जिल्हा परिषद वित्त विभागाला बदल्यांमधून अभय !

By Admin | Updated: June 21, 2014 02:09 IST2014-06-21T02:09:15+5:302014-06-21T02:09:15+5:30

जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात बदल्यांचे वारे वाहत असताना लेखा व वित्त विभागाला मात्र यातून अभय दिले गेले आहे.

Zilla Parishion | जिल्हा परिषद वित्त विभागाला बदल्यांमधून अभय !

जिल्हा परिषद वित्त विभागाला बदल्यांमधून अभय !

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात बदल्यांचे वारे वाहत असताना लेखा व वित्त विभागाला मात्र यातून अभय दिले गेले आहे. सोलापूर कनेक्शनद्वारे वित्त विभागातील बदल्यांना ‘शह’ दिला गेला.
जिल्हा परिषदेमध्ये सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांना झरी, मुकुटबन, पाटण, वणीपर्यंत बदलीवर पाठविले जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या पारदर्शक कारभाराचा सर्वत्र डंका पिटला जात आहे. असे असतानाच वित्त विभागावर मात्र प्रशासन मेहेरबान झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. वित्त विभागातील कर्मचाऱ्यांबाबत अनेक तक्रारी आहेत. पदाधिकारीही या कर्मचाऱ्यांवर नाराज आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक कर्मचारी याच विभागात आणि विशेषत: एकाच टेबलवर काम करीत आहेत. त्यानंतरही यावर्षीच्या सामान्य बदल्यांमध्ये वित्त विभागाला अभय देण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती आहे. बदल्यांच्या तयारीचा एक भाग म्हणून समुपदेशन मात्र या विभागात केले गेले. वित्त विभागात चुकीच्या पद्धतीने पदोन्नती मिळविलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही बरीच आहे. त्यानंतरही या विभागाला बदल्यांसाठी हात लावण्याची प्रशासनाची तयारी नाही. प्रशासनाच्या पारदर्शक कारभाराचा गाजावाजा बघता अर्थ सभापतींनीही आपले एक पाऊल मागे घेतल्याचे बोलले जाते. वित्त विभागातील भोंगळ कारभार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांपुढे मांडण्याचा प्रयत्न काही कर्मचाऱ्यांनी केला असता त्यांना रोखण्यात आले आहे.
प्रशासनाच्या कारभाराबाबत पदाधिकारी नाराज आहेत. गेल्या आठवड्यात कार्यशाळेकडे पाठ फिरवून ही नाराजी दाखविली गेली आहे. तर दोन दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ सदस्याने फोनवर प्रशासनाची खरडपट्टी काढल्याचे बोलले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.