मोक्ष म्हणजे काय ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:47 AM2019-02-05T11:47:44+5:302019-02-05T11:49:12+5:30

'धर्म' म्हणजे लौकिकाथार्ने असलेला धर्म नव्हे तर याचा खरा अर्थ आहे  'गुण'.

What is salvation ? | मोक्ष म्हणजे काय ? 

मोक्ष म्हणजे काय ? 

googlenewsNext

- प्रा. सु. ग. जाधव

देहाची नश्वरता मान्य करूनही देहाचं महत्त्व अमान्य करता येत नाही. कारण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती देहाद्वारेच होत असते. याचा दुसरा अर्थ असा की हे चारही पुरुषार्थ आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहेत. परंतु सूक्ष्म निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की या चारांपैकी फक्त मोक्ष हेच ध्येय आहे आणि उरलेली इतर मात्र त्या मोक्ष प्राप्तीचे साधनं आहेत. यातील पहिला पुरुषार्थ 'धर्म' हा आहे. हा 'धर्म' म्हणजे लौकिकाथार्ने असलेला धर्म नव्हे तर याचा खरा अर्थ आहे  'गुण'.  जसे अग्नीचा गुण उष्णता देणे, पाण्याचा गुण प्रवाहित राहणे आणि शीतलता देणे, वाऱ्याचा गुण वाहत राहणे, आदी़ याच अर्थाने माणसाचा गुण 'माणुसकी' हाच आहे. हल्लीच्या काळात हाच गुण लोप पावत चालला आहे.

' धर्म ' म्हणजे चारही आश्रम नव्हेत. धर्म म्हणजे चारही वर्ण नव्हेत. धर्म म्हणजे पूजापाठ करणे हेही नव्हे. धर्म हा बाह्यांग आहे आणि अध्यात्म हे त्याचे अंतरंग आहे. मनुष्याने माणुसकी जपणे याचा अर्थ सर्व प्राणिमात्र बद्दल प्रेम असणे, त्यांच्या रक्षणार्थ कार्य करणे, इतरांसाठी देह शिजविणे, देश सेवा करणे आणि देशाचे रक्षण करणे, हा 'धर्म' आहे. थोडक्यात 'धर्म' म्हणजे प्रत्येकाचे कर्तव्य होय. शिक्षकाचा धर्म म्हणजे प्रामाणिकपणे आणि तळमळीने अध्यापन करणे हा होय. विद्यार्थ्यांचा 'धर्म' म्हणजे अध्ययन करणे आणि ज्ञानप्राप्ती करणे. असेच इतरही व्यवसायाबद्दल सांगता येईल. तेव्हा 'धर्म'  याचा अर्थ कर्तव्य असा असल्याने तो आपल्याला करावाच लागतो, म्हणूनच ते काही ध्येय नाही.

धर्माचे पालन करूनच दुसरा पुरुषार्थ 'अर्थ' प्राप्त करावा लागतो. या ठिकाणी 'अर्थ' म्हणजे केवळ पैसा किंवा संपत्ती नव्हे तर जीवनाला आवश्यक असलेल्या सर्व बाबी होत जेणेकरून आपले जीवन सुसह्य होईल आणि आपण मोक्षप्राप्तीच्या मार्गामध्ये अग्रेसर राहू. 'अर्थ' प्राप्त करीत असताना जर गैरमार्गाचा वापर केला तर तो अनर्थ ठरतो. यालाच आजच्या भाषेमध्ये 'भ्रष्टाचार' असे म्हटले जाते. जेव्हा धर्म चुकतो तेव्हा अथार्चा अनर्थ होतो आणि जेव्हा ह्या दोन्ही बाबी चुकतात तेव्हा कामपूर्ती अर्थात इच्छापूर्तीचे समाधान मिळत नाही. यामुळेच गैरमार्गाने कोट्यावधी रुपये प्राप्त करूनही अशा व्यक्तींना सुखाची झोप प्राप्त होत नाही. प्रामाणिकपणे आणि कायदेशीर मार्गाने पैसे कमावणाऱ्या व्यक्तीस सर्व सुख प्राप्त होतात़ कारण त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात,

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेंच करी

याचा अर्थ उत्तम व्यवहार करून धन जोडावे पण खर्च करीत असताना मात्र मनामध्ये खंत राहू नये. जेव्हा आपण या प्रकारे धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती करून घेतो तेव्हाच आपल्याला मोक्षप्राप्ती सहजगत्या होते. मोक्षप्राप्तीसाठी वेगळी साधना करण्याची गरज नाही कारण ते साध्य आहे आणि त्या अगोदरच्या बाबी म्हणजे साधनं होत. यासंदर्भात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, 

मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचे शरीर  ती गावी  (ज्ञाने.१२़१६़१७३)

याचा अर्थ मोक्षप्राप्तीसाठी शरीर शिजविणे तेवढेच आवश्यक आहे. शरीराचे असे आहे की ते वापरले नाही तरी आपोआप झिजते. म्हणूनच शरीराची व्याख्या,  शर्यते इती शरीर: अशी करण्यात आली आहे. म्हणजेच ज्याची झीज होते त्यालाच शरीर असे म्हटले जाते. यासाठीच जोपर्यंत शरीर सक्षम आहे तोपर्यंतच आपले ध्येय गाठले पाहिजे. मोक्ष साध्य करण्यासाठी संसार सोडण्याची आवश्यकता नाही, परंतु संसारांमध्ये जास्त गुंतवून सुद्धा राहणे तेवढेच धोकादायक आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, 

तैसे ते जाणतलियासाठी संसार 
संसाराची या गाठी लावून बैसवी पाटी मोक्ष श्रियायेचा.
(ज्ञाने.९़१़४६)

मोक्ष म्हटला की तो काहीतरी अवघड आहे असा समज अनेकांचा झालेला असतो. कारण याबाबत अनेकांनी विचारांचा नुसता गुंता केला आहे. परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी अत्यंत सोप्या शब्दात सांगितले आहे.

अजुर्ना जो यापरी ते विहित कर्म स्वयं करी
तो मोक्षाचा एलद्वारी बैठा होय  
(ज्ञाने.१८़४५़९८६)

ज्ञानेश्वर माऊलींनी यामुळेच विहित कर्म करण्यावर जोर दिला आहे. परंतु स्वत:ला संन्याशी बनवणारे लोक संसार सोडून आश्रम स्थापन करतात आणि समाजाचे आर्थिक शोषण करतात. यालोकांना कधीच मोक्ष प्राप्त होणार नाही, हे यावरून स्पष्ट  होते. शेवटी मोक्ष म्हणजे तरी काय आहे? मोक्ष म्हणजे दु:खाची आत्यंतिक निवृत्ती होय. दु:ख नाहीसे झाले की आपोआपच सुख आणि आनंद प्राप्त होतो. कारण आनंद हा आपल्या मनामध्ये अगोदर पासूनच आहे. आजच्या भाषेत आनंद हा इनबिल्ट आहे. परंतु त्यावर अज्ञानाची आणि कुसंस्काराची पुटं चढल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही आणि ही पुटं दूर करण्यासाठीच अध्यात्माची कास धरावी लागते अन्यथा, 'पुनरपि जननं पुनरपि मरणं' हे ठरलेलेच आहे.

(लेखक यशवंत महाविद्यालय नांदेड येथे प्राध्यापक, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाचे सचिव आहेत)

Web Title: What is salvation ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.