गटाच्या कर्जाला कंटाळून युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: November 19, 2016 01:33 IST2016-11-19T01:33:51+5:302016-11-19T01:33:51+5:30
गटाच्या माध्यमातून कर्जाच्या खाईत ग्रामीण मजूर मोठ्या प्रमाणात फसला जात आहे.

गटाच्या कर्जाला कंटाळून युवकाची आत्महत्या
मारेगाव तालुक्यातील तिसरी घटना : ग्रामीण मजूर गट कर्जाच्या विळख्यात
मारेगाव : गटाच्या माध्यमातून कर्जाच्या खाईत ग्रामीण मजूर मोठ्या प्रमाणात फसला जात आहे. आता या कर्जाने तालुक्यात उग्ररूप धारण केले असून तालुक्यातील चिंचमंडळ येथील युवकाने कर्जाचा हप्ता भरता येत नाही, या भितीने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी घडली.
गणेश महादेव ठमके (३०) असे मृत युवकाचे नाव आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. कसलीही आर्थिक पत नसताना आणि कोणतीही कागदपत्रे कर्ज घेण्यासाठी लागत नसल्याने अनेक मजुरांनी कर्ज फेडायची ऐपत नसतानाही एकाचवेळी अनेक गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. अनेक धनाढ्यांनी आपला काळा पैसा या व्यवसायात लावला आहे.
बँकेमार्फत या कर्जाचा व्यवहार होत नसल्याने सरकार दप्तरी याची कुठेही नोंद होत नाही. गरजू लोकांना कर्ज मंजुर करून काही पैसे नगदी, तर काही पैशाच्या तकलादू वस्तू कर्जदारांच्या माथी मारल्या जातात. यावर चक्रवाढ व्याज आकारून दर आठवड्याला कर्ज हप्त्याची वसुली केली जाते. चिंचमंडळ येथील गणेश ठमके या तरूणानेही कुटुंबाची निकड म्हणून तीन विविध गटाकडून ९० हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. परंतु दर आठवड्याला तिनही गटाचे कर्ज हप्ते परत करता येत नसल्याने कुटुंबियांची पैशाअभावी तारांबळ उडत होती. दिवाळी सणात मजुरी न करता आल्याने आणि दिवाळीत जवळचे पैसेही संपल्याने गणेश ठमके याचे गटाच्या कर्जाचे हप्ते थकले होते. १८ नोव्हेंबर रोजी गटाचे कर्जदार घरी येणार या भितीने गणेशच्या पत्नीने दोन दिवसांपूर्वीच घर सोडून माहेर गाठले होते.
अशातच गुरूवारी गटाच्या वसुलीसाठी कर्मचारी गावात येऊन गणेशला धमकावून गेले. त्यामुळे भितीने घाबरलेल्या गणेशने गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास विष घेऊन आत्महत्या केली. यापूर्वीही तालुक्यातील घोडदरा, बोरी गदाजी येथील कर्जदारांनी आत्महत्या केली होती. गटाच्या कर्जात खेड्यातील मजुरदार वर्ग मोठ्या प्रमाणात गुरफटला आहे. (शहर प्रतिनिधी)