केडगावमध्ये ८ वर्षात २५ जणांचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 04:00 PM2019-05-09T16:00:47+5:302019-05-09T16:00:50+5:30

नगर-पुणे राज्य मार्गाचे चौपदरीकरण होऊन ८ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला.

25 people killed in Kadgaon in 8 years | केडगावमध्ये ८ वर्षात २५ जणांचा बळी!

केडगावमध्ये ८ वर्षात २५ जणांचा बळी!

Next

योगेश गुंड
केडगाव : नगर-पुणे राज्य मार्गाचे चौपदरीकरण होऊन ८ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला. मात्र केडगाव रस्त्यालगत असणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांचे लाड पुरवणाºया जिल्हा प्रशासनाने याच भागात २५ जणांचे नाहक बळी घेतले. केडगावमध्ये व्यावसायिकांचे अतिक्रमण थेट हायवेवर येऊनही प्रशासकीय व्यवस्था इतकी सुस्त असल्याने केडगाव वेशीतील चौपदरीकरण करणार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
नगर-पुणे राज्यमार्गाचे चौपदरीकरण दोन टप्प्यात झाले. पुणे ते शिरूर आणि शिरूर ते नगर असे ते दोन टप्पे होते. मात्र शिरूरपासून निघालेला चौपदरीकरणाचा घोडा थेट केडगाव वेशीत येऊन अडकला. मुळात नगरमध्ये चौपदरीकरण झाले मग केडगावमध्ये हे काम का थांबण्यात आले, असा प्रश्न या मार्गातून रोज ये-जा करणाºया प्रवाशांना पडतो आहे. ज्यावेळी केडगावमधील वेस परिसरातील ७०० मीटरचे चौपदरीकरण स्थानिक लोकांनी अडवले तेव्हा मार्गात येणारे मंदिर व मशीद यांचे राजकारण करण्यात आले. नंतर मंदिर व मशीदमधील विश्वस्तांनी आपल्या धार्मिक स्थळांचे बांधकाम स्वत:हून बाजूला करून प्रशासनाला सहकार्य केले.
आता केडगावमधील सर्व अडथळे दूर झाले असे वाटत असतानाच वेस परिसरात भुयारी मार्ग करायचा की स्काय वॉक करायचा या वादात शिवसेना व कोतकर (काँग्रेस) समोरासमोर आले. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सर्व राजकीय पक्षीयांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर कोणताच तोडगा न निघाल्याने व त्यातच स्थानिक व्यावसायिकांनी याला विरोध केल्याने केडगावमधील राजकारणी मतांच्या राजकारणाला बळी गेले. हातावर बोट ठेवण्याचे धोरण घेतले.
केडगाव वेस परिसरात जवळपास ७०० मीटर अंतर चौपदरीकरण काम रखडले आहे. यामुळे या भागात २४ तास वाहतुकीची कोंडी होत असते. त्यात दुकानदारांनी आपले दुकान आणि शेड थेट हायवेपर्यंत नेले आहेत. कोणाचे लक्ष नाही म्हणून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून नगर-पुणे मार्गाला अरुंद करण्यात आले. यामुळे दरवेळी वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक ठप्प होते. यातून रोज लहान मोठे कित्येक अपघात होत असतात. आतापर्यंत २५ जणांचा नाहक बळी या अरुंद रस्त्यामुळे गेला आहे.

नगर-पुणे राज्य मार्ग आता राष्ट्रीय महामार्गात येणार आहे. केडगावमधील सर्व भागाचे चौपदरीकरण होणार असून सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी लागणार आहे. हे काम लवकरच सुरू करू. - प्रफुल्ल दिवाण, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग

 

Web Title: 25 people killed in Kadgaon in 8 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.