चुंबकीय चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 04:34 AM2019-07-05T04:34:25+5:302019-07-05T04:34:40+5:30

वारकऱ्यांचा लोंढा कुठून येतो नि या चैतन्याच्या नदीत सामील होतो हे गुपितच आहे.

 Magnetic Chaitanya | चुंबकीय चैतन्य

चुंबकीय चैतन्य

Next

- विजयराज बोधनकर

पंढरपूरची वारी ही चैतन्याची नदी आहे. सतत तेरा-चौदा दिवस वाहत राहते. वारकऱ्यांचा लोंढा कुठून येतो नि या चैतन्याच्या नदीत सामील होतो हे गुपितच आहे. भक्ती आणि शिस्त यांचा संगम पाहायला मिळतो. ही वारी काही कालपरवाची गोष्ट नव्हे. इ.स.१२३७ च्या आसपास होयसाळ राजाच्या कारकिर्दीतल्या एका शिलालेखात विठ्ठलाचा आणि वारीचा उल्लेख आहे. पंढरी हे गावच मुळात शालीवाहन शकाच्या प्रारंभीपासून वसलेले आहे. इतका प्राचीन इतिहास या वारीला आहे. संतांच्या जन्मगावावरून अनेक पालख्या निघतात. तुकोबारायाच्या पालखीचासुद्धा इतिहास आहे. तुकारामाच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंबरबाबा ते तुकाराम त्यांच्यापासून आठव्या पिढीचे वंशज. तेव्हापासून किंवा त्याही अगोदरपासून या वारीची परंपरा सुरू आहे. विश्वंबरबाबांनंतरही त्यांचे दोन्ही पुत्र हरी आणि मुकुंद यांनी ही वारी केली. परंतु क्षत्रिय धर्म पालनाकारणे देहू सोडून राजाश्रयाला गेलेत. पुढे राज्यावर इस्लामी आक्रमणे झालीत. त्या वेळेस ते दोघेही लढाईत मारले गेलेत. त्यातल्या मुकुंदची बायको सती गेली व हरीची बायको गर्भवती होती. तिला मुलगा झाला तो विठ्ठल. त्यानेही विठ्ठलवारी चालू ठेवली. त्याला विवाहानंतर पदाजी नावाचा मुलगा झाला, पदाजीला शंकर नावाचा मुलगा झाला. शंकराच्या पोटी बोल्होबाने जन्म घेतला आणि बोल्होबाच्या पोटी तुकारामाने जन्म घेतला. बोल्होबाने चाळीस वर्षे पंढरपूरची वारी केली. त्यानंतर तुकाराम महाराज १४00 वारकऱ्यांसमवेत वारी करू लागले. त्यांचे धाकटे बंधू कान्होबा यांनीही वारी केली. तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायणबाबा यांनी वारीची परंपरा चालूच ठेवली ती आजतागायत सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून अनेक संतांची पावले या वारीला जाऊन मिळालीत. पंढरपूरची वारी हा निर्मळाचा ध्यास आहे. ही परंपरा शुद्ध भक्तीची आनंद यात्रा आहे.

Web Title:  Magnetic Chaitanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.