न लगो मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 02:16 PM2018-12-05T14:16:27+5:302018-12-05T14:17:04+5:30

काळाच्या प्रवाहाबरोबर पैसा संपत जातो, ठरवले तर ज्ञान मात्र वाढत जाते.

Do not allow wealth, saint's company forever | न लगो मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा

न लगो मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा

googlenewsNext

पैसा म्हणजे सर्वस्व मानणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पैशापुढे मानवता, आपुलकी, प्रेम, नाते हे सर्व गौण ठरत आहेत. नवविवाहिता म्हणजे पैशाचे झाडच आहे, असे समजून तिच्याबरोबर नको तसा व्यवहार केला जातो. आपल्या घरात आलेली सून म्हणजे आपली मुलगी आहे, ती आपली अर्धांगिणी आहे, असे न मानता तिचा मानसिक, शारीरिक छळ करुन तिला माहेरहून धन, संपत्ती आणण्यास अनेक कुटुंबात प्रवृत्त केले जाते.

लग्न करतेवेळी दाखविलेली माणुसकी, स्वार्थापोटी आपोआप व्यवहारात परीवर्तीत होते. पैशापुढे तिच्या मनाचा, सामाजिक बंधनाचा, माणुसकीचा कसलाच विचार केला जात नाही. आज असे कुठलेही क्षेत्र सुटले नाही की, ज्या क्षेत्रात पैसा म्हणजे सर्वस्व होऊन बसले नाही. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, खाजगी  क्षेत्र असो की अध्यात्मिक क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात पैसा सर्वस्व होऊन बसला आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे असे माणूस म्हणतो फक्त. पण प्रत्यक्ष वर्तन करतेवेळी मात्र हे विसरुन जातो. सांगणे सोपे करणे अवघड म्हटल्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे. पैशापेक्षा प्रेम, आपुलकी, माणुसकी हे सर्व महत्त्वाचे आहे, असे माणूस इतरांना सांगतो. स्वत:च्या बाबतीत मात्र हे भारदस्त शब्द कुठेच विरुन गेलेले असतात.

कांही दिवसापुर्वी मी शासकीय कामानिमित्त पुण्याला गेलो होतो. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर कार्यालयास जाण्यासाठी रिक्षा थांब्याकडे आलो. ओळीने येणाऱ्या रिक्षामध्ये बऱ्याच दुरच्या अंतरावर असणाऱ्या एका रिक्षाच्या पाठीमागील बाजूस पैशाशी संबंधित एक वाक्य लिहिलेले दिसले. म्हणून मी त्या रिक्षाच्या मागे जाऊन ते वाक्य वाचले. ते वाक्य असे होते, ''पैसा पैसा कमाऊं कैसा, अगर मर जाऊं तो साथ ले जाऊं कैसा''. मला ते वाक्य  खूप आवडले. म्हणून त्या रिक्षाचा क्रमांक येईपर्यत मी इतर रिक्षात बसलो नाही. क्रमाने तो रिक्षा येताच मी त्या रिक्षात बसलो. रस्त्याने त्या रिक्षाचालकासोबत पैसा या विषयावर मी बोलत होतो. तो या विषयावर इतके छान बोलत होता की, माझे प्रवचन, कीर्तन त्याच्यासमोर फिक्की आहेत, असे मला वाटत होते. आपण आज बरेच ज्ञान मिळविल्याचा मला आनंदही वाटत होता. अखेर कार्यालय आले. रिक्षा चालकाने ३२ रुपये बील देण्यास सांगितले. माझ्याकडे सुटे दोन रुपये नव्हते म्हणून मी त्याला ३० रुपये दिले. तो म्हणाला, साहेब आणखी दोन रुपये द्या. म्हणून मी ३० रुपये परत घेऊन त्याला ५० रुपयांची नोट दिली. त्याने मला १५ रुपये परत केले. मी त्यांना ३ रुपये परत देण्यास सांगितले. त्यावर तो म्हणाला साहेब ३ रुपयासाठी काय बारकाई करता? त्याचे हे वाक्य ऐकून मी त्याला म्हटले, तुम्ही दोन रुपये सोडत नाही तर मी तीन का सोडावेत? त्यानंतर मी त्याचा हात धरुन रिक्षाच्या पाठीमागे नेले. त्याला रिक्षावरील वाक्य वाचून दाखविले. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव उमटले नाहीत. तो हसला आणि मला म्हणाला, साहेब मागचे हे वाक्य रिक्षात मागे बसणाऱ्यांसाठी आहे. त्याने मला पुढच्या बाजूस नेऊन तो जिथे बसतो, तिथे मागच्या बाजूस म्हणजे मीटरच्या खालच्या पटट्ीवरील लहान अक्षरात लिहिलेले वाक्य मला दाखविले व म्हणाला हे वाक्य आमच्यासाठी आहे. ते वाक्य वाचून मी आवाक झालो. ते वाक्य असे होते, '' ना बाप बडा.. ना भैय्या, सबसे बडा रुपैय्या.'' 

जवळपास सर्वच संसारिक माणसांची हीच स्थिती झाली आहे. एक-एक पैसा कोठून व कसा मिळेल? मिळाला तर तो कसा लपवून किंवा झाकून ठेवता येइल? खर्च न करता कसा ठेवता येईल. या विचारात माणूस असतो. एक काळ असा होता की त्या काळात संत महात्म्यांना पोटभर अन्न मिळत नव्हते, अंगभर वस्त्रही मिळत नव्हते. तरीही त्यांनी कधी पैशाचा हव्यास केला नाही. उलट, '' न लगो मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा ! '' अशी मागणी ते परमेभराकडे  करायचे.  पैशाची भाषा वापरण्यापेक्षा संत महात्म्यांनी ज्ञानाची भाषा वापरली, पैशापेक्षा ज्ञानाची चिंता केली. शब्द, शब्द जमवू कसे, जमविलेले शब्द लोकांपर्यत पोहचवू कसे! ही संतांची चिंता होती. काळाच्या प्रवाहाबरोबर पैसा संपत जातो, ठरवले तर ज्ञान मात्र वाढत जाते. संतांचे अनुभवी ज्ञान आज विविध ग्रंथाच्या रुपाने आपल्यासाठी उपलब्ध आहे.

या ज्ञानाचा अनुभव घेतला तर पैशापैक्षा सर्वांना प्रेम, आपुलकी, माणुसकीची जास्त गरज असल्याचे दिसून येईल. आपणाला या गरजेची जाणीव होणे व जाणीवेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्या व दुसऱ्याच्या आनंदी जीवनात भर घालणे होय. खरे म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे जीवन आनंदासाठीच आहे. त्यामुळे तुम्हा आम्हा सर्वांना आनंदाची सतत अनुभूती येत राहो हीच सद्गुरू ज्ञानेश्रवर माऊली चरणी प्रार्थना. जय जय राम कृष्ण हरी !

- डॉ. विजयकुमार पं. फड, औरंगाबाद

Web Title: Do not allow wealth, saint's company forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.