श्रीगोंदा : साहेब, आम्ही हिरडगाव, घोडेगाव, श्रीगोंदा शहर, लोणीव्यंकनाथ, घोगरगावमध्ये चो-या, दरोडे टाकले. असं आलो, अशी मारहाण केली आणि दम देऊन सोने, पैसे लुटून असं पळालो, अशी माहिती सांगत चक्क या दरोडेखोरांनी पोलिसांना लुटीचेच प्रात्यक्षिक दाखविले. बुधवारी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व सहका-यांसमोरच चोरट्यांनी दरोड्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
पोलीस पथकाने जेरबंद केलेल्या आरोपींनी हिरडगाव आणि कोकणगाव येथील दरोडा आणि श्रीगोंदा शहरातील परहार चोरी कशा पद्धतीने केली हे दाखविले. यावेळी दरोडेखोरांनी बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, त्यांच्या सहका-यांनी त्यांना खाकी वर्दीचा इंगा दाखविला. पोलीस पथकाने बुधवारी यातील तीन आरोपींना हिरडगाव आणि कोकणगाव येथे नेले. या तिन्ही आरोपींनी कशा पद्धतीने गुन्हा केला, कोणी दरवाजा तोडला, कोणी मारहाण केली याची सविस्तर माहिती दिली. तेथून दरोडेखोरांच्या टोळीने शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडून अर्धा तास अक्षरश: धुडगूस घातला. पोलीस आल्याने आम्ही पळून गेलो असेही या आरोपीने यावेळी सांगितले. वातावरण शांत झाल्यानंतर आम्ही मोटारसायकली घेऊन पसार झाल्याचे सांगितले.
श्रीगोंदा शहरातील परहार, तहसीलदार, पोलीस, अ‍ॅड.अनभुुले यांच्या घरी कशी चोरी केली, त्या ठिकाणी किती सोने, पैसे मिळाले हेही त्यांनी सविस्तर सांगितले. दोन दिवसात लोणीव्यंकनाथ, घोगरगाव येथे तपासासाठी आणण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पावल्याने डोक्यात घातला गज

फरारी पावल्या काळे याने हिरडगाव येथील राणी दरेकर हिच्या डोक्यात गज घातला. तर शाहरुख आरकस काळे याने सोने लंपास केले. कोकणगाव येथील शिंदे यांना पैसे द्या, अन्यथा तुमच्या मुलीला पळवून नेऊ, अशी धमकी दिल्याची कबुली अल्पवयीन आरोपीने दिली.