शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीकडून विधानसभा लढविणार - किरण काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 03:56 PM2019-05-28T15:56:58+5:302019-05-28T15:58:19+5:30

मागील तीस वर्षांपासून शहर विकासापासून वंचित आहे. काही संधीसाधू नेते राजकीय भांडवल करीत स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहेत.

NCP will contest the assembly elections for the development of the city - Kiran Kale | शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीकडून विधानसभा लढविणार - किरण काळे

शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीकडून विधानसभा लढविणार - किरण काळे

Next

अहमदनगर : मागील तीस वर्षांपासून शहर विकासापासून वंचित आहे. काही संधीसाधू नेते राजकीय भांडवल करीत स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहेत.
यामुळे नगरची राज्यभर बदनामी झाली असून याबद्दल सामान्य नगरकरांच्या मनात तीव्र संताप आहे. या नेत्यांना आता जनता वैतागली असून नगरकरांना अपेक्षित असणारा सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठी मी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
शहराच्या विकासासाठी आणि नगरकरांच्या मानगुटीवर बसलेल्या तथाकथित नेत्यांच्या तावडीतून शहराची कायमची सुटका करण्यासाठी नगरकरांचे ऐतिहासिक जनआंदोलन उभारून निर्णायक लढाई लढणार असल्याचे आणि त्यासाठी काहीही झाले तरी माघार घेणार नसल्याचे यावेळी काळे यांनी स्पष्ट केले.
काळे म्हणाले, शहराच्या सर्वच नेत्यांनी कायम सेटलमेंटच राजकारण केले. महानगरपालिका वाटून घेत खाल्ली. एमआयडीसी विकसित होऊ दिली नाही. उद्योजकांच शोषण केले. शहरातील नेत्यांनी गुंडांना हाताशी धरून कामगार युनियनच्या माध्यमातून कामगार आणि उद्योजक यांना वेठीस धरले. यामुळे नवीन उद्योग तर आले नाहीच पण आहेत ते अनेक बंद पाडले गेले. त्यामुळे एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी शहरातील युवकांना संघटीत करून जनआंदोलन उभे करणार असल्याचे, काळे यांनी यावेळी सांगितले.
भाजपला शहरात मिळालेले विक्रमी मताधिक्य आत्मपरीक्षण करायला लावणारे
शहरात पक्षाचे दोन आमदार आहेत. तरी होम ग्राउंडवर आमच्या उमेदवाराची झालेली सुमारे ५४,००० मतांची पीछेहाट ही धोक्याची घंटा आहे. मी सन २०१० पासून राष्ट्रवादी युवक संघटनेत काम करीत आहे. खा.सुप्रिया सुळे यांच्या मुळेच मला युवक जिल्हाध्यक्ष तसेच राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली. विकासात्मक दूरदृष्टी असणा-या स्वच्छ प्रतिमेच्या सक्षम उच्चशिक्षित युवा नेतृत्वाची आज नगर शहराला गरज आहे. मी व्यवस्थापन शाखेचा पदवीधर असून सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. मला कोणतीही वलयांकित राजकीय पार्श्वभूमी नाही.
मी लवकरच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, प्रभारी आ.दिलीप वळसे पाटील, निरीक्षक अंकुश काकडे आदींच्या भेटी घेवून उमेदवारीची मागणी करणार असल्याचे किरण काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
 

Web Title: NCP will contest the assembly elections for the development of the city - Kiran Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.