पाणी, वीज, रस्त्यासाठी शेवगाव नगरपरिषदेच्या १२ नगरसेवकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:38 PM2018-04-16T16:38:25+5:302018-04-16T16:38:25+5:30

नगरपरिषदेच्या सत्ताधारी पक्षांसह सर्वपक्षीय १२ नगरसेवकांनी सोमवारी येथील शिवाजी चौकात दिवसभर बेमुदत उपोषण आंदोलन करून या विषयीच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

12 corporators of Shavgaon Municipal Council hunger strike for water, electricity and roads | पाणी, वीज, रस्त्यासाठी शेवगाव नगरपरिषदेच्या १२ नगरसेवकांचे उपोषण

पाणी, वीज, रस्त्यासाठी शेवगाव नगरपरिषदेच्या १२ नगरसेवकांचे उपोषण

Next

शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेच्या घंटागाड्यासह इतर सर्व वाहने बंद असल्याने कचरा कोंडी निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याची समस्या बिकट बनली आहे. पिण्याचे पाणी,वीज, अंतर्गत रस्ते, सांडपाण्याचे निर्मुलन आदी समस्यांची तीव्रता वाढत चालल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना सहन करावा लागत आहे.याबाबत संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषदेच्या सत्ताधारी पक्षांसह सर्वपक्षीय १२ नगरसेवकांनी सोमवारी येथील शिवाजी चौकात दिवसभर बेमुदत उपोषण आंदोलन करून या विषयीच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
शेवगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या घंटा गाड्या, ४०७ टेम्पो जेसीबी आदी वाहने गेल्या अनेक दिवसापासून नादुरस्त असल्याने शहरात कचरा निर्मूलनाची समस्या उभी ठाकली आहे. विविध प्रभागात कचरा व घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याची समस्या बिकट बनली आहे. शहराच्या विविध परिसरातील विद्युत खांबावरील वीज पुरवठा बंद असल्याने तसेच विजेचे पथदिवे, हायमॅक्स बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले असून चोरी मारीच्या घटनामध्ये बेसुमार वाढ झाल्याच्या तक्रारी आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या वोलची दुरुस्ती व पाण्याची गळती सुरु असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करताना नाकी नऊ आले आहे. बाजार तळावरील भाजी मंडईचे काम पूर्ण होऊन कालावधी लोटला, मात्र ही इमारत नगरपरिषदेच्या ताब्यात नसल्याने आठवडे बाजारासाठी येणा-या विक्रेते व नागरिकांना गैरसोय सहन करण्याची वेळ आली आहे. एकंदरीत नगरपरिषदेच्या कामकाजावर मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांचे नियंत्रण नसल्याने अनागोंदी कारभार वाढल्याच्या तक्रारीवरून हे उपोषण आंदोलन पुकारण्यात आले होते. नगरसेवक अरुण मुंढे, सागर फडके, वजीर पठाण, शब्बीर शेख, अजय भारस्कर, विकास फलके, कृष्णा ढोरकुले, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, भाऊसाहेब लिंगे, विनायक मोहिते, नितीन दहिवाळकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. माजी सरपंच सतीश लांडे, एजाज काझी, हरिश भारदे, राहुल मगरे, मच्छिंद्र देहाडराय, विक्रांत लांडे, बाळासाहेब गायकवाड, अविनाश देशमुख आदींनी या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.

Web Title: 12 corporators of Shavgaon Municipal Council hunger strike for water, electricity and roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.