करावा लागला. एका गावच्या पाटलाकडे ३७ वेळा गेलो तरीही त्यांनी शेअर्स घेतला नाही. त्यामुळे गावातील एकानेही शेअर्स घेतले नाहीत. कारखाना उभारणीस १५ वर्षे लागले.

शेतक-यांचा प्रश्न कोणीच सोडला नाही

शेतक-यांचा कर्जबाजारीपणाचा प्रश्न आज निर्माण झाला असे नाही. अनेक पक्षांची सत्ता आली अन गेली मात्र सत्तेच्या केंद्रस्थानी कधीच शेतकरी राहिला नाही. यामुळे शेतक-यांचे प्रश्न आजही सुटू शकले नाहीत. नवीन पिढी शेती करण्यास तयार नाही. परतावा मिळत नसेल तर शेती पिकवून करायचे काय अशी भुमिका तरुणांची आहे. शेतीत उत्पादनाच्या बाबतीत मोठी क्रांती झाली पण त्याचा योग्य मोबदला मिळालेला नाही.