आगीत कंपनी जळाली, मात्र उद्योजकाने जिद्द नाही सोडली; काही तासातच पुन्हा सुरु केले काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 06:49 PM2022-12-08T18:49:15+5:302022-12-08T18:49:37+5:30

अग्निशमन विभागाच्या तत्परतेने तीन लघुउद्योग कंपन्यांना लागलेली आग आटोक्यात आली 

The company was gutted by fire, but the tenacious entrepreneur resumed work within hours | आगीत कंपनी जळाली, मात्र उद्योजकाने जिद्द नाही सोडली; काही तासातच पुन्हा सुरु केले काम

आगीत कंपनी जळाली, मात्र उद्योजकाने जिद्द नाही सोडली; काही तासातच पुन्हा सुरु केले काम

googlenewsNext

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम रोडवरील तीन लघुउद्योग कंपन्यांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. चिकलठाणा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांसह जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्यामुळे मोठे नुकसान टळले. तीन कंपन्यांचे मिळून १२ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाग्राम रोडवरील नंदकिशोर शिवाजी पठाडे (रा. किसान पार्क, पिसादेवी रोड) यांच्या ग्लोबल इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस या लघुउद्योग कंपनीला शॉर्टसर्किटमुळे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग शेजारच्या विठ्ठल गोरे यांच्या शिवकृष्ण इंडस्ट्री व गंगाधर वाहटुळे यांच्या जीएम इंटरप्राईजेस या लघू कंपन्यांपर्यंत पोहोचली. या आगीमध्ये ग्लोबल इलेक्ट्रिकल कंपनीतील कार्यालयासह फर्निचरने पेट घेतला, तर उर्वरित दोन कंपन्यांच्या छतावरील ताडपत्रीला आग लागली. ग्लोबचे १० लाख, तर दुसऱ्या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कंपनीत आग लागल्याची माहिती विठ्ठल गोरे यांनी नंदकिशोर पठाडे यांना दिली. तोपर्यंत घटनास्थळी चिकलठाणा अग्निशमन विभागाचे बंब पोहोचले. त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी सिडकोचे उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांच्यासह इतरांनीही घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद एम. सिडको ठाण्यात करण्यात आली. निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सतीश जोगस तपास करीत आहेत.

लघू उद्योजकाची जिद्द
काही महिन्यांपूर्वी ग्लोबल इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस या लघुउद्योगाच्या माध्यमातून नंदकिशोर पठाडे यांनी व्यवसाय सुरू केला होता. पहाटे कंपनीलाच आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना धक्काच बसला. मात्र, त्यातून सावरत त्यांनी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष फिल्डवरील कामाला सुरुवात केल्याची माहिती 'लोकमत'शी बोलताना दिली.

Web Title: The company was gutted by fire, but the tenacious entrepreneur resumed work within hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.