अतिवृष्टी... शेतात साचले पाणीच पाणी; कशी करावी सोयाबीन सोंगणी?

By सुनील काकडे | Published: October 7, 2022 02:25 PM2022-10-07T14:25:08+5:302022-10-07T14:25:23+5:30

शेतकऱ्यांचा जीव टांगणीला : परिपक्व सोयाबीनला कोंब फुटण्याची भिती

The water accumulated in the field is only water; How to make soybeans? washim farmers ask question | अतिवृष्टी... शेतात साचले पाणीच पाणी; कशी करावी सोयाबीन सोंगणी?

अतिवृष्टी... शेतात साचले पाणीच पाणी; कशी करावी सोयाबीन सोंगणी?

Next

वाशिम : जून महिन्याच्या प्रारंभी पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन सोंगून पोत्यांमध्ये सुरक्षितरित्या ‘पॅक’ झाले. मात्र, उशिराने पेरणी झालेले सोयाबीन परिपक्व अवस्थेत शेतात उभे असून सोंगणीच्या ‘स्टेज’ला आले आहे. असे असताना बुधवार, ५ ऑक्टोबरला जोरदार पाऊस झाला. गुरूवार आणि शुक्रवारीही ढगाळी वातावरण कायम राहून पाऊस सुरूच होता. यामुळे शेतात पाणीच पाणी साचून आहे. अशा स्थितीत सोयाबीनची सोंगणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

जिल्ह्यात चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर यंदा खरीपातील पिकांची पेरणी झालेली आहे. विशेषत: तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीनने व्यापलेले आहे. यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच पोषक वातावरण आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे सोयाबीनची वाढ अपेक्षेनुरूप झाली. विशेषत: या पिकांवर यंदा किडरोगांचा अधिक प्रादुर्भाव न झाल्याने विक्रमी उत्पादन हाती पडण्याची आशा शेतकऱ्यांना लागून होती.
दरम्यान, तीन ते चार दिवसांत सोयाबीनची काढणी प्रक्रिया सुरू होणार होती; मात्र ५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी साचून कापूस आणि सोयाबीनची प्रचंड हानी झाली आहे. अनेक ठिकाणच्या शेतात गुडघाभर पाणी साचून असल्याने सोयाबीनची काढणी नेमकी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. तथापि, यापुढेही काही दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. कृषी विभागाने तातडीची पाऊले उचलत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना शासनस्तरावरून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

चिखलात ना ट्रॅक्टर जात, ना मजूर; बळीराजा परिस्थितीपुढे ‘मजबूर’

शेतात सोयाबीनची झाडे वाळून कणकण झाली. प्रत्येक झाडाला शेंगा लदबदल्या आहेत. अर्थात काढणी करायची आणि सुड्या रचून लगेच ‘थ्रेशर’व्दारे दाणे काढून ते पोत्यात भरण्याची वेळ आली होती. अशात निसर्गाने अचानक चक्र फिरविले आणि काही तासांतच होत्याचे नव्हते झाले. आता चिखल आणि पाणी साचलेल्या शेतांमध्ये ना ट्रॅक्टर जात, ना मजूर. यामुळे सोयाबीनच्या रुपाने ‘कॅश’ समोर दिसतेय; पण ती उचलता येत नाही आणि अधिक विलंब झाला तर तीच ‘कॅश’ मातीमोल होणार आहे. या व्दिधा संकटात अडकलेला बळीराजा पुन्हा एकवेळ खऱ्याअर्थाने परिस्थितीपुढे ‘मजबूर’ झाला आहे.

Web Title: The water accumulated in the field is only water; How to make soybeans? washim farmers ask question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.