श्रीगोंदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखरेवरील आयात शुल्क १५ टक्केवरुन ४० टक्के केले. अबकारी शुल्काच्या मोबदल्यातील सवलतीच्या कर्जाची परतफेडीची मुदत पाच वर्षे वाढविली. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. त्यामुळे साखर उद्योगाला अच्छे दिन येणार आहेत, असे कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी सांगितले.
जगताप म्हणाले की, केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्क वाढविले आहे. त्यामुळे साखरेची आयात बंद होणार किंवा कमी होणार आहे़ त्यामुळे देशातील साखरेची किंमत आपोआप वाढणार आहे. साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी ४ हजार ४०० कोटींचे पॅकेज दिले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या साखर कारखान्यांना उर्जितावस्था येणार आहे. पर्यायाने उसाला जादा भाव देण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचे पगार वेळेत देता येतील, असे जगताप म्हणाले़
नरेंद्र मोदींनी साखर उद्योगाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे, याचा फायदा साखर कारखाने व शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेती आणि पर्यायाने ग्रामीण भागाच्या विकासाला मदत होईल़ ऊसाला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकरी सक्षम होईल, अशी आशाही जगताप यांनी व्यक्त केली़
(तालुका प्रतिनिधी)