Bodies of devotees visit Panthapath for Somvati at Kirtan Khandoba | सोमवतीनिमित्त पिंपळगाव रोठा येथे कोरठण खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

कान्हूर पठार : सोमवती अमावस्या पर्वणी उत्सवात आज राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाचे देवदर्शन घेऊन कुलधर्म व कुलाचार भाविकांनी केला. पहाटे श्री खंडोबा स्वयंभू मूर्तीला गंगास्नान घातल्यानंतर श्री खंडोबाचा अभिषेक पूजा, महाआरती करण्यात आली. सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
सोमवारी सकाळी १० वाजता पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून खंडोबा उत्सव मूर्तीची पालखीतून मंदिरातून टाक्याचा दरा येथे गंगास्नानसाठी पालखी सोहळा, छबिनामिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, सचिव महेंद्र नरड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, चंद्रभान ठुबे, मनीषा जगदाळे, किसन धुमाळ, अमर गुंजाळ, सुरेश सुपेकर, किसन मुंढे या विश्वस्तांसह बन्सी ढोमे, रामदास मुळे, उपसरपंच बाळासाहेब पुंडे, सुरेश ढोमे, शांताराम खोसे, जालिंदर खोसे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात व लेझीमच्या डावात सदा आनंदाचा येळकोट, जय मल्हारच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. लंगर तोडल्यावर भाविकांनी पालखीवर भंडारा, खोब-याची उधळण केली. यावेळी पालखी छबिनापुढे भाविकांनी ओलांडा घेतला. पालखी खालून प्रदक्षिणा घातली. यानंतर सामूहिक तळीभांडार झाला. सकाळी ११ वाजेपासून भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद शिरूर तालुक्यातील औरंगापूर येथील भाऊसाहेब डुकरे, रामदास डुकरे, भिमाजी डुकरे, श्रीपत घुले, बबन डुकरे, चिमाजी डुकरे, सोपान थिटे, दत्तू थिटे, भास्कर डोंगरे (अणे) यांच्यातर्फे देण्यात आला. दर्शन व्यवस्था क्रांती शुगर कारखानच्या सुरक्षा पथकाने यशस्वी पार पाडली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


Web Title: Bodies of devotees visit Panthapath for Somvati at Kirtan Khandoba
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.