तया चक्रवाकाचे मिथुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:56 PM2019-02-22T16:56:10+5:302019-02-22T16:59:15+5:30

एकदा काय झाले. भगवान श्री रामप्रभू सीतामाईच्या विरहामध्ये व्याकूळ होऊन वनामधून फिरत होते. तेव्हा त्यांचा तो विरह कोणालाही पाहवत नव्हता.

The Cyclonic Gemini | तया चक्रवाकाचे मिथुन

तया चक्रवाकाचे मिथुन

Next

मेलबोर्न (आॅस्ट्रेलिया): एकदा काय झाले. भगवान श्री रामप्रभू सीतामाईच्या विरहामध्ये व्याकूळ होऊन वनामधून फिरत होते. तेव्हा त्यांचा तो विरह कोणालाही पाहवत नव्हता. ते अतिशय व्याकूळ होऊन ‘सीते ! सीते !’ असे जोरात ओरडत होते. त्यांचा विरह बघून एक चक्रवाकाचे जोडपे मोठे आश्चर्यचकित झाले. चक्रवाक हे प्रेमाच्या बाबतीत मोठे प्रसिध्द आहेत. त्यांना एकमेकांचा क्षणभरही विरह सहन होत नाही.
त्या प्रेमी जोडप्यातील मादी चक्रवाकी तिच्या नराला म्हणाली, ‘का हो ! हा राम त्याच्या पत्नीच्या विरहामध्ये एवढा व्याकूळ झाला आहे. त्याला विरह सहन होत नाही, तुम्ही पण माझ्या विरहामध्ये असेच व्याकूळ व्हाल का हो’. त्यावर तो नर चक्रवाक म्हणाला, ‘अग ! राम वेडा आहे. त्याने आपल्या पत्नीला सोडूनच कशाला जायचे होते? जरी त्याला सोन्याचे हरीण मारावयाचे होते. तरी त्याने आपल्या पत्नीला बरोबर घेवूनच जायचे होते. मग कशाला तिचे रावणाने अपहरण केले असते आणि याला विरह पण झाला नसता व दु:ख झाले नसते’. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुझ्या विरहामध्ये व्याकूळ व्हायचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण मी कधीही तुला सोडून राहणारच नाही. मी काही रामासारखा वेडा नाही. त्यामुळे या रामासारखी माझ्यावर हि वेळच येणार नाही.’
हे बोलणे श्रीरामाने ऐकले आणि त्यांना या चक्रवाकाचा राग आला. श्रीरामाची खरी स्थिती त्याला माहित नसतांना त्याने श्रीरामावर टीका केली होती. त्या चक्रवाकाला विरह असा कधीही माहितच नव्हता. कारण तो त्या चक्रवाकीला सोडून कधीही राहतच नव्हता. रामप्रभूंनी रागाचे भरात त्याला शाप दिला व म्हणाले , ‘अरे चक्रवाका, तुला माझी विरह अवस्था समजली नाही. कारण तुला याचा अनुभवच नाही. म्हणून मी तुला आता शाप देतो. तु ! या विरह अवस्थेचा येथून पुढे दररोज अनुभव घेशील, तुला पण तुझ्या पत्नीचा विरह होईल म्हणजे मग तुला माझे दु:ख कळेल.
चक्रवाकाची पत्नी श्रीरामाला म्हणाली, ‘प्रभू ! माझे पतीने तुमच्यावर टीका केली म्हणून तुम्ही त्यांना शाप दिला हे मी समजू शकते पण! मी काय केले कि हा शाप मला पण भोगायची वेळ यावी ?’ रामप्रभू म्हणाले याचे एकमेव कारण म्हणजे तुला याची संगती आहे. म्हणून परेच्छा प्रारब्ध म्हणूनच तुला भोगावे लागेल. ‘तिने राम प्रभूंना विनंती केली व त्यांनी उ:शाप दिला कि, तुम्ही दिवसभर बरोबरच राहाल पण सूर्यास्त झाला रे झाला कि तुमचा विरह होईल आणि रात्रभर तुमचा विरह होऊन सूर्योदय झाला कि मग तुमचे पुन्हा मिलन होईल.
ही सुंदर कथा माउली ज्ञानोबारायांना माहित होती. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायात हाच दृष्टांत एका महत्वाच्या सिद्धान्ताकरीता वापरला आहे.
ते म्हणतात,
‘शब्दाचिया आसकडी’ ‘भेदनदीच्या दोही थडी’ ‘आरडते विरहवेडी बुद्धिबोधु
