तंटामुक्तीसाठी आता तरुणांचा पुढाकार
By Admin | Updated: February 1, 2015 23:06 IST2015-02-01T23:06:20+5:302015-02-01T23:06:20+5:30
शांततेतून समृद्धीकडे हे ब्रीद असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यभर तरुणांचा सक्रिय सहभाग वाढावा व भविष्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात क्रियाशील व सृजन

तंटामुक्तीसाठी आता तरुणांचा पुढाकार
पुसद : शांततेतून समृद्धीकडे हे ब्रीद असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत राज्यभर तरुणांचा सक्रिय सहभाग वाढावा व भविष्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात क्रियाशील व सृजन नेतृत्व निर्माण व्हावे, या हेतूने विविध शाळा व महाविद्यालयात वाद-विवाद, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यावर शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता तंटामुक्तीसाठी राज्यातील तरुणाई सरसावणार आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत राज्यातील २७ हजारांवर ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत तब्बल १७ हजारांवर गावे तंटामुक्त करण्यात मोहिमेला यश आले आहे. त्यामुळे राज्यातील गावागावात एक लोकचळवळ भक्कमपणे उभी राहिली आहे. या अभियानात तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा या हेतूने आता शाळा व महाविद्यालयातून वाद-विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे व्यापक प्रमाणात आयोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहे. त्यानुसार तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत आता लवकरच शाळा, महाविद्यालयात सदर स्पर्धा रंगणार आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला शासनाच्या गृह विभागाच्यावतीने सन २००७-०८ पासून प्रारंभ झाला आहे. मोहिमेच्या पहिल्याच वर्षी २३२८ गावे तंटामुक्त घोषित करण्यात आली. या पैकी २५२ गावांना विशेष शांतता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मोहिमेच्या दुसऱ्या वर्षी अर्थात सन २००८-०९ मध्ये २८९१ गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली. तर त्यापैकी २६५ गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविला. मोहिमेच्या तिसऱ्या वर्षी म्हणजे २००९-१० मध्ये ४२६४ गावे तंटामुक्त होवून यापैकी ३६२ गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली.
मोहिमेच्या चौथ्या वर्षी २०१०-११ मध्ये ३८२४ गावे तंटामुक्त झाली. तर २७१ गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली. मोहिमेच्या पाचव्या वर्षी म्हणजे २०११-१२ मध्ये २४७१ गावे तंटामुक्त होवून यापैकी ७५ गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविला. मोहिमेच्या सहाव्या वर्षी २०१२-१३ मध्ये १७४१ गावे तंटामुक्त झाली. तर ४७ गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविले. अर्थात आतापर्यंत राज्यातील १७६६५ गावे तंटामुक्त होवून त्यापैकी १२७० गावांनी विशेष शांतता पुरस्कार पटकाविले आहे. विशेष शांतता पुरस्कार पटकाविणाऱ्या गावांनी २०० पैकी १९० किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले, हे विशेष. यंदा मोहिमेचे सातवे वर्ष सुरू आहे. तंटामुक्त मोहिमेत सहभागी गावांनी १ मे रोजी ग्रामसभा घेऊन आपले गाव तंटामुक्त घोषित करण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरू केली आहे. या मोहिमेसाठी आता तरुणाईचा सक्रिय सहभाग मिळणार असल्याने या मोहिमेची गती वाढण्यास मदत होणार आहे. राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयात तंटामुक्तीवर आधारित विविध स्पर्धांच्या आयोजनामुळे तंटे निवारण्याच्या पद्धतीचे आकलन युवावर्गाला होणार आहे. त्यातून गावागावात शांतता प्रस्तापित करण्यास फायदा होणार आहे. ग्रामस्थांमधूनही चांगला प्रतिसाद लाभण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)