लाचखोर मुख्याधिकारी उमेश कोठीकर पाच महिन्यांनंतर निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 11:35 AM2022-12-03T11:35:43+5:302022-12-03T11:36:05+5:30

कळमनुरीचे मुख्याधिकारी असताना उमेश कोठीकर यांनी एका कंत्राटदाराकडून देयकासाठी ४० हजारांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

Bribery CEO Umesh Kothikar suspended after five months | लाचखोर मुख्याधिकारी उमेश कोठीकर पाच महिन्यांनंतर निलंबित

लाचखोर मुख्याधिकारी उमेश कोठीकर पाच महिन्यांनंतर निलंबित

Next

हिंगोली : लाच प्रकरणात चार दिवस अटकेत राहिलेल्या कळमनुरीच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश काढण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाला चार महिन्यांनी वेळ मिळाला. जुलैमध्ये ही घटना घडली होती, तर निलंबन २८ नोव्हेंबरला केले.

कळमनुरीचे मुख्याधिकारी असताना उमेश कोठीकर यांनी एका कंत्राटदाराकडून देयकासाठी ४० हजारांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. १६ जुलै २०२२ ते २० जुलै २०२२ पर्यंत या प्रकरणात ते पोलिस व न्यायालयीन कोठडीत होते. त्यामुळे १६ जुलैपासून त्यांना निलंबित झाल्याचे मानण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. तसेच पुढील आदेश काढले जाईपर्यंत ते निलंबित राहतील, असेही या आदेशात म्हटले. हे आदेश अंमलात असेपर्यंत त्यांना हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यालय म्हणून दिले आहे. शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.

शासनाने तब्बल पाच महिन्यांनी कोठीकर यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब याची प्रचिती यायला आणखी एक महिना शिल्लक होता, अशा उपहासात्मक प्रतिक्रियाही समाज माध्यमांवर मांडल्या जात होत्या.

Web Title: Bribery CEO Umesh Kothikar suspended after five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.