जिल्हा परिषदेत ‘देशी पव्वे’

By Admin | Updated: July 16, 2016 02:33 IST2016-07-16T02:33:19+5:302016-07-16T02:33:19+5:30

जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यप्रवण करून जनताभिमुख

Zilla Parishad's 'Nadvi Pavu' | जिल्हा परिषदेत ‘देशी पव्वे’

जिल्हा परिषदेत ‘देशी पव्वे’

बाटल्यांचा खच : पाणीपुरवठा विभागाजवळच साधला जातो कार्यभाग
रवींद्र चांदेकर यवतमाळ
जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यप्रवण करून जनताभिमुख करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. मात्र त्यांच्याच कक्षाच्या वर असलेल्या पाणी पुरवठा विभागाजवळील पुरूषांच्या प्रसाधनगृहात देशी दारूचे रिकामे पव्वे पडून असल्याचे दिसून आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी नुकताच सर्व कर्मचाऱ्यांना ‘ड्रेस कोड’ लागू केला. आता सर्वच कर्मचारी एकाच गणवेशात दिसू लागले आहेत. परिणामी जिल्हा परिषदेत शाळा भरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिंगला यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. याप्रमाणेच सिंगला यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जनतेची कामे तातडीने करण्याची तंबी दिली आहे. प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी कंबर बसली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी एकीकडे प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यांच्याच कक्षाच्या वरच्या माळ्यावर असलेल्या पाणी पुरवठा विभागाजवळ सावळागोंधळ दिसून येत आहे. पाणी पुरवठा विभागाला लागूनच पुरूषांचे प्रसाधनगृह आहे. या प्रसाधनगृहाच्या एका बाजूच्या संरक्षक भिंतीवर चक्क देशी दारूचे काही रिकामे पव्वे आडवे पडून आहेत. ते तेथे नेमके कसे आले, याचे गूढ मात्र गुलदस्त्यातच आहे. शुक्रवारी हे रिकामे पव्वे आढळले.
या माळ्यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय आहे. लगतच कार्यकारी अभियंत्यांचा कक्ष आहे. ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना येथूनच कार्यान्वीत होतात. पाणी हेच जीवन आहे. तेच पाणी दारूतही टाकण्यात येते. नेमक्या त्याच पाणी पुरवठा विभागाजवळील प्रसाधनगृहात देशी दारूचे रिकामे पव्वे आढळून आल्याचे नेमके इंगित काय असा प्रश्न आता पुढे आला आहे. दारूचे पव्वे नेमके कुठून आले, त्याचा शोध घेणेही महत्वाचे आहे.

इतर कार्यालयातही अशीच अवस्था
यवतमाळ शहरात विविध शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयातील प्रसाधनगृहात शिरल्यास तेथेही जिल्हा परिषदेसारखेच दृश्य दिसून येते. अनेकदा बाहेरुन येणारे नागरिकही आपला डाव साधतात. मात्र त्याचे खापर कर्मचाऱ्यांच्या माथी फोडले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित विभाग प्रमुखाने कार्यालयीन स्वच्छतेसोबतच प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेकडे आणि सुरक्षेकडेही लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जिल्हा परिषदे सारखे त्यांच्या कार्यालयाच्या प्रसाधनगृहाजवळ देशीचे पव्वे आढळू शकतात.

जबाबदारी कुणाची ?
यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा केली असता ही जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची असल्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठाकडे विचारणा केली असता त्यांनी बांधकाम विभागाची जबाबदारी असल्याचे सांगितले. त्यामुळे नेमकी जबाबदारी कुणाची असा प्रश्न आहे.

 

Web Title: Zilla Parishad's 'Nadvi Pavu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.