शिवसेनेत आयारामांनाच मोठेपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:41 PM2019-06-21T12:41:25+5:302019-06-21T12:43:47+5:30

शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना डावलून आयाराम व धनदांडग्यांना मोठेपण दिल्याची भावना निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये आहे.

Shiv Sena is the dignity of the kings! | शिवसेनेत आयारामांनाच मोठेपण!

शिवसेनेत आयारामांनाच मोठेपण!

Next

शेखर पानसरे
संगमनेर : शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना डावलून आयाराम व धनदांडग्यांना मोठेपण दिल्याची भावना निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये आहे. नगरपालिकेच्या प्रभाग दहाच्या पोटनिवडणुकीत सेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली आहे.
संगमनेरच्या शिवसेनेत निष्ठावानांचा एक गट, धनदांडग्यांचा दुसरा गट, तर आयारामांचा तिसरा गट असे उघड-उघड चित्र दिसत आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर काम करणारा तळागाळातील शिवसैनिक आजही आहे तेथेच आहे. १९९५ पासून शिवसेनेकडे असणारा हा मतदारसंघ कायमच आयाराम व धनदांडग्यांसाठी संधी ठरला आहे. अ‍ॅड. बापूसाहेब गुळवे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे होते. दोन विधानसभा ते शिवसेनेकडून लढले आणि पुन्हा ते काँग्रेसवासी झाले. सध्या ते विखेंसोबत आहेत. बाबासाहेब कुटे हे नाव कोणाला माहित नव्हते. परंतु २००९ ला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. तालुकाध्यक्ष पदावर राहून शिवसेनेवर त्यांनी ताबा मिळवला व नंतर गायब झाले. उद्योजक असल्याने पुन्हा ते व्यवसायात स्थिरावले. राजकारणापासून चार हात लांब राहिले. अशातच अनेक वर्ष मधुकरराव पिचड यांचे निष्ठावान म्हणून काम केलेले जनार्दन आहेर हे राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आणि थेट विधानसभेची निवडणूक लढवली. यात त्यांचा पराभव झाला.
अप्पासाहेब केसेकर, कैलास वाकचौरे, अमर कतारी यांच्यासारखे ज्येष्ठ व निष्ठावान शिवसैनिक मात्र, फरफटत गेले. त्यांना कधी तिकीट नाकारले गेले तर कधी त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. सोशल माध्यमातून आरोप प्रत्यारोप करणारे अनेकजण सध्या स्वत:ला शिवसेनेचे नेते समजतात. मध्यंतरी शरद थोरातही शिवसेनेत सामिल झाले. तर अनेक वर्षे काँग्रेसमध्ये जाऊन सत्तापदे भोगून जयंत पवार शिवसेनेत परतले. शिवसेनेतील सध्याच्या निर्णयप्रक्रियेतही तथाकथित आयाराम महत्वपूर्ण भूमिका निभावताना दिसतात.
शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. मात्र, या निष्ठेची कदर होत नसल्याने एक प्रकारची मरगळ संघटनेत जाणवते. आयारामांना मोठेपण ही सेनेची प्रतिमा कायम आहे.
आयरामांसाठी प्रामाणिक शिवसैनिकांनी कायम पायघड्या घातल्या हा देखील इतिहास आहे. राधाकृष्ण विखेंना १९९६ मध्ये शिवसेनेने राज्यात मंत्रीपद दिले. दिवंगत खासदार बाळासाहेब विखे हे देखील तेव्हा केंद्रात मंत्री होते. त्यांनी १९९९ मध्ये शिवसेना सोडली व काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तेव्हापासून शिवसैनिकांनी त्यांचा विरोध केला. अगदी काल-परवापर्यंत विखेंना विरोध करणारे आज त्यांच्या बाजूने उभे आहेत.

 

Web Title: Shiv Sena is the dignity of the kings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.