Do not suppress the agitation of farmers - Ajit Navale's criticism | लोणीत आत्मक्लेश : विखेंनी शेतक-यांचे आंदोलन दडपू नये-अजित नवले यांची टीका

लोणी : ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या हक्काच्या भावासाठी आंदोलन करण्यास सहकाराचे जनक असलेले लोणीतील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी आत्मक्लेश आंदोलनासाठी बसले आहेत. त्याच पद्मश्रींचे चिरंजीव असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आंदोलन हाणून पाडण्यासाठी दडपशाही चालविली आहे. पुतळ्याजवळ पाणी ओतले आहे. शेवगाव गोळीबारातील जखमी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विखेंनी आंदोलन चिरडू नये. लोणीतील दडपशाही अधिक काळ सहन करणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर, पण आता आम्ही शेतक-याच्या घामाला दाम मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिला. गुरूवारी दुपारी आंदोलकांसमोर ते बोलत होते.

राधाकृष्ण विखे-पाटील आंदोलन दडपत आहेत, शेतक-यांचा आरोप - अजित नवले यांचे भाषण

ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यासाठी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करणा-या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या लोणी (ता. राहाता) येथील पुतळ्यासमोर शांततामय मार्गाने आत्मक्लेश आंदोलनासाठी जमले आहेत. पण पुतळ्याजवळ पाणी ओतून विखे समर्थकांनी आंदोलकांना रस्त्यावर बसविले आहे. शेतक-यांचे नेते म्हणविणारे विखेच शेतक-यांचे आंदोलन दडपण्यास निघाले आहेत. डहाणूकरांच्या काळापासूनच खाजगी कारखानदारीस शेतक-यांनी विरोध केलेला आहे. विखेंनी कितीही दडपशाही केली तरी आजही शेतकरी जिंकतील, असा विश्वास डॉ. नवले यांनी व्यक्त केला.
तर अजय बारसकर म्हणाले, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे हेच आमचे विठोबा आहेत. आम्ही शेतक-यांची मुले न्याय मागण्यासाठी त्यांच्या दारात आलो आहोत. पण त्यांचेच पुत्र शेतक-यांवर अन्याय करीत आहेत. ऊस दरासाठी शेवगाव तालुक्यात आंदोलन करणा-यांवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात जखमी झालेले शेतकरी आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांचेही राज्याच्या विरोधी पक्षनेत्यास देणेघेणे नाही, असेही बारसकर म्हणाले. राज्यभरातून आलेल्या विविध शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी अन्नत्याग करीत आत्मक्लेश आंदोलनात भाग घेतला आहे.


Web Title: Do not suppress the agitation of farmers - Ajit Navale's criticism
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.