डॉ. शेळकेच्या घोटाळ्याचा आकडा कोटींच्या घरात : मेडिकल मशिनरीचेही स्कँडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:09 PM2018-09-27T13:09:38+5:302018-09-27T13:09:51+5:30

नगर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर निलेश शेळके याने वेळोवेळी शहर सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांशी व संचालकांशी संगनमत करुन सुमारे ४५ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Dr. The number of Shelke's scandal in crores: The Scandal of the Medical Machinery | डॉ. शेळकेच्या घोटाळ्याचा आकडा कोटींच्या घरात : मेडिकल मशिनरीचेही स्कँडल

डॉ. शेळकेच्या घोटाळ्याचा आकडा कोटींच्या घरात : मेडिकल मशिनरीचेही स्कँडल

Next

अहमदनगर : नगर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर निलेश शेळके याने वेळोवेळी शहर सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांशी व संचालकांशी संगनमत करुन सुमारे ४५ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची तक्रार करण्यात आली आहे. हॉस्पिटलला मशिनरी पुरविणा-या एजन्सीनेही या प्रकरणात शेळके याला मदत केल्याचा आरोप आहे.
डॉ. शेळके याने नगर शहरातील ‘एम्स’ (अहमदनगर इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस) हॉस्पिटलमध्ये शहरातील २० डॉक्टरांना भागीदार केले होते. त्यानंतर काही डॉक्टरांना वगळण्यात आले. या प्रकल्पात शहर व जिल्ह्यातील डॉक्टरांनी सुरुवातीला ५ ते ६ कोटीची गुंतवणूक केली होती. या हॉस्पिटलचे बांधकाम, खरेदी, कर्ज व इतर सर्व बाबी स्वत: शेळके पाहत होते. डॉ. रोहिणी सिनारे यांच्यासह त्यांचे पती डॉ. भास्कर सिनारे, डॉ.उज्ज्वला कवडे व त्यांचे पती रवींद्र कवडे तसेच डॉ. विनोद श्रीखंडे यांना शेळके यांनी भागीदार बनविले होते. या हॉस्पिटलमध्ये मशिनरी खरेदी करावयाची आहे. त्यासाठी आपण शहर सहकारी बँकेतून कर्ज घेणार आहोत. मात्र, हे कर्ज वैयक्तिक नावे घ्यावे लागेल असे सांगून शेळके याने डॉ. रोहिणी सिनारे, उज्जला कवडे व डॉ. श्रीखंडे भागीदार असलेले साईकृपा फाऊंडेशन ही फर्म यांच्या बँकेच्या कर्ज प्रकरणावर सह्या घेतल्या. त्यानंतर दीड वर्षात आम्हाला बँकेने कधीही बोलविले नाही. हॉस्पिटल चालू होईपर्यंत मशिनरी येणारच नव्हती. त्यामुळे तोवर कर्ज उचलण्याचा प्रश्नच नाही, असे समजून आम्ही बिनधास्त होतो.
मात्र, बँकेने आम्हाला २०१५ साली प्रत्येकी ५ कोटी ७५ लाखांच्या कर्जाचे पत्र पाठविल्याने आम्ही आश्चर्यचकित झालो. ही कर्ज आमच्या नावे असल्याने बँकेने कर्ज मंजूर करताना व पैसे देताना आम्हाला कल्पना द्यावयास हवी होती. मात्र बँकेने परस्पर शेळके याचा सहकारी मधुकर वाघमारे याचेकडे कर्जाचे धनादेश दिले. त्याने ते धनादेश मशिनरीच्या डिलरला दिले. डिलरने हे धनादेश वटवून ती रक्कम नगर अर्बन बँकेच्या केडगाव शाखेत आमच्या बनावट खात्यांवर भरली. या बनावट खात्यांतून ही रक्कम शेळके याने स्वत:कडे घेतली. म्हणजे मशिनरीच्या नावाने काढलेले कर्ज शेळके यांनी बँक व डिलरच्या मदतीने स्वत: वापरत या पैशांचा अपहार केला.
मशिनरीत आमची स्व:तची तीस टक्के रक्कम आहे की नाही याची खात्री न करता बँकेने शेळकेला साथ देत हे कर्ज मंजूर केले.
नगर शहरातील प्रतिष्ठीत बँकेसंदर्भात गुन्हा दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात व वैद्यकिय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. पोलिसांचे तपासाकडे लक्ष लागले आहे.
सहायक निबंधकांमार्फतही डॉ. शेळके यांनी घेतलेल्या कर्जप्रकरणांची चौकशी
एम्स हॉस्पिटलशी संबंधित सर्व कर्ज खाती थकल्यामुळे शहर बँकेचे प्रमुख मुकुंद घैसास, गिरीष घैसास व डॉ. निलेश शेळके तसेच विजय मर्दा (सी.ए.) यांनी एम्स हॉस्पिटल हे डॉ. निलेश शेळके व विक्रांत चांदवडकर यांच्या नवीन स्थापन झालेल्या साई सुजाता हॉस्पिटल प्रा. लिमिटेड या फर्मला विकत द्या त्यानंतर आम्ही या फर्मच्या नावे नवीन कर्ज प्रकरण करुन तुमच्या नावे असलेले कर्ज मिटवितो असा तोडगा आमच्या समोर ठेवला. तसा व्यवहार करण्यासही आम्हाला भाग पाडले. परंतु त्या व्यवहारानंतरही एम्सच्या भागीदारांच्या नावे असलेले कर्ज भरले गेले नाही. निबंधकांनी या बँकेची चौकशी केली असून त्यात बँकेने या थकीत कर्जानंतरही शेळके यास वेळोवेळी वैयक्तिक कारणासाठी कर्ज दिल्याचे आढळले आहे. आमच्या नावाने घेतलेल्या कर्जांच्या थकबाकीचा आकडाच ४५ कोटीच्या घरातील आहे, असे फिर्यादी डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मशिनरीचे डिलरही सामील ? शहर सहकारी बँकेने एम्स हॉस्पिटलमध्ये मशिनरी आली नसताना कर्ज कसे मंजूर केले? मशिनरी दिली नसताना डिलरने पैसे कसे स्वीकारले? तसेच हे पैसे डिलरने फिर्यादींच्या बँक खात्यात का जमा केले? असाही प्रश्न आहे. डिलर योगेश मालपाणी, स्पंदन मेडिकेअरचे जगदीश कदम हे याप्रकरणी संशयाच्या भोव-यात आले आहेत.च्कर्जदारांनी स्वत:ची ३० टक्के भागीदारी देणे आवश्यक असते. मात्र, हे पैसे न भरताही बँकेने कर्ज मंजूर केले. कर्ज मंजुरी पत्रातील त्रुटींची पूर्तता कर्जदारांनी केली नाही. तरीही बँकेने कर्ज दिले. हॉस्पिटल सुरु नसताना व मशिनरीची आॅर्डर नसताना कर्ज दिले.

बँकेतून वाटप झालेल्या कर्जप्रकरणी संबंधित डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीत काहीच तथ्य नाही. नियमानुसारच कर्जाचे वाटप झालेले असून, या संदर्भात बँकेकडे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. संबंधित कर्जदारांच्या विरोधात बँकेने न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. बँकेच्यावतीने या सर्व बाबींचा गुरूवारी खुलासा करण्यात येणार आहे.- सुभाष गुंदेचा, अध्यक्ष, अहमदनगर शहर सहकारी बँक.

Web Title: Dr. The number of Shelke's scandal in crores: The Scandal of the Medical Machinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.