ज्ञान हेच ब्रह्म आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 06:24 PM2019-01-05T18:24:17+5:302019-01-05T18:24:51+5:30

भारतीय ऋषींनी सर्व विषयांवर आपापली मते उपनिषदात नोंदविली आहेत.

Knowledge is Brahma | ज्ञान हेच ब्रह्म आहे

ज्ञान हेच ब्रह्म आहे

googlenewsNext

अध्यात्मविद्या या विद्येस ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात. विचारवंत मानवाला सतत चिंतन करावयास लावणारे विषय म्हणजे ब्रह्म, आत्मा, जीव, जीवात्मा, जगत, माया, मानवी शरीर, मोक्ष वगैरे हे सर्व गूढ, गंभीर विषय असून त्यावर हजारो वर्षांपासून चिंतन होत आहे. भारतीय ऋषींनी सर्व विषयांवर आपापली मते उपनिषदात नोंदविली आहेत. उपनिषदांना ‘गुरुवाक्य’ असेही म्हणतात.

‘कोऽऽहम’ म्हणजे मी कोण आहे, मी कुठून आलो, माझे  इथे येण्याचे प्रयोजन काय आहे? या गहन प्रश्नांचे उत्तर उपनिषदात आढळून येते. ‘अथर्ववेदाच्या’ मांडुक्य उपनिषदात याचे उत्तर दिलेले आहे- अयमात्मा ब्रह्म. त्यातच ‘सोऽऽहम’ असेही उत्तर सापडते. ‘यजुर्वेदा’च्या बृहद्कारण्यात याचे उत्तर ‘अहंब्रह्मास्मि’ म्हणजे मी माझ्या छोट्याशा विश्वाचा कर्ता आहे. मी माझा परिवार, माझा व्यवसाय, घरदार, शेती वगैरेंचा कर्ता असून मी माझे छोटेसे विश्व निर्माण केलेले आहे, करु शकतो. माझ्या पत्नीसोबत युगलधर्माने मी माझे प्रतिरुप निर्माण करु शकतो. माझ्या विश्वाचा सांभाळ आणि संरक्षण करु शकतो, म्हणून ‘अहंब्रह्मास्मि’. 

सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदात त्या प्रश्नाचे उत्तर सापडते. ‘तत्वमसी’ म्हणजे तुही माझ्यासारखाच आहेस. या ठिकाणी मानवा-मानवातला फरक संपून जातो व सर्वजण समान आहेत, हे तत्त्वज्ञान आढळून येते व या ठिकाणी सर्व द्वैत संपून जाते. ऋग्वेदाच्या ‘ऐतरेय’ उपनिषदात (प्रज्ञान ब्रह्मा) हे महावाक्य आढळून येते. याचा अर्थ असा की, ज्ञान हेच ब्रह्म आहे. ज्ञानानेच माणसाचे जीवन सुखी, संपन्न, समृद्ध होवू शकते. 

पाश्चात्य विद्वानांच्या मते, अतिसूक्ष्म अशा जीव असलेल्या कणापासून कोट्यवधी वर्षांत पृथ्वीवर सर्व जीव निर्माण झालेले आहेत. तो कण ‘बिग बँग’ म्हणजे, विश्वात कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड स्फोटातून निर्माण झालेला ‘हिग्जबोसान’ म्हणजे ‘देवकण’ होय. पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली? हा गहन अभ्यासाचा विषय आहे. आज आपणास पृथ्वीवर चार प्रकारचे जीव आढळून येतात. १) उदभिज्ज म्हणजे, गवतापासून ते पिंपळ वटवृक्षापर्यंतचे सर्व वनस्पती व वृक्ष जे बिया किंवा फांदीपासून तयार होतात. २) श्वेदज म्हणजे, घामापासून निर्माण होणारे अल्पायुषी डास, कीटक. ३) अंडज म्हणजे, अंड्यातून निर्माण होणारे मासोळीपासून ते मगरीपर्यंतचे प्रचंड प्राणी. ४) जरायूज म्हणजे मातेच्या गर्भात वाढून जन्म घेणारे पशू व मानव.

हा मानव लक्षावधी वर्षे इतर प्राण्यांसारखाच केवळ उदरभरणासाठीच जगत होता. परिवाराच्या प्रेमामुळे कुटुंबव्यवस्था आपोआप अस्तित्वात आली व त्याचे रुपांतर ‘समूह’ किंवा ‘टोळी’त झाले. अशा अनेक टोळ्या जेव्हा उपजीविकेच्या साधन उपलब्धतेमुळे एकत्रित येवू लागल्या तेव्हा सहजीवनासाठी काही बंधनाची आवश्यकता जाणवू लागली आणि येथूनच निर्माण झाले गहन, चिंतन, मनन, प्रयोग, अध्यात्म व धर्म. 

- डॉ. भरत गहलोत ( सेवानिवृत्त प्राध्यापक व सर्वधर्माचे अभ्यासक, नांदेड ) 

Web Title: Knowledge is Brahma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.