जिल्हा परिषद सभापती पदांसाठी प्रचंड रस्सीखेच
By Admin | Updated: March 26, 2017 01:12 IST2017-03-26T01:12:35+5:302017-03-26T01:12:35+5:30
काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केल्यानंतर आता विषय समिती सभापतींची निवड ३ एप्रिलला केली जाणार आहे.

जिल्हा परिषद सभापती पदांसाठी प्रचंड रस्सीखेच
३ एप्रिलला निवड : इच्छुकांचे रुसवे काढताना नेत्यांची कसोटी
यवतमाळ : काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केल्यानंतर आता विषय समिती सभापतींची निवड ३ एप्रिलला केली जाणार आहे. त्यासाठी डझनावर इच्छूक असून त्यांची समजूत काढताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय क्रॉस कनेक्शन पाहायला मिळाले. काँग्रेस पक्ष हा भाजपाला क्रमांक-१ चा शत्रू मानतो, तर भाजपा काँग्रेसमुक्त भारताचा अजेंडा राबवित आहे. असे असताना यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-भाजप-राष्ट्रवादी अशी सत्ता स्थापन झाली. शिवसेनेला सर्वाधिक २० जागा असूनही विरोधी बाकावर बसावे लागले. अध्यक्षपद काँग्रेसकडे, उपाध्यक्ष भाजपाचा झाला आहे. आता ३ एप्रिल रोजी सभापतिपदाची निवडणूक घेतली जाणार आहे.
बांधकाम व अर्थ, शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण अशा चार सभापतींची ही निवड होणार आहे. त्यासाठी प्रत्येकच पक्षात प्रचंड रस्सीखेच पाहायला मिळत आहे. बांधकाम समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमिष मानकर यांना देण्याचे जवळपास निश्चित आहे. एक सभापतिपद कळंब विकास आघाडीचे प्रमुख प्रवीण देशमुख यांच्या गटाला दिले जाणार आहे. उर्वरित दोन सभापतींपैकी एक भाजपाच्या तर एक काँग्रेसच्या कोट्यात जाणार आहे. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राखण्यात यश मिळविले आहे. आता सभापतिपदसुद्धा बाभूळगाव तालुक्याकडे वर्ग करण्याची तयारी भाजपात सुरू असल्याची माहिती आहे. त्याचवेळी या पदासाठी पुसदमधूनही आग्रह धरला जात आहे. परंतु सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने मदत केल्याने पुसदमध्ये सभापतिपद देणे भाजपाकडून टाळले जाऊ शकते. भाजपाच्या कोट्यातील सभापतिपद नेमके कुणाच्या गळ्यात पडते, यावर नजरा लागल्या आहेत. तीन सदस्य निवडून आणणाऱ्या राळेगाव तालुक्यातूनही या पदाची मागणी होत आहे.
सर्वाधिक २० सदस्य असूनही विरोधी पक्षात बसावे लागल्याने शिवसेनेचे सदस्य संतप्त आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ते निश्चितच आक्रमक राहणार आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी सभागृहात अभ्यासू सदस्य असणे गरजेचे आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष नवखे असल्याने किमान त्यांच्या दिमतीला सभापती देताना सुशिक्षित, शासन-प्रशासनातील बारकावे माहीत असलेल्या अभ्यासू व्यक्तींचा विचार व्हावा, असा सूर काँग्रेस पक्षातून ऐकायला मिळतो आहे. अन्य पक्षातही हीच भावना आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडीत संधी न मिळालेल्या इच्छुकांना सभापतिपदासाठी प्रतीक्षेत ठेवण्यात आले होते. आता त्यातही संधी न मिळालेल्यांना जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्यत्वाचे गाजर दाखविले जाणार आहे. यातून एक सदस्य हा जिल्हा नियोजन समितीवर पाठविला जातो. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेसमध्ये सर्वाधिक चुरस
सभापतिपदासाठी सर्वाधिक रस्सीखेच ही काँग्रेसमध्ये आहे. सिनिअर असलेल्या अरुणा खंडाळकर यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजूला सारत अॅड.शिवाजीराव मोघेंच्या मतदारसंघात हे पद देण्यात आले. त्यामुळे आता किमान सभापतिपद मिळावे, यासाठी अरुणा खंडाळकर यांच्यासाठी मागणी होत आहे. नरेंद्र ठाकरे यांच्या रूपाने गेली काही वर्षे शिक्षण व आरोग्यसारखे महत्त्वाचे सभापतिपद मारेगाव-वणी विभागात असताना पुन्हा त्याच विभागात सभापती द्यायचा का, असा सवाल काँग्रेसच्या गोटातून विचारला जात आहे. प्रवीण देशमुख गटाला एक समिती मिळणार असल्याने राळेगाव मतदारसंघ कव्हर होतो आहे. तिकडे उमरखेडला गटनेतेपद मिळाले आहे. यापूर्वी तेथे अडीच वर्षे सभापतिपदही दिले गेले होते. यवतमाळ मुख्यालयी राहून काँग्रेससाठी उपयोगी ठरणाऱ्या सदस्याकडे काँग्रेसच्या कोट्यातील हे सभापतिपद दिले जावे, असा या पक्षातील एक सूर आहे. कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे आर्णी तालुक्यातील असल्याने ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात गणले जाते. त्यामुळे या मतदारसंघाबाहेर काँग्रेसने सभापतिपद द्यावे, अशी मागणी सदस्यांच्या गोटातून केली जात आहे.