शूरा आम्ही वंदिले! : अतिरेक्यांचा कर्दनकाळ, सचिन साके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 04:31 PM2018-08-18T16:31:05+5:302018-08-18T16:31:24+5:30

आपल्या वडिलांपेक्षा मोठी कामगिरी करण्याचे ध्येय ठेवून सचिन सावळेराम साके यांनी बास्केटबॉल खेळात मुंबई, नागपूर, दिल्ली गाजविली़

We shouted! : Sachin's funeral | शूरा आम्ही वंदिले! : अतिरेक्यांचा कर्दनकाळ, सचिन साके

शूरा आम्ही वंदिले! : अतिरेक्यांचा कर्दनकाळ, सचिन साके

Next

आपल्या वडिलांपेक्षा मोठी कामगिरी करण्याचे ध्येय ठेवून सचिन सावळेराम साके यांनी बास्केटबॉल खेळात मुंबई, नागपूर, दिल्ली गाजविली़ आता देश गाजविण्याच्या जिद्दीने १९९६ साली सैन्य दलात भरती झाले. घरात त्यांची लगीनघाई सुरु असताना ते कारगील युद्धात उतरले. काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या लढाईत पाच पाकिस्तानी अतिरेक्यांना त्यांनी कंठस्नान घातले. मात्र शुक्रवारची ती रात्र काळरात्र ठरली़ अतिरेक्यांच्या बंदुकीतून सुटलेल्या एका गोळीने सचिन यांच्या डोक्याचा वेध घेतला अन् एकुलता एक लाडाचा लेक १७ सप्टेंबर १९९९ रोजी धारातीर्थी पडला़ कारगील युद्धातील उल्लेखनीय कामगिरीमुळे साके यांचा मरणोत्तर सेना पदक देऊन लष्करप्रमुखांनी सन्मान केला.
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ही देशासाठी लढणाऱ्या जवानांची भूमी. सावळेराम साके यांना वडिलोपार्जित दोन एकर शेती. त्यामुळे सावळेराम साके हे भारतीय सैन्य दलात भरती झाले आणि सेवानिवृत्त झाले. सावळेराम व रंभाबाई यांना शोभा ही पहिली मुलगी. त्यानंतर ३० एप्रिल १९७६ रोजी सचिन यांच्या रुपाने साके परिवारात वीर पुत्राचा जन्म झाला़ सावळेराम साके यांनी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेमध्ये नोकरी स्वीकारली. त्यामुळे सचिन यांचे बालपण नागपूरमध्ये गेले.
धरमपुरीमधील माध्यमिक शाळेत सचिनने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. बास्केटबॉल खेळाडू म्हणून सचिन यांचा नागपूर शहरात लौकिक झाला. पुढे मुंबई, दिल्ली येथे झालेले राष्ट्रीय सामने त्यांनी गाजविले. सचिन घरात सर्वांचेच खूप लाडके होते. नागपूर शहरात एखाद्या कंपनीत सचिन यांनी जॉब करावा, अशी आई-वडिलांची इच्छा होती. पण कुणाला न सांगताच सचिन यांनी बेळगाव गाठले अन् भरतीत १६ मराठा रेजिमेंट तुकडीत शिपाई म्हणून लष्कराच्या सेवेत दाखल झाले. घरी आल्यानंतर त्यांनी आई, वडिलांना सांगितले. त्यावेळी ते वडिलांना म्हणाले, ‘बाबा, तुम्ही शिपाई म्हणून नोकरीला लागले आणि शिपाई म्हणून सेवानिवृत्त झालात.
पण मी शिपाई म्हणून लागलो असलो तरी साहेब म्हणून सेवानिवृत्त होईन. मला काहीतरी वेगळे करून दाखवायचे आहे. जरी मेलो तरी माझा मृतदेह विमानानेच येईल, अशी कामगिरी करणार आहे. मला आशीर्वाद द्या.’
