नवरसी भरवी सागरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:13 AM2018-04-19T03:13:00+5:302018-04-19T03:13:00+5:30

ज्ञानेश्वरमाऊली सांगतात की, माझ्या जीवनात शब्दाइतके मोठेपण कशाला नाही. ‘अमृताचेही पैजा जिंंके’ ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वरमाऊली शब्दांच्या सामर्थ्यावर निष्ठा ठेवूनच करतात. शब्दानेच परमात्म्यालाही जाणणार आहे. जाणलेला परमात्मा लोकांसमोर उभा करणार आहे आणि शब्दानेच लोकसंवादही साधणार आ

 Navarasi Bharavi Sagruna | नवरसी भरवी सागरू

नवरसी भरवी सागरू

googlenewsNext

- डॉ. रामचंद्र देखणे

ज्ञानेश्वरमाऊली सांगतात की, माझ्या जीवनात शब्दाइतके मोठेपण कशाला नाही. ‘अमृताचेही पैजा जिंंके’ ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वरमाऊली शब्दांच्या सामर्थ्यावर निष्ठा ठेवूनच करतात. शब्दानेच परमात्म्यालाही जाणणार आहे. जाणलेला परमात्मा लोकांसमोर उभा करणार आहे आणि शब्दानेच लोकसंवादही साधणार आहे.
अनुभव घेणे आणि अनुभव व्यक्त करणे हे साहित्य होय. अंतर्मनाने बाह्यमनाशी केलेला संवाद म्हणजे साहित्य होय. पण भावानुभूतीचा आत्मसंवाद म्हणजे कविता होय. कवी कवितेतून एकीकडे रस निर्माण करून इतरांना आनंद देत असतो तर दुसरीकडे स्वत:च्या मनाशी संवाद करून आपणही आनंद घेत असतो. आपले काव्य कसे असावे याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात...
नवरसी भरवी सागरू।
करवी उचित रत्नांचे आगरु।
भावार्थाचे गिरीवरू।
निपजवी माये।
माझ्या काव्यात नवरसांचा सहजसुंदर शिरकाव होऊ दे. शब्दरत्नांचे आगर लाभू दे आणि भावार्थाचे गिरीवर त्यातून उभे राहू देत. काव्याची व्याख्या करताना विश्वनाथाने म्हटले आहे.
‘वाक्यं रसात्मकं काव्यम्।’
ज्यात नवरसांपैकी एक किंवा अनेक रस असतील त्याला काव्य म्हणावे. काव्यातील मुख्य तत्त्व किंवा काव्याचा प्राण ‘रस’ हाच होय. शब्दांना जे काव्यत्व येते ते रसांमुळेच. ‘रस्यते इति रस:’ ज्याचा आपण आस्वाद घेतो किंवा आवडीने चाखतो तो रस होय. काव्यशास्त्रवेत्यांनी १. शृंगार, २. हास्य, ३. करुण, ४. रौद्र, ५. वीर, ६. भयानक, ७. बीभत्स आणि ८. अद्भुत असे आठ रस सांगितले आहेत. निरनिराळ्या पंडितांनी त्यात शांत, भक्ती किंवा प्रेयान यापैकी रसाला घालून ‘नवरस’ ही संकल्पना मांडली आहे. ज्ञानदेवादी संतपरंपरेने वरील आठ रसांबरोबर ‘शांत’ रसालाही काव्यात महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे शांत रसाचे निवासस्थान.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
जेथ शांत रसाचिया घरा
अद्भुत आला आहे पाहुणेरा।
ज्ञानेश्वरीचा मूळ रस हा शांत रस आहे. अद्भुत रस हा त्याच्या घरी आलेला पाहुणा आहे. नवरसात शांतरस हा कळसावर शोभतो हे निश्चित.

Web Title:  Navarasi Bharavi Sagruna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.