लघुपटाची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 03:02 PM2018-08-06T15:02:47+5:302018-08-06T15:02:54+5:30

मागील भागामध्ये आपण लघुपटांच्या विषयाबाबत चर्चा केली. या भागात लघुपटाच्या कथेबाबत चर्चा करूयात.

Short story | लघुपटाची कथा

लघुपटाची कथा

Next

प्रा. बापू चंदनशिवे
मागील भागामध्ये आपण लघुपटांच्या विषयाबाबत चर्चा केली. या भागात लघुपटाच्या कथेबाबत चर्चा करूयात. लघुपटाचा विषय व कथा विस्तार याचा आवाका मुळातच कमी किंवा मर्यादित स्वरूपाचा असतो. त्याची कथा आटोपशीर, एखाद्या लहान घटनेबाबत परिणामकारक पद्धतीने भाष्य करणारी असायला हवी. लघुपटामध्ये एकाच वेळी खूप काही सांगता येत नाही. कारण त्याला प्रामुख्याने वेळेची मर्यादा असते. त्यामुळे लघुपटाची कथा ही जास्तीत जास्त छोटी पण प्रभावी असायला हवी. लघुपटाची मूळ कथा खूप कमी वेळा लिहिलेली असते. एखादा लघुपटकार थेटपणे पटकथाच लिहितो. तो पाच-दहा ओळीचा सारांश लिहितो. त्याच्या आधारेच तो पटकथा लिहितो. कारण लघुपटकाराला एखाद्या मूळ कथेवरून पटकथा लिहिणे अवघड जाते. खरेतर माध्यमांतर करणे हे एक कला व कौशल्याचे काम आहे. ते प्रत्येकालाच जमेल असे नसते. बहुतांश लघुपटकार हे नव्यानेच दृकश्राव्य माध्यम प्रकारात उतरलेले असतात. त्यामुळे त्यांना एखाद्या कथेवरून लघुपटाची पटकथा लिहिणे अवघड जाते. त्यामुळे बहुतांश लघुपटकार आपल्या मनात असलेली घटना किंवा कथा ही लघुपटाची कथा बनवतात. त्याचेच ते पटकथेत रुपांतर करतात. या ठिकाणी मात्र लघुपट या माध्यमाची बलस्थाने, विषय व व्यापकतेवर असलेल्या मर्यादा याचा विचार करावा लागतो. कारण लघुपटांना आजही व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे त्यातून नफा मिळविणे असा हेतू असत नाही. लघुपटाची कथा ही कमीत कमी पात्रांची मागणी असणारी असावी. त्यामध्ये शक्यतो साहित्यिक, कलात्मक व सृजनात्मक मूल्य असणे आवश्यक असते. कथा विनाकारण लांबणारी, अधिक संवाद असणारी, नाटकी किंवा मुख्य पात्रांची संख्या अधिक असणारी नसावी. असे झाल्यास लघुपटातील सिनेमॅटीक मूल्य लोप पावण्याची अधिक शक्यता असते. चांगला लघुपट हा कमी लांबीचा, कमी संवादाचा, कमीत कमी पत्रांचा, एकाच कथेभोवती फिरणारा व उपलब्ध तंत्रज्ञाचा त्यामध्ये उत्तम उपयोग झालेला असतो. एकाच कथेमध्ये जर विनाकारण उपकथा जोडल्या तर मुख्य कथा उपलब्ध वेळेत सांगून होत नाही. प्रेक्षकांना काय सांगायचे आहे? हे कथा निवडतानाच ठरलेले असले पाहिजे.
जे सांगायचे अर्थात दाखवायचे आहे, त्यामध्ये नेमकेपणा असायला पाहिजे. एखाद्या साहित्यिकाच्या कथेवरून लघुपट बनविला जावू शकतो. पण शब्द माध्यम ते चित्रपट माध्यम यामधील फरक व दोन्ही माध्यमातील जमेच्या बाजू पटकथाकाराला व दिग्दर्शकाला माहित असणे आवश्यक आहे. साहित्य व सिनेमा यांच्या मांडणीमध्ये व सादरीकरणामध्ये मूलभूत फरक आहे, तो माध्यमांतर करताना लक्षात घ्यावा लागतो. मूळ कथेमध्ये दृश्य माध्यमाला मारक ठरणारा भाग पटकथा लिहिताना वगळणे गरजेचे ठरते. तसे केल्यास पटकथा वेगवान होते. कथेमध्ये बऱ्याचवेळा संवादातून गोष्ट सांगितली जाते. लघुपटामध्ये मात्र कथा दृश्याच्या माध्यमातून सांगणे आवश्यक असते. म्हणजेच लिखित स्वरूपातील कोणत्याही कथेमध्ये काही मूळत: काही सिनेमाची तत्वे भरलेली असावी लागतात. कथेतील वेगळेपण हेच लघुपट बनविण्यासाठी प्रेरक गोष्ट असायला हवी. उत्तम लघुपटांची मूळ कथा चांगली असते. त्याचे पटकथेत चांगले रूपांतरण झाल्यास व चित्रिकरण, दिग्दर्शन व संकलन यांचा उत्तम मेळ बसल्यास लघुपट पाहण्यालायक होण्यास मदत होते हे मात्र नक्की.

फिल्मोस्कोपी भाग- २०

Web Title: Short story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.