नवपदवीधरांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा द्याव्यात : एम.व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 05:25 PM2019-03-26T17:25:19+5:302019-03-26T17:25:33+5:30

ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधांची गरज आहे. आरोग्य क्षेत्रातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी ही गरज पूर्ण करावी.

Nadvadidars should provide health facilities in the rural areas: M. Venkiah Naidu | नवपदवीधरांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा द्याव्यात : एम.व्यंकय्या नायडू

नवपदवीधरांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा द्याव्यात : एम.व्यंकय्या नायडू

Next

शिर्डी : ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधांची गरज आहे. आरोग्य क्षेत्रातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी ही गरज पूर्ण करावी. आज देशात आरोग्य क्षेत्रात नवनवीन संकल्पनांमुळे आणि चांगल्या उपचार पद्धतीमुळे भारत आरोग्य पर्यटन हब बनला आहे. बाहेरील देशांचे रुग्ण येथे उपचारासाठी येतात. ही आपल्या आरोग्य क्षेत्रातील विकासाची पावती आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले.
प्रवरा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान कार्यक्रम सोमवारी उपराष्ट्रपती नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी पदवीप्राप्त स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना नायडू बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, कुलपती डॉ. विजय केळकर, प्रभारी कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ.वाय.एम. जयराज, प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ.अशोक पनगारिया आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते विद्यापीठात विविध विद्याशाखांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. डॉ.पनगारिया यांना डॉक्टर आॅफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले. नायडू पुढे म्हणाले, लोणीसारख्या ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात इतक्या चांगल्या प्रकारे काम सुरु आहे, याचे खरोखर समाधान आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी या कामाचा अधिक विस्तार केला. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विविध क्षेत्रातील दरी मिटवण्यासाठी पुढे आले पाहिजे. महात्मा गांधींनी ‘खेड्यांकडे चला’ असा नारा दिला. मात्र, आज परिस्थिती वेगळी दिसत आहे. ग्रामीण भागातून ओढा शहरांकडे स्थलांतरित होताना दिसतो आहे. हे चित्र आपल्याला बदलायला हवे, त्यासाठी तरुण पिढीची मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
सेवाभाव हा स्थायीभाव झाला पाहिजे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला आपण तो अंगी बाळगला तर यापेक्षा देशप्रेमाची भावना दुसरी काय असू शकेल, अशी भावना व्यक्त करुन नायडू यांनी आरोग्य आणि ग्रामविकास क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज व्यक्त केली. या पदवीप्रदान सोहळ्यात सुवर्णपदक जिंकलेल्यांत मुलींची संख्या जास्त असल्याचा आवर्जून उल्लेख करीत त्यांनी आपल्या देशाने पुराणकाळापासून स्त्रियांना महत्वाचे स्थान दिल्याचे सांगितले. ही परंपरा या विद्यार्थिनी पुढे नेत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

Web Title: Nadvadidars should provide health facilities in the rural areas: M. Venkiah Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.