प्रगतीशील शेतकऱ्याची यशकथा; केवळ २० गुंठ्यात हळद लागवड ते पावडर निर्मिती करून कमावले लाखो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:32 PM2019-01-01T12:32:36+5:302019-01-01T12:32:43+5:30

यशकथा : नोकऱ्या दुरापास्त झाल्याने नोकरीच्या मागे न धावता त्यांनी शेतातूनच सोने पिकविण्याचा निर्धार करून शेती करणे सुरू केले.

The success story of the progressive farmer; Millions earned by producing turmeric powder in just 20 guntha | प्रगतीशील शेतकऱ्याची यशकथा; केवळ २० गुंठ्यात हळद लागवड ते पावडर निर्मिती करून कमावले लाखो

प्रगतीशील शेतकऱ्याची यशकथा; केवळ २० गुंठ्यात हळद लागवड ते पावडर निर्मिती करून कमावले लाखो

googlenewsNext

- यमन पुलाटे ( अहमदनगर) 

प्रगतिशील शेतकरी हे नेहमी आपल्या शेतीमध्ये वेगळे प्रयोग करीत असतात. उसाच्या पट्ट्यात हळद लागवडीचा आगळा-वेगळा प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील लोणी, ता. राहाता  येथील शेतकरी संजय सोपान घोगरे यांनी केला. आपल्या शेतीत हळद लागवडीबरोबरच ते थेट हळद पावडर निर्मिती करतात. मार्केटिंग करून हळद पावडर विक्री करून २० गुंठ्यातून लाखोंची कमाई करीत आहेत.

संजय घोगरे हे तसे पदवीधर आहेत. नोकऱ्या दुरापास्त झाल्याने नोकरीच्या मागे न धावता त्यांनी शेतातूनच सोने पिकविण्याचा निर्धार करून शेती करणे सुरू केले. शेतीत राहून काही तरी वेगळे करायचे ही त्यांची जिद्द म्हणून ऊस, हंगामी पिके, चारा पिके, भाजीपाला आदी पिके घेत असताना आपल्या भागात देखील हळद लागवड होऊ शकते याची माहिती बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राकडून मिळाली. मग हळद लागवड करण्याचा निर्णय २००८ मध्ये त्यांनी घेतला. हळद पावडर तयार करण्यासाठी हळदीची चांगली जात त्यांनी निवडली.

सुरुवातीला ११ कंदापासून त्यांनी सुरुवात केली. २०१० मध्ये २० बेणेमळा तयार झाल्यानंतर त्यांनी २० गुंठ्यांवर हळद लागवडीचा निर्णय घेतला. या क्षेत्राची चांगली मशागत करून दोन ते तीन ट्रॅक्टर ट्रॉली शेण खताचा वापर करून सुरुवातीला चांगली मशागत केली. साडेचार फुटावर बेड पद्धत वापरून १४ इंचावर कंद लागवड करताना रासायनिक आणि जिवाणू खतांची बेणे प्रक्रिया केली. यामुळे उगवण चांगली झाली. पुढे कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, शांताराम सोनवणे, भरत दवंगे, सुनील बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि रोग कीड नियंत्रण केले.

सुरुवातीपासून सेंद्रिय खतावर जास्त भर देत गांडूळ खत, निंबोळी पेंड आणि स्लरीबरोबरच वर्मीवॉशचा वापर त्यांनी या पिकासाठी केला. यामुळे खर्च कमी करून २० गुंठ्यांमध्ये २ टन वाळलेल्या हळदीचे उत्पादन घेतले. यामध्ये पत्नी अनिता हिची मोठी साथ मिळाली. तिने एका फाऊंडेशनमार्फत साईश्री महिला बचत गटाची स्थापना केली. मार्केटिंगला या बचत गटाची चांगली मदत झाली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, प्रकल्प संचालिका रुपाली लोंढे यांचेही मार्गदर्शन घोगरे यांना लाभले. दोन टन हळद दरवर्षी निर्मिती करून ती विक्री करण्याचे कसब हे दाम्पत्य करीत आहे. घरगुती पद्धतीने तयार केलेली हळद ते विविध प्रदर्शनात किंवा मोक्याच्या ठिकाणी स्टॉल लावून, मार्केटिंग करतात. त्यांच्या या उपक्रमामुळे बचत गटाच्या महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. घोगरे यांनी साईसागर हा नवा ब्रॅन्ड विकसित केला आहे. यातून दरवर्षी लाखो रुपयांची कमाई ते करीत आहेत. शेतकऱ्यांनी केवळ पिकाचे उत्पादन घेऊन थांबू नये, तर त्यापासून उत्पादने बनवून ती विक्री करण्याचे कसब आत्मसात केले पाहिजे, मार्केटिंगमध्ये उतरून आपली प्रगती साध्य केली पाहिजे, असे मत संजय घोगरे हे अभिमानाने व्यक्त करतात.

Web Title: The success story of the progressive farmer; Millions earned by producing turmeric powder in just 20 guntha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.