अध्यात्मिक; सगुण व निर्गुण भक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:15 PM2019-06-24T13:15:59+5:302019-06-24T13:16:37+5:30

सगुण म्हणजे आपल्यासारखे देवाला रूप देणे व त्या रूपाची करता येईल तेवढी सेवा, पूजा करणे अथवा तनमनधनाने कायावाचामने आपले मन देवाच्या कीर्तन-भजनात नामस्मरणात तल्लीन करणे.

Spiritual; Sagun and Nirguna devotees | अध्यात्मिक; सगुण व निर्गुण भक्त

अध्यात्मिक; सगुण व निर्गुण भक्त

googlenewsNext

संकलन : बाबा मोहोड
प्रिय मित्र -
सगुण भक्ती म्हणजे काय ? हे आपण पत्राद्वारे विचारले आहे, याचे उत्तर माझ्या मते असे आहे की सगुण म्हणजे आपल्यासारखे देवाला रूप देणे व त्या रूपाची करता येईल तेवढी सेवा, पूजा करणे अथवा तनमनधनाने कायावाचामने आपले मन देवाच्या कीर्तन-भजनात नामस्मरणात तल्लीन करणे.
आपण जे सात्त्विक अन्न सेवन करतो व जी जी प्रक्रिया जीवनाला अर्पण करतो ती ती आपण मानलेल्या देवाला भक्तिभावाने, मनाने, संकल्पाने, सगुण स्वरूपाने अर्पण करूनच मग प्रभूवर करणे. जरी तो बोलत नसला, जेवत नसला व झोपत नसला तरी तशी भावना करून देवाला अर्पण करणे व अन्न्य भावाने आपल्या प्रभूच्या निकट राहणे याला सगुण भक्ती म्हणतात.
देवाच्या स्वरुपात आपली वृत्ती व आपले सर्वस्व विसरून जाणे, मी तू पणाचा भेदच नाहिसा करुन वृत्ती-शून्य अवस्था प्राप्त करणे याला निर्गुण उपासना म्हणतात. पण निर्गुण ही उपासनाच नसते. निर्गुणासाठी उपासक तरी कसा असणार? कारण, ज्या गुणानी ज्या भेदांनी निर्गुणाचे चिंतन करावे ते निर्गुणात संभवत नाहीत. म्हणून उपासना ही सगुणच संभवते व देव हा निर्गुणातूनच गुणाला आणावा लागतो. निर्गुण उपासना म्हणजे मनाला व बुद्धीला लीन करणे होय.
नामजप महिमा
प्रिय मित्र -
आपली भेट झाली. त्यामुळे मनाला आनंद वाटला. आपल्या चेहऱ्यावर जी एक प्रकारची सात्विक छटा आलेली आहे त्यावरून असे वाटते की आपण ईश्वरनामाचा जप करीत असले पाहिजे व त्यामुळेच आपल्या सर्व इंद्रियांना अंतर्मुख होण्याची ओढ लागलेली आहे.
बाह्य पदार्थाबद्दल आपले मन उदास झालेले दिसते आणि या पलीकडे आपणाला सहज समाधीचाही अभ्यास अनायासे घडेल व चित्त स्थिर होऊन अंतरंगातील भक्तिरसाचा स्वाद अमृतापेक्षाही गोड असा चाखावयास मिळेल.
मला अनेक लोक असे विचारतात की ईश्वर- नामाच्या जपात काय फलश्रुती आहे? माझा असा अनुभव आहे की, साधक म्हणा वा सेवक म्हणा, जेव्हा अत्यंत श्रद्धायुक्त मनाने अंतरंगात नामस्मरण करीत राहतो व आपल्या मनातच विवेकरूपी विचाराने मानस ध्यान करतो तेव्हा त्याला असा सात्विक आनंद प्राप्त होतो व मन इंद्रिय स्थिर रूपाने आपल्या अधिष्ठायी देवतेचा सात्विक आनंद घेतो. पण एवढ्याने हे साधक संपत नाही तर ज्याचे नामस्मरण भक्त करतो त्याच्या गुणांचे त्याच्या चारित्र्याचे स्फुरण भाविकांच्या अंतरंगात खेळू लागते व तो तेच विचार बाहेर फेकू लागतो आणि साधनपूर्तीकडे जेव्हा वृत्ती धाव घेते तेव्हा आपल्या इष्टदेवतेचेच कार्य भक्ताकडून घडते व म्हणून भाविकजन त्या भक्ताला आपल्या देवाचा अवतार मानतात. श्रीसंत तुकाराम महाराजांचे वचन आहे - ‘तुका म्हणे अळी, झाली भिंगोटी सगळी’ हीच नामस्मरणाची धारणा आहे.
पण बरेच लोक नामस्मरण घेण्याचे अगोदरपासूनच आपल्या पापाचे क्षालन व्हावे व आपल्याला आपली इच्छित वस्तू तातडीने प्राप्त व्हावी अशा अनेक वासनांनी आपले मन अस्थिर करतात. आणि मग ते आपल्या कामनेचेच भजन करू लागतात. म्हणून त्यांना देवाच्या नामस्मरणाचा आनंद मिळत नाही. जरी देव नामस्मरणाने पापे, तापे नाश करतो तरी भाविकांनी तसा संकल्प मनात मुळीच न ठेवता आपली वृत्ती नामस्मरणात रंगवावी. म्हणजे तुमच्याप्रमाणे सात्विक आनंद मिळणे स्वाभाविक आहे. असला हा अभ्यास भाविकांनी जरूर लक्षात घ्यावा, असे मला वाटते.
- तुकड्यादास

Web Title: Spiritual; Sagun and Nirguna devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.