जिल्हा परिषद सदस्यांची मतदारसंघावर पकड सैल
By Admin | Updated: February 2, 2016 02:17 IST2016-02-02T02:17:02+5:302016-02-02T02:17:02+5:30
वर्षभरावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महागाव तालुक्यातील पाचही मतदारसंघाचा कानोसा घेतला असता,..

जिल्हा परिषद सदस्यांची मतदारसंघावर पकड सैल
महागाव तालुका : विकासकामांकडे दुर्लक्ष, वर्षभरावर येऊन ठेपल्या निवडणुका
संजय भगत महागाव
वर्षभरावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महागाव तालुक्यातील पाचही मतदारसंघाचा कानोसा घेतला असता, सदस्यांची पकड सैल झाल्याचे दिसून येते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तरी विद्यमान सदस्यांच्या पायाखालची वाळू सरकते. वर्षानुवर्ष तेच ते चेहरे दिसत असल्याने जनमतही त्यांच्या बाजुने दिसत नाही.
महागाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे महागाव, फुलसावंगी, गुंज, हिवरा आणि काळी दौ. हे पाच मतदारसंघ आहेत. महागावात जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य अनिल नरवाडे आहेत. मतदारांनी शहराच्या विकासाची मोठी संधी त्यांना दिली होती. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, महागाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती, ग्रामपंचायत उपसरपंच अशी अनेक पदे असतानाही शहराच्या विकासात मात्र त्यांनी भरीव योगदान दिले नाही. ही नाराजी नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी उघड केली. अनिल नरवाडे यांना एकही सिट निवडून आणता आली नाही. ही सक्रिय राजकारणासाठी धोक्याची घंटाच समजली जात आहे. महागाव जिल्हा परिषद मतदारसंघ गोठविल्या गेला नाही तर नवीन चेहऱ्याला निश्चितच संधी मिळू शकते.
फुलसावंगी जिल्हा परिषद मतदारसंघ सध्या पंचफुलाबाई चव्हाण यांच्या ताब्यात आहे. पडद्याआड माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. बाबूसिंग चव्हाण हेच सुत्रधार आहे. या मतदारसंघात बंजारा आणि आदिवासी बहुल मतांचे प्राबल्य आहे. परंतु त्यांच्या विकासाच्या योजना पोहोचविण्यात अपयश आले आहे. डांबरी रस्ते, पाणीटंचाई आदींवरून ग्रामपंचायत निवडणुकीत नाराजी दिसून आली. हिवरा जिल्हा परिषद मतदारसंघ स्मीता साहेबराव कदम यांच्या ताब्यात आहे. पडद्याआड साहेबराव कदमच सत्ताकेंद्र आहे. या मतदारसंघात मराठा मतांचे प्राबल्य असून, बंजारा मते निर्णायक आहेत. या मतदारसंघात उल्लेखनीय अशी काहीच कामगिरी दिसत नाही. विकासकामाला टक्केवारीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे योजनेतील कामांचा दर्जाही खालावला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सख्खा भाऊच त्यांच्याविरोधात पॅनल घेऊन उभा राहिल्याचे सर्वांनी अनुभवले आता हाच विरोध जिल्हा परिषदेतही दिसण्याची शक्यता आहे.
गुंज जिल्हा परिषद मतदारसंघ प्रा. शिवाजी राठोड यांच्या ताब्यात आहे. त्यांनी आपल्या संघटनकौशल्यावर मोठी फळी उभी केली आहे. परंतु अलिकडच्या काळात त्यांच्यात बदल झाल्याची भावना सामान्यांत दिसत आहे. पिंपळगाव, माळेगाव, गुंज अशा गावातील त्यांचे सोबती दुखावल्या गेले आहे. कधी नव्हे ती गुंज ग्रामपंचायत त्यांच्या हातून गेली आहे. तर काळी दौ. जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व परसराम डवरे यांच्याकडे आहेत. ते स्वत:च ठेकेदारीत गुंतल्याचा आरोप खुद्द ययाती नाईक यांनी एका सभेत केला होता.
एकंदरीत महागाव महागाव तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात सामान्य मतदारांमध्ये प्रचंड नाराजी दिसत असून, आता वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत त्याचे निकाल दिसतीलच.