Sujay Vikhe: खासदार सुजय विखेंचा यु टर्न, शिवसेनेला साथ देणार विधानावरुन पलटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 09:36 AM2022-06-13T09:36:36+5:302022-06-13T10:08:46+5:30

शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होते.

Sujay Vikhe: MP Sujay Vikhe's U-turn, reverses statement to support Shiv Sena | Sujay Vikhe: खासदार सुजय विखेंचा यु टर्न, शिवसेनेला साथ देणार विधानावरुन पलटी

Sujay Vikhe: खासदार सुजय विखेंचा यु टर्न, शिवसेनेला साथ देणार विधानावरुन पलटी

googlenewsNext

मुंबई/अहमदनगर - भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील मतभेद प्रचंड वाढले आहेत. दोन्ही पक्षातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसतात. त्यातच, राज्यसभा निवडणुकीतही भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगला होता. त्यातच, अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिवसेनेला साथ देणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. मात्र, 24 तासांतच त्यांनी आपल्या विधानावरुन पलटी मारल्याचे दिसून आले. याबाबत, त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. 

शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होते. परंतु, राज्याच्या राजकारणाशी त्याचा संबंध जोडून विपर्यास केला गेला. जिल्ह्यात राजकीय निर्णय घेताना प्रदेश भाजपा पदाधिकाऱ्यांचाच अंतिम आदेश मानला जाईल, असे स्पष्टीकरण खासदार सुजय विखे पाटील यांनी नंतर दिले. 

पारनेर तालुक्याच्या बदलत्या राजकीय वातावरणात शिवसैनिकांवर होत असलेला अन्याय तसेच राज्यात आघाडी सरकार असतानाही तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विचार होत नाही. हे सर्व पाहाता या कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहाण्याची किंवा त्यांना बरोबर घेवून जाण्याच्या दृष्टीने आपण ते भाष्य केले होते. मात्र, माझ्या वक्तव्याचा थेट राज्यातील राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. 

पारनेर येथील एका कार्यक्रमात बोलताना सुजय यांनी शिवसेनेचं कौतुक केलं होतं. मला निवडून आणण्यात शिवसैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तसेच, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही निशाणा साधला होता. "मी खासदार म्हणून निवडून येण्यात 50 टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेविरोधात बोललो नाही. माझे आजही हेच मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरुन ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे" असंही विखे म्हणाले.

'पक्षाने कारवाई केली तरी चालेल' - सुजय विखे

पारनेर तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुजय विखे बोलत होते. ''राज्यात परिस्थिती काहीही असो, पण नगर जिल्ह्यात णी शिवसेनेसोबत राहणार. केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. जेव्हा केव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटे सोडणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल," असे सुजय विखे म्हणाले.

'शिवसेनेवर कधीही टीका करणार नाही'

ते पुढे म्हणतात की, "असं थेट बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपचा एकमेव खासदार आहे. मी येथील राजकारण ओळखतो. येथे विचारांचा वारसा आहे. तो वारसा टिकविण्यासाठी असे निर्णय घेणे आवश्यक आहे. यावर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे मला सांगता येणार नाही. मात्र, शिवसेनेने येथे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असेल. येणाऱ्या काळात कोणाची कशी आघाडी होणार हे माहिती नाही. मात्र, मी मात्र शिवसेनेसोबत राहण्यास ठाम आहे. यापुढे माझ्या तोंडून कधीही शिवसेनेवर टीका होणार नाही, याची ग्वाही देतो ", असेही ते म्हणाले.
 

Web Title: Sujay Vikhe: MP Sujay Vikhe's U-turn, reverses statement to support Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.