महापौरपदासाठी भाजप-राष्ट्रवादीची आघाडी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:16 AM2018-12-28T10:16:16+5:302018-12-28T10:37:35+5:30

महापौरपदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशा तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत त्रिशंकू परिस्थिती होती.

NCP-BJP's Satelote for the post of Mayor? | महापौरपदासाठी भाजप-राष्ट्रवादीची आघाडी ?

महापौरपदासाठी भाजप-राष्ट्रवादीची आघाडी ?

Next

अहमदनगर : महापौरपदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशा तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत त्रिशंकू परिस्थिती होती. शुक्रवारी निवडीच्या वेळी सभागृहात राष्टÑवादी व भाजप कुणाला पाठिंबा देणार? यावरच सर्व गणिते अवलंबून आहेत. या दोन्ही पक्षांचे अंतर्गत साटेलोटे असून ते एकमेकाला पूरक भूमिका घेतील अशी चर्चा आहे. काँग्रेसच्या सुजय विखे यांनी कुणालाच साथ न करण्याची भूमिका घेतली आहे.
महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपली. सेनेकडून बाळासाहेब बोराटे, भाजपकडून बाबासाहेब वाकळे तर राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना-भाजप यांची युती शुक्रवारी सायंकाळपर्यंत साकारलेली नव्हती. कोणत्याही परिस्थितीत भाजपची मदत घ्यायची नाही, असा मातोश्रीचा आदेश आहे, असे सेनेचे स्थानिक नेते खासगीत सांगत आहेत. भाजपनेही सायंकाळपर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नव्हती. राष्टÑवादीनेही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.
सध्या शिवसेना २४, भाजप १४, राष्टÑवादी १८, काँग्रेस ५, बसपा ४, समाजवादी पक्ष १ व अपक्ष २ असे बलाबल आहे. एका अपक्षाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ १९ वर जाते.
बसपाच्या तीन नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ १७ वर पोहोचते. ६८ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ३५ नगरसेवकांची आवश्यकता आहे. हा आकडा अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाने गाठलेला नाही. शिवसेनेला भाजपने पाठिंबा न दिल्यास ते चोवीसच्या पुढे सरकू शकत नाही. हीच अवस्था भाजपची आहे. सर्व अपक्ष व समाजवादी पक्ष त्यांच्यासोबत गेल्यानंतरही ते वीसच्या पुढे जाऊ शकत नाही. राष्टÑवादीने समाजवादी पक्ष, काँग्रेस, सर्व अपक्ष व बसपा यांचा पाठिंबा घेतल्यास ते ३० जागांवर जातात.
मात्र, काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने राष्टÑवादी अडचणीत आहे. राष्टÑवादी, काँग्रेस व छोट्या पक्षांना एकत्र घेऊन महापौर पदाचे गणित जुळवू शकते. मात्र,
राष्ट्रवादीची तशी इच्छाशक्ती दिसत नाही.
सर्व पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेऊन निवडणूक लढल्यास सेनेचे पारडे जड होऊ शकते. मात्र, भाजप-राष्टÑवादी एकमेकाला मदत करण्यासाठी आपला उमेदवार मागे घेतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजप-राष्ट्रवादी फिक्सिंग ?
केडगाव प्रकरणी आमदार संग्राम जगताप व आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर सरकारचा दबाव असल्याने राष्ट्रवादी  काँग्रेस महापौर पदाच्या निवडीत भाजपला मदत करण्याची भूमिका घेईल, अशी चर्चा आहे. भाजपचे महापौर पदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्या तिसऱ्या अपत्याचा मुद्दा चर्चेला आला आहे. मात्र, याप्रकरणात आमदार जगताप व राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी मौन धारण केले आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत साटेलोटे असल्याचे बोलले जाते. ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांमुळे राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक स्वत:हून भाजपसोबत जाण्यास तयार असल्याचीही चर्चा आहे.
भाजप-राष्ट्रवादी यांचा ‘व्हीप’ नाही
नगरसेवकांनी पक्षीय भूमिका डावलून इतर पक्षांना मदत करु नये यासाठी नगरसेवकांना ‘व्हिप’ बजावला जातो. असा व्हिप केवळ सेनेने बजावला आहे. राष्ट्रवादी व भाजप यांनी आपल्या नगरसेवकांना काहीही व्हिप बजावलेला नाही. नगरसेवकांना सोयीस्कर भूमिका घेता यावी यासाठीच व्हिप काढला नसल्याची चर्चा आहे.
ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर गणिते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला पाठिंबा देण्याचे धोरण घेतल्यास शिवसेनेचा महापौर होईल. यात उद्धव ठाकरे यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. भाजपचा पाठिंबा घेण्यास ठाकरे तयार आहेत का? हाही मुद्दा आहे.

महापौरपदाचे उमेदवार
बाबासाहेब वाकळे (भाजप)
संपत बारस्कर (राष्ट्रवादी)
बाळासाहेब बोराटे (शिवसेना)
उपमहापौरपदाचे उमेदवार
मालन ढोणे (भाजप)
रुपाली वारे (काँग्रेस)
गणेश कवडे (शिवसेना)

Web Title: NCP-BJP's Satelote for the post of Mayor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.