आघाडीतील बिघाडी, युतीत संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2016 12:39 AM2016-11-05T00:39:48+5:302016-11-05T00:50:32+5:30

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे़ काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांच्याच नात्यातील

The breakthrough in the alliance, the suspicions in the alliance | आघाडीतील बिघाडी, युतीत संशयकल्लोळ

आघाडीतील बिघाडी, युतीत संशयकल्लोळ

Next


अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे़ काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांच्याच नात्यातील संग्राम कोते यांना राष्ट्रवादीने निवडणूक मैदानात उतरविले आहे़ त्यामुळे काँग्रेसची धाकधूक वाढली़ सोधा पक्षातीतील फाटाफूट आपल्याच पथ्यावर पडणार, या अविर्भावात जिल्ह्यातील भाजपा आहे़ पण, मित्र पक्ष सेनेने भूमिका स्पष्ट न केल्याने युतीतही संशयकल्लोळ असल्याचे चित्र सध्यातरी आहे़
नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे आहे़ मात्र विधान परिषदेच्या इतर मतदारसंघात दोन्ही काँग्रेसने एकमेकांविरोधात दंड थोपटले़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले, याचाच अर्थ नाशिक पदवीधरमध्ये आघाडी होणार नाही, असे गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी घाईघाईने कोते यांची उमेदवारी जाहीर केली़
शिर्डी येथील रहिवासी कोते माजीमंत्री बाळासाहेब थोरात व सुधीर तांबे यांचे सोयरे आहेत, तसे कोते यांनीच जाहीर केले आहे़ त्यात काँग्रेसमध्ये विखे व थोरात, असे दोन गट आहेत, ते सर्वश्रुत आहे़ दोन्ही गटांची मनधरणी करत तांबे यांनी निवडणुकीची तयारी केली़ पण, ऐनवेळी कोते मैदानात उतरले आहेत़
राष्ट्रवादीचे माजीमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत लक्ष घातले असून, जिल्ह्यातील सर्व नेत्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत़
जिल्ह्यातील सर्वाधिक साखर कारखाने व शैक्षणिक संस्था राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे आहेत़ साखर कारखान्यातील कामगारांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसची ही जमेची बाजू आहे़ परंतु निवडणुकीसाठी त्याचा किती वापर होतो, हा संशोधनाचा विषय आहे़ परंतु दोन्ही काँग्रेसमधील भांडण, आपल्या पथ्यावर पडणार, म्हणून भाजपात कमालीचा उत्साह संचारला आहे़पण, तो कितीकाळ टिकेल, याचा भरवसा नाही़ आघाडीतील बिघाडीप्रमाणेच युती बेभरवशाचीच आहे़
भाजपाने प्रशांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली़ उमेदवारी जाहीर झाली, तेव्हापासून कार्यकर्ते कामाला लागले़ पण, सेना अलिप्तच आहे़ कारण मातोश्रीचा आदेश येणे बाकी आहे़ तो आल्यानंतर काय ते ठरवू, अशी जिल्ह्यातील सेनेची धारणा आहे़ त्यामुळे आघाडीत बिघाडी आणि युतीत संशयकल्लोळ, असे चित्र सध्या तरी आहे़
(प्रतिनिधी)
मतदार नोंदणीचा शनिवार अखेरचा दिवस आहे़ ऐनवेळी राष्ट्रवादीने निवडणुकीत उडी घेत मतदार वाढविण्यावर भर दिला आहे़ यापूर्वीच शिक्षण संस्था व कारखान्यांमार्फत पदवीधरांचे अर्ज भरून घेण्याची मोहीम जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सुरू केली होती़ परंतु, काहींनी लाभ ना नफा, असे म्हणत याकडे कानाडोळा केला होता़ मात्र आता पक्षश्रेष्ठींनीच आदेश दिल्याने शिक्षण संस्था व कारखान्यात मतदार नोंदणीची लगीनघाई सुरू आहे़ ऐनवेळी किती मतदार नोंदणी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात मोठी पीछेहाट झाली़ त्यामुळे आगामी निवडणुकांत आपआपले गड शाबूत ठेवण्यातच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सर्वाधिक वेळ आणि ताकद खर्ची पडत आहे़ त्यात नगरपालिकांच्या निवडणुकाही आहेतच़ त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीलाही राष्ट्रवादी काँगे्रसला सामोरे जायचे आहे़ बहुतांश नेते आपल्याच मतदारसंघाची मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत़ त्यात आता पदवीधरचीही जबाबदारी येऊन पडली आहे़ विशेष करून शिक्षण व साखर सम्राटांवरच राष्ट्रवादीची भिस्त आहे़ पदवीधरच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे़

Web Title: The breakthrough in the alliance, the suspicions in the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.