जिल्हा परिषदेचा बिगूल वाजला
By Admin | Updated: January 12, 2017 00:42 IST2017-01-12T00:42:10+5:302017-01-12T00:42:10+5:30
जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगूल अखेर बुधवारी वाजला.

जिल्हा परिषदेचा बिगूल वाजला
१६ फेब्रुवारीला मतदान : १६ पंचायत समित्यांमध्येही रणधुमाळी
यवतमाळ : जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगूल अखेर बुधवारी वाजला. १६ फेब्रुवारी रोजी त्यासाठी मतदान घेतले जाणार असून त्याची मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ६२ जागा आणि १६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्याला या निवडणूक तारखांच्या घोषणेची प्रतीक्षा होती. इच्छुक उमेदवार अनेक महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र, बुधवारी मुंबईत निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केल्याने आता तयारीला आणखी वेग येणार आहे.
जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. सध्या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता असून शिवसेना प्रमुख विरोधी पक्षात आहे. परंतु हे चित्र पूर्णत: उलटे करण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीत युतीला पोषक असलेल्या वातावरणाचा लाभ उठविण्याचा प्रयत्न निश्चित होणार आहे. जिल्ह्यात लोकसभा व विधानसभेत भाजपाचे वर्चस्व आहे. शहरी भागात भाजपाचे तर ग्रामीण भागात शिवसेनेचे वर्चस्व मानले जाते. त्यामुळे शिवसेना जोरदार तयारीला लागली आहे. २५ पेक्षा अधिक जागा मिळविण्याचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. संजय राठोड यांचे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद काढून घेतले गेल्याने भाजपाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला डिवचले आहे. याच कारणावरून भाजप-सेनेतील संबंध ताणले गेले आहे. शिवसेनेने स्वबळावर जिल्हा परिषदेत भाजपाला आडवे करण्याची घोषणा केली आहे. त्यावर भाजपाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी निकालातून सेनेला त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. हे ताणलेले वातावरण पाहता भाजप-शिवसेनेची युती होण्याची शक्यता कमीच आहे. जिल्ह्यात भाजपाकडे केंद्रीय गृह राज्यमंत्रिपद, पालकमंत्रिपद, पाच आमदार ऐवढी मोठी शक्ती असताना निवडणुकीत कुणाची साथ हवी कशाला, असा भाजपाच्या गोटातील सवाल आहे. एवढी शक्ती जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी पुरेशी असल्याचे कार्यकर्ते मानत आहे. जिल्ह्यात शिवसेनेकडे राज्यमंत्रिपद, खासदार आणि विधान परिषदेचे ‘वजनदार’ सदस्य आहेत. त्याबळावरच सेना जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना करीत आहे.
गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता राहिली आहे. सध्याही सर्वाधिक २२ जागा काँग्रेसकडे आहे. परंतु दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र मोदीलाट व भाजपाला पोषक वातावरण असल्याने काँग्रेसला किती यश मिळेल, याबाबत साशंकता आहे. त्यातच नेत्यांमधील गटबाजी प्रचंड उफाळून आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना एका छत्राखाली आणणार कोण, हा प्रश्न आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सत्तेबाहेर करण्यासाठी भाजप व सेनेची मंडळी जोरदार तयारीला लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आहे. परंतु आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोडकळीस आल्याचे चित्र आहे. पुसद वगळता कुठेही राष्ट्रवादीची ताकद दिसून येत नाही. भविष्यातील वाटचालीचा अंदाज आल्याने या पक्षातील अनेकांनी भाजपाच्या वाटेवर जाण्याची तयारी चालविली आहे. लवकरच राष्ट्रवादीचा पोळा फुटणार आहे. मनसे नगरपरिषद निवडणुकीत उघडी पडल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये त्यांचे अस्तित्व राहणार की नाही, याबाबत राजकीय गोटात साशंकता व्यक्त केली जात आहे. अनेकांचे जिल्हा परिषद सर्कल आरक्षित झाल्याने त्यांना एक तर शेजारील सर्कलमध्ये धाव घ्यावी लागत आहे किंवा पंचायत समितीचा विचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)