मिरजगावमधील मत्स्यबीज केंद्र २० वर्षांपासून कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:27 AM2018-09-26T11:27:33+5:302018-09-26T11:27:41+5:30

राज्य सरकारच्या मत्स्य विभागाकडून कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे सीना धरणाच्या पायथ्याशी लाखो रूपये खर्च करून उभारलेले अद्ययावत सीना मत्स्यबीज संवर्धन केंद्र गेल्या २० वर्षांपासून कागदावरच आहे.

Fish Seedling center in Mirajgaon has been on paper since 20 years | मिरजगावमधील मत्स्यबीज केंद्र २० वर्षांपासून कागदावरच

मिरजगावमधील मत्स्यबीज केंद्र २० वर्षांपासून कागदावरच

Next

विनायक चव्हाण
मिरजगाव : राज्य सरकारच्या मत्स्य विभागाकडून कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे सीना धरणाच्या पायथ्याशी लाखो रूपये खर्च करून उभारलेले अद्ययावत सीना मत्स्यबीज संवर्धन केंद्र गेल्या २० वर्षांपासून कागदावरच आहे.
सीना धरण हे तालुक्यातील एकमेव धरण आहे. त्याच्या पायथ्याशी आठ एकरावरील या केंद्राच्या माध्यमातून या भागातील शेतकरी, मत्स्य व्यावसायिकांना फायदा होण्याची अपेक्षा असताना अधिकारी हे केंद्र कागदावरच चालवित आहेत. सध्या हा परिसर वेड्या बाभळीत हरवला आहे. या ठिकाणी आठ ते दहा मत्स्यबीज तलाव होते. या जमिनीवर काहीच होत नसल्याने सध्या मूळ शेतजमीन मालकांनी या जमिनी कसण्यास सुरूवात केली आहे. तसेच आमच्या जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणीही जमीन मालकांनी केली आहे.
२००३-२००४ चा अपवाद सोडल्यास या केंद्रासाठी पाण्याची कमतरता कधीच नव्हती. भोसे खिंडीतून कुकडीचे पाणी सीना धरणात आल्यापासून धरणात व केंद्राच्या विहिरीत मुबलक पाणी आहे. गेल्या वीस वर्षांपासून हे केंद्र कार्यान्वित करण्याबाबत संबंधितांची उदासीनता आहे. हे केंद्र सुरू झाल्यास मत्स्यबीजास परिसरातून मोठी मागणी होऊ शकते. तालुक्यातील माशांची मोठी बाजारपेठ आहे. मत्स्य व्यवसाय करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात मत्स्य संगोपनासाठी तलाव भाडे तत्त्वावर घेतात. या तळ्यात मत्स्यबीज सोडण्यासाठी भिगवण, करमाळा, पुणे, संगमनेर, मुळा धरण येथून मत्स्यबीज आणतात.परंतु व्यावसायिकांना हे परवडत नाही. यामध्ये जादा पैसे व वेळ वाया जातो. या व्यवसायातून कर्जत तालुक्यात लाखो रूपयांची उलाढाल होऊन अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. या केंद्रामुळे व्यवसाय वृद्धीसोबतच तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली असती. हे केंद्र सुरू करण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
या केंद्राच्या निर्मितीपासून नेमलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी जूनमध्ये सेवानिवृत झाला. एक चौकीदार कर्मचारी आजही हे केंद्र सुरू नसल्यामुळे येथे एकटाच काळ्या पाण्याची सजा भोगत आहे. या ठिकाणच्या इमारतीचे फक्त अवशेष बाकी आहे.

धरणात कायमस्वरूपी पाणी नसल्याने, मत्स्यबीज संवर्धन तलावात नैसर्गिक पाणी मिळत नाही. विहिरीतून पाणी उचलून टाकल्यास ते पाणी पाझरून जाते. विजेचाही प्रश्न उपस्थित होत होता. केंद्र उभारताना अनेक तांत्रिक त्रुटी राहिल्याने हे केंद्र यशस्वी झाले नाही. -नागनाथ भादुले, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, अहमदनगर

Web Title: Fish Seedling center in Mirajgaon has been on paper since 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.