दुष्काळ मुक्तीसाठी गावे सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:51 AM2019-05-09T10:51:30+5:302019-05-09T10:51:35+5:30

निंबळक - इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी दुष्काळ मुक्तीयज्ञास बुधवारीआरंभ झाला. स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांनी परिसरातील दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार घेत निर्धार केला.

Due to drought relief villages have come | दुष्काळ मुक्तीसाठी गावे सरसावली

दुष्काळ मुक्तीसाठी गावे सरसावली

googlenewsNext

अहमदनगर : निंबळक - इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी दुष्काळ मुक्तीयज्ञास बुधवारीआरंभ झाला. स्नेहालय आणि अनामप्रेम या संस्थांनी परिसरातील दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार घेत निर्धार केला. देहरे , विळद, वडगाव गुप्ता अशा सखल भागातील गावांनाही या जलसंधारणाचा नैसर्गिक परिस्थितीमुळे लाभ होणार आहे.
निंबळक येथील तलावाजवळ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून या लढ्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आपले आजोळ असलेल्या निंबळक आणि इसळक गावांच्या पंचक्रोशीला पाणीदार करण्यासाठी पहिली मदत म्हणून एक महिन्याचे १५ हजार रुपयांचे निवृत्तीवेतन अण्णांनी दिले. या उदघाटन सोहळ्यात आनंदवन प्रगती सहयोग उपक्रमाचे संयोजक कौस्तुभ आमटे , भारतीय जैन संघटनेचे नगर जिल्हा समन्वयक आदेश चंगेडिया, आमी संघटनेचे दिलीप अकोलकर , दौलतराव शिंदे, मिलिंद कुलकर्णी, पाणी फाउंडेशन उपक्रमाचे नगर जिल्हा समन्वयक विक्रम फाटक, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अ‍ॅड. श्याम असावा, तुलसीराम पालीवाल आदी उपस्थित होते.
यावेळी अण्णा हजारे म्हणाले, उशिराने का होईना, परंतु लोकांना आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी आपणच रक्त आणि घाम गाळायचा आहे, याची जाणीव झालेली आहे. जाती-धर्म- राजकीय पक्षांचे भेदाभेद गाडून, जी गावे एकजुटीने पाणी, शेती ,माती आणि संस्कृती यांचे संवर्धन करतील त्यांनाच भविष्य राहील. पाणी ही संपूर्ण देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचा समान अधिकार सर्व नागरिकांना मिळाला पाहिजे. तसेच पाण्याचा वापर करण्याबाबत तारतम्य आणि काटकसर अनुसरण्याची भविष्यात गरज आहे.अन्यथा पाणीदार गावे पुन्हा दुष्काळी होण्याचा धोका आहे, असेही अण्णा म्हणाले.
पोपटराव पवार म्हणाले, मोठ्या धरणांनी मोठ्या महानगरांचे पिण्याच्या पाण्याचे आणि औद्योगिक गरजांचे प्रश्न सोडविले आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी क्षेत्र आणि बेसाल्ट खडकाच्या जमिनीत नुसते काबाडकष्ट न करता तंत्रशुद्ध पद्धतीने जलसंधारणाची कामे करणे गरजेचे आहे. अन्यथा विचार न करता नुसतेच खुदाई केल्याने आहे ते पाणी दुसरीकडे जाते असे अनुभव आहेत.श्रीमंत लोक अधिकाधिक पाण्याचा उपसा करून स्वत:चे उखळ पांढरे करतात. त्यामुळे देशात आणि ग्रामीण भागात आर्थिक विषमता निर्माण होते. अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी आणि विस्थापित होतो.पाणी वापराबाबत समन्यायी दृष्टिकोन आणि आठमाही शेतीचा आग्रह धरणे गरजेचे आहे..

Web Title: Due to drought relief villages have come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.