सचिन सैनिक म्हणून रणभूमिवर उतरले. त्यांना दºया, खोºयात फोटो काढण्याचा फार नाद. घरी आले की आई-वडिलांना ते फोटो दाखवायचे. ‘आई, तू माझी काळजी करू नको, असे आईस म्हणत असत. आई-वडील आणि बहीण शोभाने सचिनसाठी गावाकडे मुलगी पाहण्यास सुरुवात केली. इकडे लगीनघाई अन् काश्मीर खोºयात युद्धाची परिस्थिती ़ काश्मीरमध्ये अशांतता माजली. भारत- पाक यांच्यातील वाद चिघळला. १९९९ मध्ये कारगील युद्ध सुरू झाले. त्यानंतर काश्मीर खोºयात मागे राहिलेल्या आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताने रक्षक आॅपरेशन राबवले. सप्टेंबर १९९९ मध्ये काश्मीरमधील राजौरी सेक्टरच्या पहाडी क्षेत्रात अनेक अतिरेकी लपून बसले होते. या अतिरेक्यांना ठार मारल्याशिवाय पर्याय नव्हता. सचिन यांनी आपल्या रायफलमधून पाच अतिरेक्यांचा खात्मा केला. रात्रीच्या वेळी पहाडी शांतता पसरली होती. सचिन साके दरीत अतिरेक्यांवर लक्ष ठेवून होते. रात्रीची वेळ पाहून अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. अतिरेक्यांच्या एका गोळीने सचिन साके यांच्या डोक्याचा वेध घेतला अन् २३ वर्षीय सचिन साके हे १७ सप्टेंबर १९९९ रोजी शहीद झाले.
ही वार्ता समजताच श्रीगोंदा तालुका व कोळगाव परिसरात शोककळा पसरली. आई-वडील अन् बहिणीने आक्रोश केला. माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांनी कोळगाव येथे सचिन साके यांचे स्मारक बांधण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी खासदार दिलीप गांधी यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला. सचिन साके व भाऊसाहेब तळेकर यांचे स्मारक कोळगावकरांचे शक्तिस्थान बनले आहे.
‘बाबा! तुम्हाला जे जमलं नाही
‘बाबा, तुम्हाला जे जमलं नाही ते मी करुन दाखवणार आहे. साहेब होईन, तुमचे नाव अभिमानाने मिरवीन, मेलो तरी माझे प्रेत विमानातून येईल,’ असे सचिन आपल्या वडिलांना म्हणायचा अन् तसेच झाले़ सप्टेंबर १९९९ मध्ये त्याचे पार्थिव विमानातून आले अन् त्याचे ते लाडाचे बोल वारंवार आठवत राहिले, असे सांगताना वीरमाता रंभाबाई यांच्या दाटलेल्या अश्रुंचा बांध फुटला.
‘तुला चोपाळ्यावर बसवीऩ़’
सचिनला खेळण्याचा, फोटो काढण्याचा छंद होता. नागपूरमध्ये मित्रांचा गोतावळा होता. लहान मुलांची आवड होती. घरी कुत्रे पाळण्याची हौस होती. त्याने पाच कुत्रे घरी पाळली होती. खेळण्यासाठी महिना महिना बाहेर असायचा. तो घरी आला की मी रागवायचे तेव्हा म्हणायचा, ‘आई तुला चोपाळ्यावर बसवीन. तू माझी काळजी करू नकोस. तू वेळेवर जेवत जा...’ आता घरासमोर चोपाळा आहे, पण कशी बसणार? एकुलतं एक माझे लेकरू गेलं़ त्याच्या आठवणीशिवाय दिवस मावळत नाही. सचिन जीवनात जिंकला. आम्ही मात्र हरलो, असे म्हणतच वीरमाता रंभाबाई यांना अश्रू दाटून आले.
सेना पदक आणि दिल्लीत अश्रूंचा पूऱ़़
सचिन शहीद झाल्यानंतर दिल्लीला सेना पदक स्वीकारण्यासाठी गेले. त्यावेळी पदक स्वीकारताना लता मंगेशकर यांनी गायिलेले ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गीत आठवले. ते पदक पाहून खूप रडले. शासनाने आम्हाला खूप दिले. पण मानवी आधार मिळाला नाही. गेल्या वर्षी पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता मुलगी शोभा व जावई तुकाराम हे मायेचा ओलावा देण्यासाठी पुण्यातील घरदार सोडून माझ्याबरोबर राहतात. सचिनची आठवण मरेपर्यंत येत राहणार, अशी भावना वीरमाता रंभाबाई यांनी व्यक्त केली.
शिपाई सचिन सावळेराम साके
जन्मतारीख ३० एप्रिल १९७६
सैन्यभरती २६ आॅक्टोबर १९९६
वीरगती १७ सप्टेंबर १९९९
वीरमाता रंभाबाई सावळेराम साके

Web Title: We shouted! : Sachin's funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.