शूरा आम्ही वंदिले : सहा तास मृत्यूशी दोन हात, हवालदार भास्कर बोदडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 04:45 PM2018-08-16T16:45:47+5:302018-08-16T16:50:16+5:30

भास्कर बोदडे २००२ मध्ये राजस्थानमधील बिकानेरमध्ये तैनात होते. तेथील रणजितपुरा सेक्टरमध्ये त्यांची दैनंदिन ड्यूटी असे. हा भाग पाकिस्तानी सीमेवर येत असल्याने तेथे सैनिकांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो.

Shoora We Vandil: Two hours with the death of six hours, Havaldar Bhaskar Bolde | शूरा आम्ही वंदिले : सहा तास मृत्यूशी दोन हात, हवालदार भास्कर बोदडे

शूरा आम्ही वंदिले : सहा तास मृत्यूशी दोन हात, हवालदार भास्कर बोदडे

Next
ठळक मुद्देहवालदार भास्कर बोदडेजन्मतारीख     १९६२ सैन्यभरती    १९८२वीरगती   २९ मे २००२सैन्यसेवा   २० वर्षेवीरपत्नी    सुमित्रा बोदडे

भास्कर बोदडे २००२ मध्ये राजस्थानमधील बिकानेरमध्ये तैनात होते. तेथील रणजितपुरा सेक्टरमध्ये त्यांची दैनंदिन ड्यूटी असे. हा भाग पाकिस्तानी सीमेवर येत असल्याने तेथे सैनिकांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो. असेच एके दिवशी भास्कर बोदडे त्यांच्या अन्य सहकाऱ्यांसह सीमारेषेवरील वाळवंटातून रणगाड्यातून रेकी करत होते. ते स्वत: कमांडर होते. त्यांच्यासह रणगाड्याचा पायलट व गनर असे तिघे रणगाड्यातून जात असताना वाळवंटातील एका तीव्र उतारावर रणगाडा घसरून उलटला गेला. त्या रणगाड्याखाली बोदडे गाडले गेले. त्यांचे इतर दोन सहकारी या अपघातातून बचावले. मात्र बोदडे यांच्या अंगावर तब्बल १५ टनांचा रणगाडा होता. एवढ्या अवाढव्य रणगाड्याला हलवणे शक्य नव्हते, त्यामुळे बचाव पथकाने रणगाड्याच्या सभोवतालची रेती उकरून सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर बोदडे यांना बाहेर काढले. तोपर्यंत ते जीवंत होते. परंतु त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूलाही तब्बल सहा तास थांबवून ठेवणारे बोदडे देशासाठी शहीद झाले.
भास्कर श्रीपद बोदडे यांचे कुटुंबीय सध्या वाकोडी फाटा (ता. नगर ) येथे स्थायिक आहे. त्यांचा जन्म बटवाडी (ता. बाळापूर, जि. अकोला) येथे १९६२ मध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. तिघे भाऊ व एक बहीण असे हे चौघे भावंडं. घरची आर्थिक स्थिती हलाखीची होती. परंतु भास्कर यांना लहानपणापासूनच सैन्याचे आकर्षण असल्याने ते भरतीच्या तयारीला लागले. घरात तसा सैन्याचा वारसा नव्हताच. त्यामुळे सैन्य भरतीचे मार्गदर्शन त्यांना मिळत नव्हते. परंतु मोठ्या जिद्दीने, परिश्रमाने त्यांनी अखेर वयाच्या विसाव्या वर्षी आपले स्वप्न पूर्ण केलेच. नागपूर येथे एका भरती मेळाव्यात ते सैन्यात दाखल झाले. त्यावेळी गावातून सैन्यात जाणारे भास्कर एकमेव होते. परिणामी गावाला मोठे कौतूक झाले. आपला भास्कर सैन्यात देशाचे प्रतिनिधित्व करणार, गावाच्या सुपूत्राला देशसेवा करण्याची संधी मिळणार हा अनुभवच सर्वांसाठी आगळावेगळा होता.
त्यानंतर अहमदनगर येथील लष्कराच्या २० मॅकॅनाईज्ड इफ्रंट्री रेजिमेंट सेंटरमध्ये (एमआयआरसी) त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. नऊ महिन्यांच्या खडतर मूलभूत प्रशिक्षणानंतर त्यांनी पुढे एमआयआरसीमध्येच अत्याधुनिक प्रशिक्षण पूर्ण केले.
१९८७ मध्ये त्यांचा विवाह सुमित्रा यांच्याशी झाला. देशातील पठाणकोट, श्रीनगर, जम्मू, बबिना, जोधपूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी कर्तव्य बजावले.
भास्कर बोदडे २००२मध्ये राजस्थानमधील बिकानेरमध्ये तैनात होते. बिकानेर हा राजस्थान प्रांतातील वाळवंटी प्रदेश. पाकिस्तानची सीमा बिकानेरला लागूनच असल्याने येथे मोठे सैनिकी युनिट आहे. सपाट वाळवंटी भूभाग असल्याने वाळवंटाखालून खोदकाम करत रात्रीच्या वेळी पाकिस्तानी हद्दीतून घुसखोरी करण्याचे प्रमाण येथे जास्त आहे. त्यामुळे या भागात सैनिकांकडून रात्री कडक पहारा दिला जातो. त्यावेळी नुकतेच कारगील युद्ध संपले होते. त्यामुळे पाकिस्तानलगतच्या सर्वच सीमांवर तणावाचे वातावरण होते. भारतीय सैनिक हे जम्मू काश्मीरपासून पंजाब, राजस्थान, गुजरातपर्यंतच्या सर्वच पाकिस्तानी सीमांवर डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. त्यावेळी या मोहिमेला ‘आॅपरेशन पराक्रम’ म्हणून संबोधले गेले.
