पाणवठ्यामुळे परतले वन्यजीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 03:54 PM2019-05-08T15:54:35+5:302019-05-08T15:54:52+5:30

नगर तालुक्यातील भातोडी येथील दुर्गम भागात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. मात्र चारा-पाण्याअभावी येथील वन्यजीव या भागात दिसेनासे झाले होते.

Backwater wildlife due to the watershed | पाणवठ्यामुळे परतले वन्यजीव

पाणवठ्यामुळे परतले वन्यजीव

Next

केडगाव : नगर तालुक्यातील भातोडी येथील दुर्गम भागात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. मात्र चारा-पाण्याअभावी येथील वन्यजीव या भागात दिसेनासे झाले होते. पाण्याच्या शोधात हे जीव अन्यत्र स्थलांतरीत झाल्याचे लक्षात येताच गावातील पांडुरंग प्रतिष्ठानच्या तरुणांनी वन्यजीवांचे अस्तित्व असणाऱ्या भागात ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आणि काही दिवसांच्या अवधीनंतर गावातून निघून गेलेले वन्यजीव गावाकडे पुन्हा फिरले.
नगर तालुक्यातील ऐतिहासिक भातोडी गावातील परिसरात चौत्रा नावाचा एक दुर्गम भाग आहे. या भागात हरीण, ससे, लांडगे, कोल्हे, मोर व इतर वन्य प्राणी व पक्ष्यांचे अस्तित्व आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर गजबजलेला असतो. मात्र भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील वन्यजीवांचे अन्न पाण्यावाचून हाल सुरु झाले. पाण्याच्या शोधात यातील अनेक वन्यप्राणी हा परिसर सोडून इतरत्र स्थलांतरीत होऊ लागले. पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणारा हा परिसर प्राणी व पक्ष्यांअभावी ओसाड बनला. गावातील पांडुरंग प्रतिष्ठान कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी वन्यजीवांसाठी काहीतरी करण्याची तयारी सुरु केली.
ज्या पाण्याअभावी वन्यजीव निघून गेले त्याच पाण्याच्या सोयीसाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पाणवठे तयार करण्याचा निर्णय घेतला. ठिकठिकाणी पाणवठे तयार केल्यानंतर काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निघून गेलेले सर्व वन्यजीव या परिसरात परतू लागले. ओसाड बनलेला हा परिसर पुन्हा गजबजून गेला. गावातील अनेक तरुण यासाठी सहकार्य करीत आहेत. पाणवठे तयार करण्यासाठी शाम घोलप, राजेंद्र काळे, किरण शिंदे, आकाश ओव्होलकर, विशाल घोलप, अभिमान घोलप यांनी परिश्रम घेतले.

पाणवठे तयार केल्यानंतर दोन-तीन दिवस या परिसरात एकही पक्षी नजरेस पडला नाही. यामुळे केलेले परिश्रम वाया जातात काय अशी भीती वाटू लागली. मात्र काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हजारो पशु-पक्षी या परिसरात पुन्हा परतले आणि हा परिसर पुन्हा गजबजला. - शाम घोलप ( सचिव, पांडुरंग प्रतिष्ठान, भातोडी)

Web Title: Backwater wildlife due to the watershed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.