जिल्हा परिषद विषय समितीसाठी चुरस
By Admin | Updated: April 12, 2017 00:01 IST2017-04-12T00:01:43+5:302017-04-12T00:01:43+5:30
जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विषय समिती गठनाचे वेध लागले आहे. अद्याप विशेष सभेचा मुहूर्त न निघाल्याने त्यांची घालमेल सुरू आहे.

जिल्हा परिषद विषय समितीसाठी चुरस
सदस्यांची फिल्डींग : विशेष सभेवर नजरा
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विषय समिती गठनाचे वेध लागले आहे. अद्याप विशेष सभेचा मुहूर्त न निघाल्याने त्यांची घालमेल सुरू आहे.
पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली. अध्यक्षांसह उपाध्यक्ष व दोन सभापतींनी आपल्या समितीचा पदभार ग्रहण केला. उपाध्यक्ष व उर्वरित दोन सभापतींना अद्याप विषय समितींचे वाटप बाकी आहे. तथापि ते दोन सभापती संभाव्य विषय समिती मिळण्याची खात्री बाळगून संबंधित सभापतींच्या कक्षात विराजमान झाले. त्यांना विशेष सभेत खाते वाटप केले जाणार आहे. यासोबतच स्थायी, कृषी, पशुसंर्धन, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, अर्थ, जलव्यवस्थापन आदी समितींचे गठन केले जाणार आहे.
समिती गठन व सभापतींचे खाते वाटप करण्यासाठी सर्वच सदस्यांना विशेष सभेची आतुरता लागली आहे. सुरूवातीचा १३ एप्रिलचा मुहूर्त टळला असून आता २१ ते २५ एप्रिलच्या दरम्यान विशेष सभा बोलविण्यासाठी गुऱ्हाळ सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)
सर्वपक्षीय वर्दळ वाढली
पदाधिकाऱ्यांनी पदभार ग्रहण करताच जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची अचानक वर्दळ वाढली. यात भाजप कार्यकर्त्यांची सर्वाधिक गर्दी आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष सभापतींच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येते. यापूर्वी जिल्हा परिषदेत कधीही न दिसणारे चेहरेही आता दिसू लागले.