२९ मे २००२ रोजी भास्कर बोदडे बिकानेरमधील रणजितपुरा सेक्टरमध्ये तैनात होते. रात्रीच्या वेळी येथे लष्कराकडून संशयित भागात रणगाड्यातून पाहणी केली जाते. अशाच पाहणीसाठी भास्कर बोदडे व त्यांचे अन्य दोन साथीदार रात्री साडेनऊच्या सुमारास सीमारेषेकडे निघाले. ते स्वत: कमांडर होते. त्यांच्यासह रणगाड्याचा पायलट व गनर असे तिघे रणगाड्यातून जात असताना वाळवंटातील एका तीव्र उतारावर रणगाडा घसरला. पायलटने संपूर्ण कौशल्य पणाला लावून रणगाडा पुढे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वाळूमुळे त्याला यश येत नव्हते. पायलट व गनर हे दोघे रणगाड्यात आत होते, तर बोदडे हे रणगाड्यात उभ्या स्थितीत होते. त्यामुळे त्यांच्या शरीराचा अर्धा भाग रणगाड्यात, तर पोटापासून डोक्यापर्यंतचा वरचा भाग रणगाड्याबाहेर होता. तेथून ते पायलटला योग्य सूचना करत होते. परंतु रणगाडा घसरतच होता. काही वेळातच रणगाडा तब्बल ९० अंशात झुकला. परंतु तरीही बोदडे यांनी आपली जागा सोडली नाही. रणगाडा सरळ करण्याचे पायलटचे प्रयत्न अयशस्वी ठरले अन् पुढच्या काही क्षणातच रणगाडा पूर्णपणे उलटला गेला.
बोडदे त्याखाली गाडले होते. इतर दोन सहकारी रणगाड्यात असल्याने ते किरकोळ जखमी झाले. रणगाड्यातील वायरलेस यंत्रणेद्वारे ही खबर पायलटने त्वरित हेडक्वॉटरला कळवली. क्षणाचाही विलंब न करता अगदी काही मिनिटांतच सैनिकांचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. रगणाड्याचे वजन तब्बल १४ ते १५ टन होते. त्यामुळे रणगाडा क्रेनने उचलणे केवळ अशक्य होते. बचाव पथकाने प्रथम रणगाड्यातील पायलट व गनरला कडेच्या भागातून बाहेर काढले. परंतु बोदडे यांचे अर्धे शरीर वाळूत घुसलेले असल्याने त्यांच्या बचाव कार्यात अडथळे येत होते. रणगाडा उचलणे शक्य नसल्याने सैनिकांनी रणगाड्याच्या एका बाजूने खोदकाम सुरू केले. त्या बाजूने पूर्ण खोदाई करून खालून त्यांना बाहेर काढण्याचा एकच पर्याय समोर होता. त्याचीच अंमलबजावणी सुरू झाली. रात्रीचे दहा वाजले होते. तब्बल सहा तास खोदकाम करून सैनिकांनी रणगाड्याची एक बाजू मोकळी केली. बचाव पथकाला अखेर बोदडे यांचे शरीर हाताला लागले. त्यानंतर पथकाचे काम आणखी जोमाने सुरू झाले. ‘बोदडे साहब आप ठिक तो हो, घबराए नही, हम आपको बचा लेंगे’ अशा आरोळ्या देत पथकातील सैनिक बोदडे यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. अखेर सर्वांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी बोदडे यांना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी त्यांचा श्वास सुरू होता. त्यामुळे पथकाच्या जीवात जीव आला. त्यांनी विजेच्या चपळाईने बोदडे यांना दवाखान्यात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान बोदडे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. मृत्यूलाही तब्बल सहा तास थांबवून ठेवणारे बोदडे देशासाठी शहीद झाले.
दोन्ही मुलेही सैन्यात
शहीद भास्कर बोदडे यांना रवि, अवि व दिनेश अशी तीन मुले आहेत. त्यातील दोघांनी आपल्या वडिलांचा सैन्य वारसा पुढे चालू ठेवला आहे. सध्या दोघेही सैन्यात आहेत. तर दिनेशही सैन्यात अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. रवि यांची सैन्यात नऊ वर्षे सेवा झाली असून त्यादरम्यान २०१७ मध्ये त्यांनी सुदान येथे शांतीसेनेत कामगिरी केली आहे. अशा प्रकारे हे संपूर्ण कुटुंबच देशासाठी योगदान देत आहे.

शब्दांकन : चंद्रकांत शेळके

 

 

Web Title: Shoora We Vandil: Two hours with the death of six hours, Havaldar Bhaskar Bolde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.