अचूक मतदारयादी निवडणूक संचलनाचा पाया : अरूण आनंदकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 06:37 PM2019-01-25T18:37:41+5:302019-01-25T18:38:02+5:30

लोकशाहीच्या संवर्धनासाठी नि:ष्पक्षपाती निवडणूक संचलन अत्यंत महत्त्वाचे असते. निवडणूक संचलनाचा पाया हा अचूक व निर्दोष मतदारयादी असतो.

Foundation of the correct electoral roll: Arun Anandkar | अचूक मतदारयादी निवडणूक संचलनाचा पाया : अरूण आनंदकर

अचूक मतदारयादी निवडणूक संचलनाचा पाया : अरूण आनंदकर

googlenewsNext

अहमदनगर : लोकशाहीच्या संवर्धनासाठी नि:ष्पक्षपाती निवडणूक संचलन अत्यंत महत्त्वाचे असते. निवडणूक संचलनाचा पाया हा अचूक व निर्दोष मतदारयादी असतो. यादृष्टीनेच गेल्या वर्षभर अहमदनगर जिल्ह्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमांमध्ये जिल्हा निवडणूक प्रशासनाने अचूक मतदारयादी तयार करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी दिली. राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
आनंदकर म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. या दिवसाचे औचित्य साधून सन २०११ पासून दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने राज्यात मोठा आहे. जिल्ह्यात १४ तालुके, २ लोकसभा व १२ विधानसभा मतदारसंघ असून जिल्ह्यात एकूण ३७२२ मतदान केंद्राद्वारे निवडणूक व मतदान यादी व्यवस्थापन प्रक्रिया सतत राबविण्यात येते. मागील वर्षभरात निवडणूक शाखेने मतदारयादीसंदर्भात अनेक उपक्रम राबवले. ‘कोणताही मतदार वंचित राहू नये’ या तत्त्वानुसार आणि ‘मतदार असल्याचा अभिमान, मतदानासाठी सज्ज’ या ब्रीदवाक्यानुसार जिल्ह्यात निवडणूक विभागाची वाटचाल सुरू आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्राची स्थापना करून त्याकरिता टोल फ्री क्रमांक ‘१९५०’ सुरू करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व व्हीव्ह पॅट मशीन वापराबाबत मतदारांमध्ये जनजागृती मोहीम यशस्वीपणे सुरू आहे.
जिल्ह्यात दर हजार पुरूष मतदारांच्या तुलनेत स्त्री मतदारांचे प्रमाण २०१५मध्ये केवळ ९०५ होते. जिल्हा निवडणूक शाखेने यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे हे प्रमाण २०१८मध्ये ९०७ व २०१९मध्ये ९१५ झाले आहे. मतदारयादीमध्ये छायाचित्र असल्याचे प्रमाण ९९.८८ टक्के आहे, तर जिल्ह्यात ९९.९० टक्के एवढ्या मतदारांना छायाचित्र निवडणूक ओळखपत्र (इपीक) उपलब्ध करून देण्यात जिल्हा निवडणूक शाखेस यश मिळाले आहे. समाजातील दिव्यांग व्यक्ती, एड्सबाधीत, तसेच तृतीयपंथी व्यक्ती यांची मतदार म्हणून १०० टक्के नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात अनेक विशेष प्रयत्न गेल्या वर्षभरात हाती घेण्यात आले आहेत.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अश्वनीकुमार यांचे मार्गदर्शन, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे पाठबळ यामुळे आपला जिल्हा निवडणूक व मतदारयादीच्या व्यवस्थापन कामात राज्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. याचीच दखल घेऊन भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून निवड केली. त्यानिमित्ताने विविध राज्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. निवडणूक विभागाच्या या कामकाजात सर्व अधिकारी, कर्मचारी, बीएलओ, प्रसिद्धीमाध्यमे, विविध सामाजिक संघटना आदींचे सहकार्य लाभले. आधी मतदार नोंदणी करून व नंतर प्रत्यक्ष मतदान करून प्रत्येकाने लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही शेवटी आनंदकर यांनी केले.

नागरिकांचे सहकार्य अपेक्षित
मतदारयादीचे अद्ययावतीकरण ही एक सतत चालणारी प्रक्रिया असून, याबाबत नागरिकांनी कायम दक्ष व सजग राहणे आवश्यक आहे. मतदारयादीत आपले नाव योग्यरित्या आहे का? मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे त्या त्या वेळी वगळली जात आहेत का? वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र मतदारांची नावे मतदारयादीत समाविष्ट करणे या सर्व प्रक्रियेत मतदार व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, अशी आशा आनंदकर यांनी व्यक्त केली.

 

Web Title: Foundation of the correct electoral roll: Arun Anandkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.