Earthquake shock of 2.6-raster scale in Bota area | बोटा परिसरात २.६ रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

बोटा : संगमनेर तालुक्यातील बोटा गावासह परिसरातील पाच गावांना गुरुवारी (दि़ ७) सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. २.६ रिस्टर स्केल तिव्रतेचा हा धक्का असल्याचे भू-वैज्ञानिकांनी सांगितले.
बोटा व परिसरात गेल्या वर्षीही जानेवारी महिन्यात पहिल्या व दुस-या आठवड्यात भूकंपाचे ९ धक्के बसले होते. त्यावेळी या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पुन्हा सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यानंतर आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात झाली असून, त्याची तीव्रता २.६ रिस्टर स्केल असल्याची माहिती वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान या भूकंपाची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार साहेबराव सोनवणे यांनी महसूलची यंत्रणा भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांमध्ये पाठविली आहे. लोकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन तहसिलदार सोनवणे यांनी केले आहे.