हौशी राज्य नाट्य स्पर्धा २०१८ : समयसूचकतेच अप्रतिम ‘तीस तेरा’

By साहेबराव नरसाळे | Published: November 20, 2018 04:07 PM2018-11-20T16:07:38+5:302018-11-20T16:08:50+5:30

राज्य नाट्य स्पर्धेच्या चौथ्या दिवशी नगर केंद्रावर सलिम शेख लिखित व शशिकांत नजान, सतीश लोटके दिग्दर्शित ‘तीस तेरा’ हे नाटक सादर झाले. तीस तेरा म्हणजे ३०१३ साल आणि ३१ वे शतक.

Amateur State Drama Competition 2018: Untimely 'Thirty Thirteen' | हौशी राज्य नाट्य स्पर्धा २०१८ : समयसूचकतेच अप्रतिम ‘तीस तेरा’

हौशी राज्य नाट्य स्पर्धा २०१८ : समयसूचकतेच अप्रतिम ‘तीस तेरा’

Next

साहेबराव नरसाळे

राज्य नाट्य स्पर्धेच्या चौथ्या दिवशी नगर केंद्रावर सलिम शेख लिखित व शशिकांत नजान, सतीश लोटके दिग्दर्शित ‘तीस तेरा’ हे नाटक सादर झाले. तीस तेरा म्हणजे ३०१३ साल आणि ३१ वे शतक.
विज्ञानाचा हात धरुन आज ज्या पद्धतीने माणसांची वाटचाल सुरु आहे, ती अशीच राहिली तर ३०१३ साली माणसांची काय अवस्था होऊ शकते, हे सांगणारे हे नाटक़ ३०१३ सालातल्या एका काल्पनिक प्रसंगाने या नाटकाचा पडदा उघडतो. माणसांना खायला धान्य नसते. प्रत्येकजण भूकेने व्याकूळलेला असतो़ सर्वजण जजकडे माणसं खाऊन जगण्याची मुभा मागण्यासाठी जमलेले असतात. जजही भूकेने व्याकूळलेला असतो़ या प्रसंगातील वेशभूषा, रंगभूषा आणि प्रत्येकाने केलेला अभिनय धडकी भरवणारा ठरला. हाऊसफुल्ल झालेले सभागृह अवाक् होऊन पाहत होते. तर भुकेलेल्यांचा आक्रोश पाहून लहान मुले घाबरुन जातात. सर्वजण जजकडे माणसांना खाऊन जगण्याची मुभा मागतात. जज त्यांना परवानगी देतो आणि प्रत्येकजण एकमेकांवर तुटून पडतो. किरकोळ देहयष्टी असलेले पहिले बळी ठरतात. त्यानंतर सर्वजण मिळून जजवरच हल्ला चढवितात. त्यावेळी लहानग्या वसूला घेऊन तिचे आजोबा व आजी लपून बसतात. असा हा अंगावर काटा उभा करणारा पहिला प्रवेश येथे संपतो. दुसऱ्या प्रवेशात वसूला घेऊन आजी व आजोबा बाहेर येतात़ ते वसूला वाचविण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवितात़ त्याचवेळी वसू आजोबांकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट धरते़
आपल्यावर हा सारा प्रसंग कसा बेतला, याची गोष्ट आजोबा वसूला सांगू लागतात. येथून नाटक फ्लॅशबॅकमध्ये जाते. ३०१३ मधून आपण जाऊन पोहोचतो १८५० मध्ये. १८५० मध्ये औद्योगिक क्रांतीची पहाट होते. तेथून पुढे एकीकडे मानवी प्रगतीचा आलेख उंचावत तर दुसरीकडे नैसर्गिक साधन संपत्ती वारेमाप वापरामुळे रसातळाकडे झुकत असते. झाडांच्या कत्तली वाढल्यामुळे दुष्काळाचे दुष्टचक्र मानवाला कवेत घेऊ लागले. त्याचा परिणाम १९८५ साली यवतमाळ जिल्ह्यात पहिली शेतकरी आत्महत्या झाली. या प्रसंगात व-हाडी भाषेचा लहेजा कलाकारांनी उत्तम पद्धतीने जपला. या प्रसंगातील आई (शोभा चंदने), सून (रेखा दहातोंडे), बाप (सतीश लोटके), मुलगा (शशिकांत नजान) यांनी उत्तम अभिनय केला. पण यातील सासू व सूनेची वेशभूषा खटणारी ठरली. घरात खायला नाही पण सासू, सूनेच्या अंगावर नव्या साड्या, मेकअप प्रसंगात विरोधाभास उभा करतो़ पुढच्याच प्रसंगात रंगमंचाच्या एका कोपºयात भजन, मध्यभागी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या आणि दुसºया कोपºयात आपल्या घराबाहेर पतीवियोगाने टाहो फोडणारी सून असा साधलेला कोलाज प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतो़ येथे पहिला अंक संपतो़ पहिला अंक एकदम गतीने पुढे सरकत राहतो़ त्यामुळे प्रेक्षक त्यात गुंतून राहतात़ आता पुढे काय, अशी उत्सुकता ताणून पहिल्या अंकाचा पडदा पडतो़ दुसºया अंकाचा पडदा उघडतो त्यावेळी नाटक २०१८ सालात पोहोचलेले असते़ जगातील सर्वात उंच पुतळा, स्मार्ट सिटी असे संवादात असलेले उल्लेख आणि मोबाईलने वेडी झालेली तरुणाई हे २०१८ साल असल्याचे सांगते़ येथे दिग्दर्शकाचे कौशल्य हे की हे नाटक लिहून चार-वर्षे झालेली असावीत़ या नाटकाचे यापूर्वीही प्रयोग झालेले आहेत़ २०१५ साली हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत होते़ पण हे नाटक आता करताना दिग्दर्शकाने कथेतील मूळ साल न घेता २०१८ सालातली परिस्थिती संवादातून मांडून काळाशी सांगड घातली़ त्यामुळे प्रेक्षकांनाही आपण मागील काळातून वर्तमानात आल्याचा भास झाला़ या प्रसंगाला प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवून दाद दिली़ २१ व्या शतकातून हे नाटक भविष्यावर भाष्य करीत २७ व्या शतकात पोहोचते़ घराघरात पोहोचलेला रोबोट आणि आॅक्सिजनसाठी पेटलेला संघर्ष दाखवून पुढे हे नाटक आपल्याला ३०१३ सालात घेऊन जाते़ दुसºया अंकात २१ व्या शतकातून नाटक मोठ्या विध्वंसासह ३१ व्या शतकात पोहोचते़ माणूस माणसाला खायला उठलेला असतो़ जेथून फ्लॅशबॅकमध्ये नाटक पोहोचलेले असते तेथे हे नाटक येऊन पोहोचते़ पुन्हा ते आजोबा, आजी आणि ती लहानगी मुलगी रंगमंचावर दिसतात़ आजोबा, आजी या मुलीला वाचविण्यासाठी झाडे लावली पाहिजेत़ पण झाडांसाठी पाणी नसते़ शेवटी दोघेही रक्त देऊन झाड जगवितात़ त्यांच्यासारखेच इतरही आपले रक्त त्या झाडाच्या बुंध्याशी सोडतात आणि झाड उभे राहते़ नैसर्गिक साधन संपत्ती जपली पाहिजे़ वाढवली पाहिजे़ वृक्षवली आम्हा सोयरे असा संदेश देत नाटकाचा पडदा पडतो़ साई वाघ यांच्या उत्तम प्रकाश योजनेने नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले़ कोलाजमध्ये वापरलेल्या अप्रतिम प्रकाश योजनेमुळे एकाचवेळी व्यासपीठावर तीन घटना वेगवेगळ्या भासविण्यात यश आले़ प्रतिके आणि प्रतिमांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात विशिष्ट प्रकारच्या प्रकाश योजनेने महत्वाची भूमिका निभावली़ प्रसंगानुरुप संगीत, वेशभूषा, नेपथ्याने नाटकात अधिक जीवंतपणा आणला़ नवख्या कलाकारांच्या किरकोळ चुका वगळता नाटकाचे सादरीकरण अप्रतिम झाले़ काही कलाकारांच्या चुका इतरांच्या समयसूचकतेमुळे झाकोळल्या गेल्या़ त्यामुळे या नाटकाचे सादरीकरण म्हणजे समयसूचकतेचा उत्तम नमुना ठरले़

कलाकार
प्रा़ रवींद्र काळे (भुमिका : विकास)
शशिकांत नजान (भुमिका : जज, विवेक)
शोभा चंदने (भुमिका : आई)
सतीश लोटके (भुमिका : बाप)
राधा जाधव (भुमिका : वसू)
रेखा दहातोंडे (भुमिका : सून)
लहुकुमार चोभे (भुमिका : वासुदेव)
गावकरी - आकाश तोडरमल, मंगेश जोंधळे, हर्षल वालेकर, श्वेता बागडे, संकेत गायकवाड, वैभव आवारे, महेश उमप, पराग पाठक, विलास घटविसावे, बाबासाहेब उमप
तंत्रज्ञ
दिग्दर्शक : सतीश लोटके, शशिकांत नजान
नेपथ्य : प्रा़ रवींद्र काळे
प्रकाश योजना : साई वाघ, स्वप्नील नजान
पार्श्वसंगीत : गौरी नजान
रंगभूषा/ वेशभूषा : उर्मिला लोटके, आकाश तोडरमल
रंगमंच व्यवस्था : मंगेश जोंधळे

आज सादर होणारे नाटक
अनफेअर डील

Web Title: Amateur State Drama Competition 2018: Untimely 'Thirty Thirteen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.