भेदाभेद ईश्वर भक्तीत अमंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 05:59 PM2018-12-14T17:59:55+5:302018-12-14T18:08:46+5:30

मनामनामध्ये वितुष्ट निर्माण करून जाती-भेदाच्या, लिंग-भेदाच्या, पंथ-भेदाच्या भिंती उभा केल्या जात आहेत. ईश्वरासमोर या सर्व बाबी कशा अर्थहीन आहेत.

No place of Discrimination in god worship | भेदाभेद ईश्वर भक्तीत अमंगळ

भेदाभेद ईश्वर भक्तीत अमंगळ

Next

विठू माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा ।।
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी।।

आजच्या युगात जनाईने केलेले वर्णन हे विठ्ठलाचे रूप नजरेसमोर ठेवून आपणास खूप काही गोष्टी सांगून जाते. यंत्रांचे सारथी व्हा. परंतु आहारी जाऊ नका. तंत्रज्ञानाने परिपक्व होऊन माणसे एकमेकांपासून दुरावत चाललेली आहेत. व्यक्ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्याच्या ओघात कुटुंबापासून विभक्त होत आहेत . समाजामधील एकोपा कमी होऊन मानसिक दरी निर्माण होत आहे. याउलट संत जनाबाईने सर्वांना ईश्वराची लेकरे असे संबोधून जात, धर्म, पंथ, वर्ण या सर्व व्याधीपासून मुक्त राहून या समुदायास एकत्रित एकमूठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

आज या अभंगाच्या विपरीत वर्तन होताना दिसत आहे. जात, धर्म, पंथ यामधील दरी वाढत जात आहे. अशा विघातक बाबीच्या डोळ्यात हा जनाबाईचा अभंग झणझणीत अंजन आहे. जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता आहे. ते मिळविणे क्रमप्राप्त आहे. परंतु भौतिकवाद व चंगळवादात अडकून वेगळी संस्कृती निर्माण झाली आहे. वृद्धाश्रमात आई-वडिलांची व होस्टेलमध्ये मुलांची रवानगी केली जाते. येथूनच संस्कृतीचा ऱ्हास सुरू होत आहे. मनामनामध्ये वितुष्ट निर्माण करून जाती-भेदाच्या, लिंग-भेदाच्या, पंथ-भेदाच्या भिंती उभा केल्या जात आहेत. ईश्वरासमोर या सर्व बाबी कशा अर्थहीन आहेत, याचे उत्तम वर्णन संत जनाबार्इंनी केले आहे. आपणास घडवीत असताना जनाबाईने नामदेवास गुरू, मालक, पिता या अर्थाने संबोधलेले होते. नामदेवांचा सहवास लाभला त्याबाबत कृतज्ञता भाव जनाबाईने अत्यंत नम्रतेने व्यक्त करताना त्यांच्या भावना फार सुंदरतेने व्यक्त करतात. त्या म्हणतात, 

मी तो नामयाची दासी ।
जगी ठाऊक सर्वांशी ।।
नकळे विधिनिषेध काई ।
जनी म्हणे माझी आई ।।

 

नम्रता, कठोर परिश्रम, श्रद्धा या गुणांमुळे नराचा नारायण होतो. परंतु दिवसेंदिवस कमी होत जाणारी तत्त्वनिष्ठा व्यक्तींना अंधकाराकडे घेऊन जाते. याचाच एक प्रसंग संत कबीर आणि जनाबाई यांच्यात घडला. संत जनाबाईचे अभंग कबिरापर्यंत पोहोचले. एवढ्या उत्कटतेने हे अभंग कोण लिहिते याचा शोध घेण्यासाठी कबीर पंढरपूरला आले. त्यांना समजले की जनाबाई  नामदेवांच्या घरी कामास आहे. तेथे गेल्यावर कळले की ती गोपाळपुरात गोवऱ्या थापायला गेली आहे.

कबिरांना कळेना घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई एवढी तल्लीन होऊन अभंग कशी लिहू शकते. हे पाहण्यासाठी ते जेव्हा नदीकाठी गेले तेव्हा दोन स्त्रिया आपसात भांडताना दिसल्या. कबिरांनी त्यापैकी एकीला विचारले, जनाई कुठे आहे? त्यावर उत्तर मिळाले, ‘मीच ती जनाई’. आपण का भांडत आहात, यावर जनाईने उत्तर दिले की, आमच्या दोघींच्या थापलेल्या गोऱ्या हिने एकत्र केल्या आणि सर्व गोवऱ्यावर ती स्वत:चाच अधिकार सांगते.

यावर कबिरांनी जनाईला विचारले, आता कसे करायचे, यावर जनाई म्हटली, तुम्हीच निवाडा करा आणि एक-एक गोवरी कानाला लावून बघा, ज्या गोवरीतून विठ्ठल-विठ्ठल शब्द ऐकू येईल ती माझी गोवरी व ज्यामधून आवाज येणार नाही ती हिची गोवरी. ही प्रचिती स्वत: कबिरांनी अनुभवली आणि कबीर आश्चर्यचकित झाले. यावरुन एकच बोध होतो... कोणतेही काम लहान किंवा मोठे, हीन किंवा दर्जेदार नसते. ते स्वयंप्रेरणेने व चांगल्या विचाराने केल्यास यश हमखास मिळते.

- डॉ. भालचंद्र ना. संगनवार, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर

Web Title: No place of Discrimination in god worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.