कडक थंडीत कोटीच्या गप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 03:08 PM2019-01-09T15:08:01+5:302019-01-09T15:09:04+5:30

महापालिकेसाठी ९ डिसेंबरला मतदान झाले आणि १० डिसेंबरला महापालिकेचा निकाल लागला. या घटनेला आता एक महिना पूर्ण झाला तरीही कोणी किती पैसे वाटले

Rough chat chats | कडक थंडीत कोटीच्या गप्पा

कडक थंडीत कोटीच्या गप्पा

Next

सुदाम देशमुख
अहमदनगर : महापालिकेसाठी ९ डिसेंबरला मतदान झाले आणि १० डिसेंबरला महापालिकेचा निकाल लागला. या घटनेला आता एक महिना पूर्ण झाला तरीही कोणी किती पैसे वाटले, याची चर्चा काही थांबलेली नाही. एरव्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेच विषय प्राधान्याने चर्चेत असतात. कोण, कोणती निवडणूक लढविणार, याच्याही चर्चा जोरात रंगत आहेत. एक महिना झाला तरी महापालिका निवडणुकीत पैसे वाटपाच्या गप्पांचे फड सुरूच आहेत. याहीपेक्षा महापौर निवडणुकीत किती पैसे कोणाला मिळाले,याचे जो तो आपापले अंदाज लावत आहे.
प्रभागातील विकास कामे, लोकांसमोर नम्र राहणे आणि मतदानाच्या वेळी प्रसंगी पैसेही वाटप करणे, याशिवाय आजकाल कोणी निवडून येत नाही. श्रीपाद छिंदम का निवडून आला आणि जयंत येलूलकर यांच्यासारखे रसिक का पडले? याचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे पैसा. काही उमेदवारांनी भरपूर पैसे वाटप केल्याचे सांगितले जाते, मात्र पाच-पन्नास मतदारांपर्यंत पोहोचले नाही तरी त्यांचे नुकसानच झाल्याचे दिसून आले. म्हणजे पैसे वाटपही शत-प्रतिशत झाले तरच उमेदवार निवडून येतो. काही मोजक्या प्रभागात मतदारांनी पैसे न घेता मतदान केले, तो भाग वेगळा. एका प्रभागात किमान १५ हजार मतदार होते. त्यांना प्रत्येकी एका उमेदवाराने दोन हजार रुपये दिले तर तीन कोटी रुपये एका उमेदवाराची होते. चार उमेदवारांचे मिळून बारा कोटी होतात. समोरच्या पॅनलकडून तेवढेच दिले गेले असे गृहित धरले तर एका प्रभागात २४ कोटी वाटप झाले असे समजता येईल. एकूण १७ प्रभागातील ही रक्कम जवळपास चारशे कोटीच्यापुढे सरकते. हा केवळ अंदाज आहे. हा आकडा कमी-जास्त होवू शकतो. म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तीनशे कोटी शहराला देण्याचे कबुल दिले. खर्च चारशे कोटी आणि मिळणार तिनशे कोटी, हा हिशेबही तसा जुळणारच नाही. याशिवाय महापौर निवडणुकीत किती कोटी खर्च झाले, याचेही अंदाज व खर्च वेगळा आहे. त्रिशंकू स्थिती झाल्याने खर्चाचा आकडा आणखीनच वाढला. महापौर निवडणुकीत किती खर्च येईल, हे शिवसेनेच्या भूमिकेवरच खरे अवलंबून असते. शिवसेनेचा महापौर झाल्यास, युती किंवा आघाडी झाल्यास एवढा खर्च येत नाही. मात्र सध्याचे महापौर हे बिग बजेट महापौर म्हणावे लागतील.
महापौरांनी किती कोटी रुपये खर्च केले, याचे जो तो अंदाज बांधत आहे. खरा आकडा सांगायला कोणीच तयार नाही. महापौर निवडणुकीत कोण कोणासोबत गेला, याची विश्लेषणे होत राहतील, मात्र सर्वच नगरसेवक पैशांसोबत गेले, हेच सत्य आहे. पैशांच्या ‘पॉवर’पेक्षा पवारांची पॉवरही फिकी पडली. ‘पैसा खुदा नही, लेकिन खुदा से कम नही’ असे म्हटले जाते. केवळ पैशांच्या बळावरच नगरचा महापौर झाला. महापौरपदाची माळ गळ््यात पडल्यानंतर मग सगळेच धावून आले. भाजपचा महापौर झाला ही कमाल ना काकांची, ना दादांची ना, भैय्यांची ना महाजनांची! ही कमाल फक्त बाबासाहेब वाकळे यांचीच आहे. पैसा सगळे काही मॅनेज करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळेच भाजपचा महापौर झाला, हे सांगायची गरज नाही. ‘अशक्य ते शक्य करणारे महापौर’, असे फलक शहरात झळकले आहेत. यातच सारे काही आले. शिवसेनेच्या बैठकीतही महापौर कोण होणार? हा प्रश्न रामदास कदम यांनी विचारला होता. त्यावेळी सर्वांचेच हात खाली होते. मग सिनिअर कोण? हा दुसरा प्रश्न कदम यांनी विचारला आणि बाळासाहेब बोराटे यांनी हात वर केला. त्यांनाही कोटीभर खर्च करावा लागल्याची चर्चा आहे. या सगळ््या गोंधळात बसपाचे चार हत्ती नशिबवान ठरले. सर्वात महागडा हत्ती नगरमध्ये पहायला मिळाला. त्यांच्या खालोखाल पंजानेही आपले नशिब उजळवले. नगरचा पारा आठ अंशाच्या खाली आहे. या कडाक्याच्या थंडीत शेकोट्या पेटल्या आहेत. शेकोटी विझली तरी राखेत काड्या ओढत निवडणुकीच्या चर्चा अधिकच खुलत आहेत.


 

 

Web Title: Rough chat chats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.