अहमदनगर एज्युकेशन हब करणे शक्य : डॉ. सर्जेराव निमसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 05:37 PM2018-12-30T17:37:34+5:302018-12-30T17:37:42+5:30

जी शहरे ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध असतात तेथे पर्यटन विकास व शैक्षणिक वाढीला संधी असते. नगरलाही शैक्षणिक हब होण्याच्या दृष्टिने मोठा वाव आहे. पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे काम खोळंबले असून समाजातील विविध घटकांचे

Ahmednagar Education Hub can be done: Dr. Serghera Nimse | अहमदनगर एज्युकेशन हब करणे शक्य : डॉ. सर्जेराव निमसे

अहमदनगर एज्युकेशन हब करणे शक्य : डॉ. सर्जेराव निमसे

Next

अहमदनगर : जी शहरे ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध असतात तेथे पर्यटन विकास व शैक्षणिक वाढीला संधी असते. नगरलाही शैक्षणिक हब होण्याच्या दृष्टिने मोठा वाव आहे. पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे काम खोळंबले असून समाजातील विविध घटकांचे शिष्टमंडळ स्थापन करुन याबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आपणही याप्रश्नी लक्ष घालण्यास तयार आहोत, असे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निमसे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विविध प्रश्नांवर मतप्रदर्शन केले. नगर हे राज्याचे मध्यवर्ती केंद्र आहे. हे शहर म्हणजे मराठवाडा, विदर्भ यांचे प्रवेशद्वार आहे. पुण्याप्रमाणेच येथे शैक्षणिक संस्थांच्या वाढीला संधी आहे. नगर जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनरी, जिल्हा मराठा, रयत शिक्षण संस्था, हिंद सेवा मंडळ यांसह इतरही नामवंत शिक्षण संस्था आहेत. या सर्व संस्था चांगले काम करत आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे उपकेंद्र झाले तर विद्यार्थ्यांची मोठी सोय नगरला होईल. या उपकेंद्रात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध झाल्यास थेट विद्यापीठ कॅम्पसमध्ये शिक्षण घेता येईल. २००६ ला या केंद्राची कल्पना आल्यानंतर शंभर एकर जागा मोफत उपलब्ध झालेली आहे. विद्यापीठ अधिकार मंडळांवरील व्यक्तींनी यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. ठरविले तर येत्या जूनपासून काही अभ्यासक्रम सुरु करता येतील. समाजातील मान्यवर व्यक्तींनी यासाठी शिष्टमंडळ स्थापन करायला हवे. विद्यापीठाकडे पैसा आहे. मात्र इच्छाशक्ती कमी पडत आहे.
नगर शहरात शासकीय तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. याच कॅम्पसमध्ये सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय निर्माण करुन हा सर्व परिसर ‘तांत्रिक शिक्षण संकुल’ म्हणून पुढे आणणेही शक्य आहे. प्रयत्न केल्यास नगरला वैद्यकिय महाविद्यालयही आणता येऊ शकेल. आपण स्वत: प्राचार्य असताना न्यू आर्टस् महाविद्यालयात ‘कम्युनिकेशन स्टडीज’ हा अभ्यासक्रम सुरु केला. हा अभिनव प्रयोग व धाडसी निर्णय होता. कारण त्यावेळी ग्रामीण भागात या अभ्यासक्रमाची माहितीही नव्हती. मात्र, याच अभ्यासक्रमामुळे नगर शहरातून नागराज मंजुळे, भाऊराव कºहाडे हे दिग्दर्शक घडले. नगर ही आता सिनेमांची निर्मिती करणारी भूमी झाली आहे. पुणे, मुंबईचे लक्ष त्यामुळे नगरच्या या अभ्यासक्रमाकडे वेधले गेले. यातून रोजगार व कलावंत निर्माण झाले. तुमच्या भागातील शैक्षणिक व सामाजिक वातावरण काय आहे? यावर तुमचा विकासाचा अजेंडा ठरतो. शिक्षणाची गरज भागविण्यासाठी खासगी संस्था काही प्रमाणात हव्या आहेत. मात्र, सरकारी शिक्षण संस्थाच पुरेशा हव्यात. कारण सरकारी व खासगी संस्थातील शुल्कात तफावत आहे. अनुदानित तत्त्वावरील शिक्षकांना पुरेसे वेतन व विनाअनुदानीतला मात्र वेतनाची मारामार ही दरीही मिटायला हवी. कारण त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे.

शैक्षणिक क्षेत्रात राजकारण आणणे अयोग्य
सध्याचे सरकार शिक्षणात मोठ्या सुधारणा करेल असे अपेक्षित होते. २०१४ मध्ये नवीन शैक्षणिक धोरणासाठी सूचना मागविण्यात आल्या. मात्र, पाच वर्षानंतरही धोरण तयार झाले नाही. शिक्षणात उच्चपदस्थ पदे नियुक्त करताना त्या व्यक्तीच्या गुणवत्तेला महत्त्व आहे. मात्र, सध्या राज्य व केंद्राच्या विविध विद्यापीठांत विशिष्ट विचारसरणीचे लोक नियुक्त करण्याचा चुकीचा पायंडा पाडला जात आहे हे शिक्षणाच्या दृष्टीने घातक आहे. केंद्रीय विद्यापीठातील नऊ कुलगुरु पात्र नसल्याने त्यांना घरी जावे लागले ही देशासाठी चिंताजनक बाब आहे याकडे डॉ. निमसे यांनी लक्ष वेधले.

रोजगार निर्मितीत सरकारला अपयश
दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण होतील असे सध्याचे सरकार म्हणाले होते. पण, रोजगार निर्मितीचा दर नकारात्मक आहे. रोजगारामुळे आर्थिक विकासाचा दर वाढलेला नसून सेवा क्षेत्रातून जो पैसा उपलब्ध झाला त्याद्वारे वाढला आहे. तरुणांना रोजगार मिळाला नाही, तर समाजात अस्थिरता निर्माण होईल. त्यामुळे रोजगार कसे निर्माण होतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरसारख्या जिल्ह्यांतील औद्योगिक क्षेत्राला चालना देणे आवश्यक आहे.

शेतीतील अस्थिरताही विकासाला मारक
बहुतांश शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळाली. मात्र, त्यासाठीची यंत्रणा कार्यक्षम नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. हा दर गत पाच वर्षांपूर्वी पाच व साडेचार टक्के होता. मात्र, सध्या दोन टक्के आहे. त्यामुळे एकतर शेतीची धोरणे चुकत आहेत किंवा अंमलबजावणी चुकत आहे. शेतकरी अस्वस्त रहाणे हे परवडणारे नाही, असेही निमसे म्हणाले.

Web Title: Ahmednagar Education Hub can be done: Dr. Serghera Nimse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.