आनंदाचे डोही आनंदतरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 06:04 PM2019-02-16T18:04:12+5:302019-02-16T18:04:30+5:30

जो आनंदी आहे तो निश्चितच सुखी असतो. म्हणून आनंदाचे क्षण वेचणे आणि त्याचे सुखात परिवर्तन करणे गरजेचे आहे.

Happiness own delight | आनंदाचे डोही आनंदतरंग

आनंदाचे डोही आनंदतरंग

Next

गुरुविना नाही दुआ आधार ।
रडता पडता कोठे अडता तोच नेतसे पार ।।

गुरूचा महिमा यापेक्षा अधिक सांगणे नको, जन्मतः व्यक्तीं ज्ञानी असू शकत नाही. आई-वडील, बहिण-भाऊ, समाज इत्यादीपासून त्यास अनेक बाबींचे ज्ञान प्राप्त होते. मानवांला विविध माध्यमातून व व्यक्तीकडून ज्ञान प्राप्त होते. सदर ज्ञानाचा उपयोग  सत्कार्य व समाज उन्नतीसाठी होणे गरजेचे असते. आजची सर्वांची धडपड ही सुख मिळवण्यासाठी होत आहे. प्रत्यक्षात हे प्रयत्नही आनंद मिळवण्यासाठी होण्याची गरज आहे. आनंद आणि सुख या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. आनंद आहे तेव्हा चूक निश्चितच असते. परंतु सुख आहे म्हणजे आनंद आहेच. असे नाही सुखाची व्याख्या ही बहुतेक वेळा भौतिक सुखात अथवा शारीरिक ऐषोआरामात केली जाते. घर, गाडी, पैसा उपलब्ध आहे. म्हणजे सुख आहे, असे होऊ शकेल. परंतु तो आनंदी आहे असे निश्चितच होत नाही. सुखाच्या विरुद्धार्थी दुःख असा शब्द सापडेल परंतु आनंदाचा विरुद्धार्थी जो तंतोतंत जुळतो असा शब्द सापडत नाही. म्हणून खरे आनंदाच्या शोधात जे महापुरुष गेले त्यांना गुरूच्या माध्यमातूनच आनंदाचा आणि परम सुखाचा शोध घेणे शक्य झाले.

जो आनंदी आहे तो निश्चितच सुखी असतो. म्हणून आनंदाचे क्षण वेचणे आणि त्याचे सुखात परिवर्तन करणे गरजेचे आहे. आनंद हा मानण्यावर असतो. बहुतांश वेळी तो स्थितीवर अवलंबून असतो. पु.ल. यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर पारंपारिक पद्धतीने कढीचा फुरका मारणे या देखील एक प्रकारचा आनंद आहेच. ऐही सुखात आनंद व्यक्त करणाऱ्यांची संख्या अत्यंत जास्त आहे. 'होईल मी दास तुझा चरणाचा' असे म्हणणारे व समाजपरिवर्तनात अनन्यसाधारण योगदान देणारे महात्मे फार कमी. ज्या देशात अन्नावाचून व कपड्यावाचून राहणाऱ्यांची संख्या पूर्णतः सक्षम व स्वयंपूर्ण होणार नाही. तोपर्यंत मी देखील पंचांच परिधान करेल असे म्हणणारे व तेच तत्त्व अवलंबिणारे विद्वान एकटेच. सर्वांना सुख हे हवेच असते, तर दुःख हे कोणालाही नको असते. ज्ञानी व्यक्ती, संत-महात्मे, दुःख आणि संकटांना आव्हान मानतात. म्हणूनच संत तुकाराम महाराजांचा असलेला अभंग 'बरे झाले देवा निघाले दिवाळे' हा त्यांच्या निर्भीड निर्धाराचा व कणखर मनाचा निदर्शक आहे. प्रतिकूल परिस्थितीतच माणसाच्या  कर्तुत्वाचा कस लागतो व माणुसकी जिवंत राहते.
 

कार्ल सगान या शास्त्रज्ञाने आनंदाची व्याख्या करताना म्हटले आहे की, आपण या पृथ्वीवरचे बुद्धिमान प्राणी आहोत. आणि आपली ही बुद्धी आपल्याला आनंद देऊ शकते असे म्हटले आहे. कारण या शास्त्रज्ञांचे म्हणणे हे कदाचित भौतिक सुखाचा अनुसरून असू शकते. कारण आधी भौतिक आणि अध्यात्मिक अशी त्यांची धारणा होती. लोकांच्या आशा-आकांक्षा,महत्त्वकांक्षा याची पूर्तता होणे म्हणजे काय तर आनंद. असे बहुतांश वेळा सूत्र अवलंबले जाते. तरीही व्यक्तिपरत्वे आनंदाचा अर्थ वेगळा आहे. एक गोष्ट मात्र खरी की जर समाधानाची वृत्ती नसेल, तर कुठलीही भौतिक सुख मानवाला आनंद देऊ शकणार नाही. खरच निखळ आनंद कशाला म्हणतात?, हा राहतो कुठे?,  भेटतो कसा?,  कुणाशी बोलतो?, कुणाला हसवतो?, इत्यादी पडलेले अनेक प्रश्न आनंदाची अनुभूती असून प्रत्येकाने स्वतंत्रपणे उपभोगण्याची उर्मी आहे. आनंद आपल्या श्वासात आहे. तो मनात आहे, चराचरात आहे, पानात, फुला-फुलात निसर्गात आनंदानी भरलेला आहे. आनंदही कष्टाची मिळालेली परतफेड असू शकेल आणि मनाची निरातिशय अशी समाधान वृत्ती असते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आनंद हा एखादा संसर्गाप्रमाणे आहे. एकदा का त्याची लागण झाली की, त्या व्यक्तीच्या सहवासात आलेली व्यक्ती अनुभूतीने सुखावून जाते. पक्ष्यांच्या गुंजनात अत्यंत शांत जलाशयातील एक तरंग, असेल तर एवढेच काय लहान मुलांच्या निरागस हास्यातदेखील केवढा आनंद आहे हे एकदा अनुभवून पहाच. 

- डॉ.भालचंद्र.ना.संगनवार ( जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भु.स.वि.यंत्रणा.लातूर.) 

Web Title: Happiness own delight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.