वडगाव पान : संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या वडगाव पान ग्रामपंचायतीचे तत्कालिन प्रभारी ग्रामसेवक डी. एस. नवले यांनी अडीच लाख रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास संगमनेर पंचायत समितीकडून टाळाटाळ सुरू आहे.
२६ नोव्हेंबर २०१५ ते १० मार्च २०१६ या तीन महिन्यांच्या काळात नवले यांच्याकडे वडगाव पान ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार असताना त्यांनी ग्रामपंचायत निधीमधील १ लाख ४७ हजार ६३ रुपये व पाणीपुरवठा निधीतील ७४ हजार असे एकूण २ लाख ४९ हजार ६५२ रुपयांचा प्रमाणकाशिवाय अपहार केल्याचे पंचायत समितीचे विस्ताराधिकारी एस.एल. डोखे यांनी केलेल्या चौकशीत प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यानुसार संगमनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ५७ च्या पोटकलम (३) नुसार ग्रामनिधी व ग्राम पाणीपुरवठा निधी व ग्रामपंचायतीच्या नावे वेळोवेळी मिळणा-या इतर रकमांच्या सुरक्षित अभिरक्षेसाठी पाणीपुरवठा समितीचे सचिव व सरपंच हे संयुक्तपणे जबाबदार असतील, अशा आशयाच्या नोटिसा संबंधितांना बजावल्या. परंतु आर्थिक अपहार होऊन एक वर्ष उलटले असतानाही आतापर्यंत पंचायत समितीने या ग्रामसेवकाच्या अपहाराची दखल घेतलेली नाही. तत्कालीन सरपंच शोभा यशवंत थोरात यांनी कारवाईसाठी वेळोवेळी गटविकास अधिका-यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु आतापर्यंत नवले यांच्याविरुद्ध गटविकास अधिका-यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
तत्कालीन सरपंच थोरात यांनी वेळोवेळी गटविकास अधिका-यांना नवले यांच्या कार्यकाळातील आर्थिक अपहाराची त्वरित चौकशी करण्यात यावी, असे लेखी पत्र देऊनदेखील पंचायत समिती कार्यालयामार्फत जाणीवपूर्वक चालढकल केली जात आहे.
तसेच वाडगाव पानच्या ग्रामसभेत वेळोवेळी हा विषय चर्चिला गेला. तसेच त्याचा अहवाल पंचायत समितीस पाठविण्यात आला आहे. पण पंचायत समितीकडून याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.