पोलिसांच्या सतर्कतेने वाचले मराठा तरूणाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:52 PM2018-08-01T12:52:31+5:302018-08-01T12:53:30+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व्यथीत होऊन रेल्वेखाली आत्महत्येचा निर्णय घेणाऱ्या तरूणाचे कोतवाली पोलीसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले.

The life of the Maratha youth is saved by the police alert | पोलिसांच्या सतर्कतेने वाचले मराठा तरूणाचे प्राण

पोलिसांच्या सतर्कतेने वाचले मराठा तरूणाचे प्राण

Next
ठळक मुद्देअखेर त्याचे मनपरिवर्तन : आत्महत्येची पोस्ट पडताच दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी

अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व्यथीत होऊन रेल्वेखाली आत्महत्येचा निर्णय घेणाऱ्या तरूणाचे कोतवाली पोलीसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले. पोलीसांनी ‘त्या’ तरूणास वेळीच ताब्यात घेत त्याचे मनपरिवर्तन करत आत्महत्येपासून परावृत्त केले. सोमवारी सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला.
राज्यात मराठा आरक्षणासाठी सध्या सर्वत्र आंदोलन सुरू असून याच मागणीतून काही मराठा तरूणांनी स्वत:चे जीवन संपविले आहे. नगर शहरातील नालेगाव येथे राहणारा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता गणेश गायकवाड याने सोमवारी सायंकाळी त्याच्या फेसबुक अकाउंटवर ‘जय जिजाऊ मी गणेश गायकवाड. आज मराठा आरक्षणासाठी बलिदान देत आहे. ठिकाण- रेल्वे स्टेशन अहमदनगर. ठिक ८ वाजता’ अशी पोस्ट टाकली होती. काही वेळातच ही पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली. कोतवाली पोलीसांनाही सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या पोस्टबाबत माहिती मिळाली. पोलीस ठाण्याचे निरिक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेतील कर्मचा-यांनी गणेश गायकवाड याच्या घराचा पत्ता शोधला आणि अवघ्या दहा मिनिटात पोलीस पथक गणेश याच्या नालेगाव येथील घरी पोहोचले. यावेळी गणेश याचे पोलीसांनी समुपदेशन केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे, अभिजित चव्हाण, बहिरनाथ वाकळे यांच्यासह कार्यकर्तेही गणेश याच्या घरी पोहोचले. या सर्वांनी गणेश याची समजूत घालत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनीही गणेश याच्याशी फोनवरून संवाद साधत त्याची समजूत घातली. त्यानंतर गणेश याने स्वत:चा एक व्हिडिओ तयार करून आत्महत्येचा माझा निर्णय चुकीचा होता. मराठा समाजातील तरूणांनी असा निर्णय घेऊ नये’ असे सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान केले. त्यानंतर पोलीसांनी गणेश याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर १५१(३) अंतर्गत कारवाई करून स्थानबद्ध केले. मंगळवारी न्यायालयाने गणेश याला पंधरा दिवस स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश दिले असून, त्याला नाशिक येथील कारागृहात हलविण्यात आले आहे.

आता मरायचे नाही तर लढायचे

गणेश गायकवाड याचे मनपरिवर्तन झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर दुसरा व्हिडिओ पोस्ट करून ‘आरक्षणासाठी लढा उभा करा मात्र कुणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नका’ असे आवाहन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. ‘आता मरायचे नाही तर लढायचे’, आत्महत्या हा पर्याय नाही, आत्महत्येने प्रश्न सुटणार नाही, एक मराठा लाख मराठा, अशा प्रतिक्रिया उमठल्या तर पोलीसांनी तत्परता दाखविल्याने त्यांचेही अभिनंदन झाले. सोशल मीडियावर दोन दिवस हा विषय चर्चेचा ठरला. या विषयाच्या अनुशंगाने मराठा समाजातील प्रतिनिधींनीही तरूणांना सकारात्मक संदेश दिला.

गणेश गायकवाड याने आत्महत्या करत असल्याबाबत फेसबूकवर पोस्ट टाकल्यानंतर काही वेळातच याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याची समजूत घालण्यात आली. मनपरिवर्तन झाल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला. आरक्षण या विषयावरून सध्या वातावरण संवेदनशील आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून, अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनीही पोलीसांना सहकार्य करावे. -रमेश रत्नपारखी, पोलीस निरिक्षक, कोतवाली


मराठा समाजातील तरूणांनी जीव देऊन आरक्षण मिळणार नाही तर त्यासाठी खंबीरपणे लढा उभारण्याची गरज आहे़. एक मराठा आमच्यासाठी लाख मराठा आहे. राज्यातील मराठा तरूणांनी आंदोलनात सहभागी व्हावे मात्र आत्महत्या सारखा निर्णय घेऊ नये. आरक्षणाचे आंदोलन व्यापक करण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन समजदारपणे भूमिका घ्यावी. गणेश गायकवाड याने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला समजावून सांगितल्यानंतर त्याचे मनपरिवर्तन झाले आहे. ही समाजासाठी चांगली बाब आहे.--टिळक भोस, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

Web Title: The life of the Maratha youth is saved by the police alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.