Vande Mataram | वन्दे मातरम्

- डॉ. गोविंद काळे

‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’ समर्थ सांगते झाले. कोणत्याही गोष्टीची अभिलाषा न बाळगता निरपेक्ष बुद्धीने भारतमातेसाठी सेवाकार्यरत असणारे असंख्य ऋषी, साधुसंत, विचारवंत होऊन गेले, ‘कुणी त्याची गणती ठेविली असे?’ १५ आॅगस्ट १९४७ भारत भू स्वतंत्र झाली.  परदास्याच्या शृंखला गळून पडल्या़ देशभर एकच घोषणा ‘वन्दे मातरम्। वन्दे मातरम्।’ पुढे तर बाबूजींनी गायिलेले ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वन्देमातरम्’ मराठी माणसाच्या अंत:करणाचा ठाव घेते झाले.
‘वन्दे मातरम्’ पहिल्यांदा कुणी उच्चारले असेल? कुणी लिहिले असतील हे दोन शब्द? त्याने आपला ठावठिकाणा सांगितला नाही. त्याचा शोध घ्यावासा वाटतो, पण तो कसा आणि कुठे भेटणार? संस्कृत बृहत् स्तोत्ररत्नाकरची फार जीर्ण झालेली आवृत्ती मिळाली. या ग्रंथामध्ये देवदेवताविषयक अनेक स्तोत्रे आहेत़ त्यातील अनेक स्तोत्रे मुखोद्गत असणारी मंडळी आजही विद्यमान आहेत. ग्रंथातील स्तोत्रांचे वर्गीकरण गणेश स्तोत्राणि, शिवस्तोत्राणि, देवीस्तोत्राणि अशा पद्धतीने केले आहे. भारतमाता ही देवीस्वरूप आहे त्यामुळे देवीस्तोत्राणि विभागाच्या सुरुवातीस भारतभूमातृ स्तोत्रम असून त्या स्तोत्राची सुरुवातच मुळी ‘वन्दे मातरम्’ शब्दाने करण्यात आली आहे.
‘वन्दे मातरम् अव्यक्तां व्यक्तांच जननीं पराम्
दीनोऽहं बालक: कांक्षे सेवां जन्मनि जन्मनि’
हे माते जन्मोजन्मी ह्या दीन बालकाला तुझी सेवा करण्याचे भाग्य लाभो अशी इच्छा व्यक्त होते़ देशभक्तीने ओतप्रोत भरलेले हे स्तोत्र नव्या बृहत्स्तोत्र रत्नाकर आवृत्तीतून गायब झाले आहे़ कर्ता कोण त्याचा नामनिर्देश आढळत नाही़ सत्कर्म करणारे सर्व भारतीय पुराणपुरुष सत्कीर्तीला मूठमाती देऊनच मन:पूर्वक योगदान देत होते़ कमवायचे तर त्यांना काहीच नव्हते़ सेवा हेच त्यांचे जगणे होते़ कोणतीही नावनिशाणी मागे न ठेवता मनुष्य जन्म सार्थकी लावून कृतार्थ व्हावे ही एकच उदात्त आकांक्षा होती़
शाळा-महाविद्यालयातून, मठ-मंदिरातून एवढेच नव्हे तर कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाची सांगता भारतभूमातृ स्तोत्राच्या सामूहिक पठनाने व्हायला काय हरकत आहे़
निरंतरं भवतु मे मातृसेवांशभाग्यभाक्।
एषैव वांछा हृदये साक्षी सर्वात्मक : प्रभु: ॥
निरंतर भारतमातेची सेवा हीच एकमेव इच्छा सर्व भारतीयांची असली पाहिजे़


Web Title: Vande Mataram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.