चला पंढरीसी जाऊ! रखुमा-देवीवरा पाहू!!

By admin | Published: June 27, 2014 11:16 PM2014-06-27T23:16:02+5:302014-06-28T01:11:34+5:30

अहमदनगर : भागवत धर्माची भगवी पताका हातात घेऊन ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, विठू माऊली तू माऊली जगाची असा विठ्ठल नामाचा गजर करीत

Let's go to Pandharasi! Look at Rahumma-Devi! | चला पंढरीसी जाऊ! रखुमा-देवीवरा पाहू!!

चला पंढरीसी जाऊ! रखुमा-देवीवरा पाहू!!

Next

अहमदनगर : भागवत धर्माची भगवी पताका हातात घेऊन ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, विठू माऊली तू माऊली जगाची असा विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरीच्या वाटेवर निघालेल्या देवगड दिंडीतील वारकऱ्यांची पावले शुक्रवारी नगरमध्ये विसावली़
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडी राज्यात शिस्तप्रिय समजली जाते़ श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे हे ४० वे वर्ष आहे. दरवर्षी श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूरला जाते़ या दिंडीचे शुक्रवारी (दि़२३) दुपारी नगर शहरात आगमन झाले. खांद्यावर भगवी पताका, पांढरा पोषाख, गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर पांढरी टोपी परिधान केलेले वारकरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’, विठू माऊलीचा गजर करीत अग्रभागी होते़ त्यांच्यामागे भजनी मंडळ, चांदीच्या पुष्पांनी सजविलेल्या रथामध्ये किसनगिरी बाबांची प्रतिमा व प्राकृत पादुका त्यामागे ज्ञानोबा-तुकाराम व विठू माऊलीचा जयघोष करणाऱ्या महिला भाविक रांगेनेच शिस्तीचे दर्शन घडवित शहरात दाखल झाले़
दरम्यान वाटेत ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करतानाच अनेक भाविकांनी वारकऱ्यांसाठी फळे, पाणी वाटप केले़ दिंडी शहरातील वसंत टेकडी परिसरात पोहोचल्यानंतर तेथे प्रेस क्लब व फिनिक्स सोशल फौंडेशनच्या वतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषध वाटप करण्यात आले़ यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूरभाई शेख, जालिंदर बोरुडे, चंद्रकांत पालवे, मीनाताई मुनोत, डॉ़ प्रसन्नाकुमार खन्ना, डॉ़ संजय मेहेर, डॉ़ संदीप कळमकर आदी उपस्थित होते़ भास्करगिरी महाराज व सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली़ वसंत टेकडी परिसरात वारकऱ्यांनी दुपारचे भोजन केले़ त्यानंतर भास्करगिरी महाराज यांचे प्रवचन झाले़ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पालखी वसंत टेकडी येथून निघाल्यानंतर डीएसपी चौक, नटराज चौक, सर्जेपुरा, कापड बाजार, माळीवाडा मार्गे जावून लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मुक्कामी थांबली़ सकाळी आनंदऋषी समाधीस्थळमार्गे सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे मार्गस्थ होईल़
दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या़ शहरात आ़ अनिल राठोड, संभाजी कदम, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महापौर संग्राम जगताप यांच्यासह व्यापारी व भाविकांनी दिंडीचे जोरदार स्वागत केले़ अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़
लवाजमा आणि सेवाधारी
दिंडीतील वारकऱ्यांसाठी पाणी, भोजन, आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी दिंडीसोबत सुमारे १७ वाहनांचा ताफा आहे़ यामध्ये ७ ट्रका, ४ पाण्याचे टँकर, ३ ट्रॅक्टर, देवगड संस्थांनची रुग्णवाहिका, मिनीबस, मोठी बस अशा १७ वाहनांचा लवाजमा आणि सुमारे ५० सेवाधारी दिंडीसोबत आहेत़ यावर्षी सुमारे १६०० वारकरी दिंडीत सामिल झाले आहेत, अशी माहिती बाळू महाराज कानडे यांनी दिली़
असा आहे वारकऱ्यांचा दिनक्रम
सकाळी ३ वाजता वारकऱ्यांना जागविण्यासाठी सनई चौघडा सुरु होतो़ त्यानंतर सर्वांनी उरकून ४ वाजता काकडा भजन व आरती सुरु होते़ ५ वाजल्यानंतर चहापान होते़ ६़३० वाजता प्रार्थना केली जाते़ आणि त्यानंतर दिंडीचे मुक्कामाच्या ठिकाणाहून प्रस्थान होते़ सकाळी ९ वाजता अल्पोपहारासाठी दिंडी थांबते़ अल्पोपहार झाल्यानंतर पुन्हा दिंडी मार्गस्थ होते़ दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास दुपारचे भोजन, त्यानंतर प्रवचन होते़ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दिंडीतील वारकऱ्यांची पावले पुन्हा पंढरीच्या वाटेवर चालू लागतात़ ५ कि.मी़च्या प्रवासानंतर छोट्याशा विश्रांतीसाठी दिंडी पुन्हा थांबते़ तेथून निघाल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी विसावतात़ तेथे रात्री आरती, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम पार पडतात़

Web Title: Let's go to Pandharasi! Look at Rahumma-Devi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.