‘तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान’
‘ भोगावी जो चिद्गगन’ भुवनदिवा
‘जेणे पाहालिये पहाटे भेदाची चोरवेळ फिटे’
‘रिघती आत्मानुभव वाटे े पांथिक योगी ’
जोपर्यंत बुद्धीच्या ठिकाणी असलेला भेद जात नाही. तोपर्यंत दु:ख भोगावेच लागणार. कारण दु:खाचे खरे कारण म्हणजे अज्ञान असते. कोणतेही दुख हे अज्ञानामुळे भोगावे लागते. रोगाचे दुख औषधाने जाते. दारिद्याचे दु:ख पैशाने जाते. अज्ञानाचे दु:ख फक्त ज्ञानाने जाते व ते ज्याचे अज्ञान आहे त्याच्याच ज्ञानाने जाते. इतर ज्ञानाने जात नाही हे महत्वाचे. अज्ञान म्हणजे काही वस्तू आहे का ? तर नाही. अज्ञान म्हणजे न कळणे.
माउली म्हणतात, ‘आपुला आपणपेया’ ’विसरू जो धनंजया ‘तेची रूप यया अज्ञानासी’ आपलाच आपल्याला पडलेला विसर म्हणजे अज्ञान. मनुष्य जेव्हा झोपी जातो तेव्हा त्याला जागृतीचा विसर पडतो आणि तो सुषुपतीमध्ये जातो व या दोन्ही अवस्थेच्या मधल्या अवस्थेचे नाव आहे। ‘स्वप्न’ स्वप्न म्हणजे नसलेले दिसणे. जागृतीमध्ये स्वप्नस्थ पदार्थ काहीही कामाला येत नाहीत. किंबहुना जागृतीत स्वप्नस्थ पदार्थाचा बाध होतो म्हणजे ते पदार्थ भासमान काळी सुद्धा नव्हते असे कळते. स्वप्नात जे दु:ख होते ते जागृतीत आल्याशिवाय जात नाही किंवा ज्ञानोबाराय या १६ व्या अध्यायाच्या आरंभीच मंगलाचरणाच्या ओवीमध्ये म्हणतात, ‘मावळवीत विश्वाभासु’ ‘नवल उदयाला चंडांशु’ ‘अद्वैयअब्जनी विकासु ‘वंदू आता’ ‘विश्व हा भास आहे पण हे केव्हा कळेल तर श्रीगुरुकृपा होऊन अद्वैत तत्वज्ञानरुपी सूर्य उदय झाल्यावारोबर अज्ञानरूपी अंध:कार नष्ट होतो तसेच या बुद्धीच्या ठिकाणी असलेला भेद हा अज्ञानाच्या पोटात असतो म्हणून या बुद्धीची आणि बोधाची भेट झाल्याशिवाय अज्ञानरूपी अंध:कार जाणार नाही. अमृतानुभावामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘बुद्धी बोध्या सोके’ ‘परी एवढी वस्तू चुके’ ‘मनही संकल्पा निके’ याहीवारी’ ‘बुद्धी दृश्य पदाथार्ला सोके म्हणजे सत्यत्व देते भासमान पदाथार्ला मिथ्या न समजता खरे समजते आणि इथेच ती बुद्धी चुकते म्हणून बुद्धीचा आणि बोधाचा विरह झालेला आहे तो विरह संपला पाहिजे. ‘इंद्रियाणि पराण्याहु: इंद्रियेभ्य: परं मन: । मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स: ।। -श्रीमद्भगवद्गीता ३।४२ ‘या न्यायाने परमात्मा बुद्धीच्याही पलीकडे आहे त्याला दृष्यत्वाने किंवा ज्ञेयत्वाने जाणता येत नाही कारण ज्याला जाणायाचे तो परमात्मा तर आपणच आहोत, जसे सूर्योदय झाल्यावर चक्रवाकाचे मिलन होते त्याप्रमाणेच बुद्धी आणि बोधाचे मिलन झाल्यावर ‘अहं ब्रह्मास्मि’ या बोधावर बुद्धी येते व द्वैतभाव संपून जातो किंबहुना एकच परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे व हेच खरे जीव आणि ब्रह्माचे मिथुन म्हणजेच मिलन (ऐक्य ) होते व दु:खाची आत्यंतिक निवृत्ती होते. हीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे.


भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागवाताश्रम , चिचोंडी (पाटील)ता.नगर.
ह. मु. मेलबोर्न, आॅस्ट्रेलिया
मो. क्र. ६१+०४२२५६२९९१

Web Title: The Cyclonic Gemini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.